वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आज दिनांक १३
जून २०२६ रोजी नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रास भेट देऊन केंद्रामध्ये सुरू
असलेल्या नवीन बांधकामांसह विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांचा सर्वांगीण विकास आणि संशोधन सुविधा अधिक सक्षम
करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
यावेळी माननीय
कुलगुरूंनी संशोधन केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीच्या
बांधकाम प्रगतीची प्रत्यक्ष पाहणी करत कामाच्या गुणवत्ता, गती
आणि नियोजनाचा आढावा घेतला. तसेच केंद्र परिसरातील अंतर्गत रस्ते, हरित परिसर विकास, पायाभूत सुविधा उभारणी तसेच इतर
विकासकामांचा सखोल आणि चिकित्सक आढावा घेऊन संबंधित अधिकारी व अभियंत्यांना आवश्यक
सूचना दिल्या.
कापूस पिकावरील
संशोधन अधिक प्रभावी होण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, संशोधन
केंद्रांची कार्यक्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाचा लाभ अधिक वेगाने
पोहोचविणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे माननीय कुलगुरूंनी यावेळी
स्पष्ट केले. केंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण कामे निर्धारित
वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देत भविष्यातील विकास आराखड्याबाबतही त्यांनी
मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कापूस
संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. अरविंद पंडागळे, डॉ.
बसवराज भेदे तसेच केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

