वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व
तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी
दिन तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनांक ३१ मे २०२६ रोजी उत्साहात
साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल
रामटेके होते. प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास प्रकल्प संचालक प्रा. अभिजित
संघई तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे उपस्थित होते.
अध्यक्षीय
भाषणात डॉ. राहुल रामटेके यांनी विद्यार्थ्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य
पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे
प्रतिपादन केले. शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित व्यायाम,
संतुलित आहार आणि सकारात्मक विचारसरणी आवश्यक असल्याचे त्यांनी
सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाजामध्ये तंबाखूविरोधी
जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा व विविध सामाजिक उपक्रमांद्वारे व्यसनमुक्तीचा
संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी
प्रा. अभिजित संघई यांनी “तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम” या विषयावर सविस्तर
मार्गदर्शन केले. तंबाखूमुळे उद्भवणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्या, कर्करोग,
हृदयरोग आणि श्वसनविकार यांसारख्या गंभीर आजारांची माहिती त्यांनी
विद्यार्थ्यांना दिली. तंबाखूचे व्यसन केवळ व्यक्तीच्या आरोग्यासाठीच नव्हे,
तर कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीलाही घातक ठरते, असे त्यांनी नमूद केले. युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून
समाजात सकारात्मक संदेश पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी
केले.
कार्यक्रमाची
सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेच्या गीताने करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. सुभाष
विखे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची
माहिती देत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व
विकासासाठी आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना
महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात
तंबाखूविरोधी शपथ घेण्यात आली. तसेच महाविद्यालय परिसरात तंबाखूविरोधी जनजागृती
पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी घोषवाक्यांचे फलक
हातात घेऊन परिसरात जनजागृती केली. “तंबाखूला द्या नकार, निरोगी
जीवनाचा करा स्वीकार” तसेच “व्यसनमुक्त युवक, सशक्त भारत”
अशा घोषणांद्वारे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचविण्यात आले.
पदयात्रेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी आणि
कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन विद्यार्थिनी मुदिता इंगळे यांनी केले, तर आभार आर्या चोपडे
यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. जितेंद्र खिल्लारे, श्री. शंकर शामार्थी, श्री. प्रमोद राठोड, श्री. हनुमंत ढगे, श्री. रमेश मोहीते, श्री. माणिक खटींग तसेच विद्यार्थी यश जाधव, श्रद्धा
पवार, गीता दुधाटे, संकेत पवार,
गणेश बोराडे आणि स्वराज ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.






