Tuesday, June 16, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ‘स्पर्धा मंच’चा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात संपन्न

 ध्येय, शिस्त आणि परिश्रम हाच यशाचा मूलमंत्र : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व यशस्वी करिअर घडविण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘स्पर्धा मंच, परभणी’ चा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन वैद्यनाथ वसतिगृह परिसरात दिनांक १६ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत तसेच स्पर्धा मंचचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन स्पर्धा मंचचे अध्यक्ष रोहित कुडके, उपाध्यक्ष रोहित मोरे, सचिव मारोती सूर्यवंशी व सर्व सदस्यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी तसेच शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र सांगताना, ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतेही यश प्राप्त करता येते. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. अपयश हे यशाच्या प्रवासातील एक पाऊल मानून विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी अखंड प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. स्पर्धा मंचच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे ५०० हून अधिक अधिकारी घडल्याबद्दल त्यांनी मंचाचे विशेष कौतुक केले आणि ही परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांनी आयसीएआर, एआरएस, नेट, गेट तसेच विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्याने अभ्यास करावा, असे सांगितले. कृषि क्षेत्रात संशोधक, कृषि शास्त्रज्ञ, कृषि अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून उज्ज्वल करिअर घडविण्याच्या संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी स्पर्धा परीक्षांमधील बदलत्या प्रवाहांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि वेळेचे व्यवस्थापन यांचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी विद्यार्थ्यांच्या निवास व अभ्यासासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देत, अलीकडेच करण्यात आलेल्या विविध सुधारणा आणि उपक्रमांचा आढावा सादर केला.

या स्पर्धा मंचचेपहिले अध्यक्ष सध्या विद्यापीठात कार्यरत असलेले शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ.किरण जाधव हे  होते. याप्रसंगी त्यांनीही सुरुवातीचा इतिहास सांगून मागदर्शन केले.

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धा मंचच्या वतीने माननीय कुलगुरू, शिक्षण संचालक व अन्य मान्यवरांचा विद्यापीठासाठी नवीन आकृतिबंधाअंतर्गत अतिरिक्त पदांना मंजुरी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माननीय कुलगुरूंनी वैद्यनाथ वसतिगृहातील उपलब्ध सुविधा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सकारात्मक शैक्षणिक वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले.

गेल्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेताना स्पर्धा मंचच्या कार्यकर्त्यांनी मंचाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या विविध उपक्रमांची, यशोगाथांची आणि प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाची माहिती दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मंचाच्या भावी वाटचालीसाठी अधिक व्यापक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सिद्धेश्वर हत्ते यांनी केले. प्रास्ताविकात स्पर्धा मंचचे अध्यक्ष रोहित कुडके यांनी मंचाच्या २५ वर्षांच्या कार्याचा आढावा सादर केला, तर उपाध्यक्ष रोहित मोरे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, स्पर्धात्मक दृष्टिकोन आणि यशस्वी करिअर घडविण्याची प्रेरणा निर्माण झाल्याचे वातावरण कार्यक्रमभर अनुभवास आले.