Wednesday, June 24, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची डॉ. बद्रीनारायण बारवाले कृषि महाविद्यालयास भेट; विद्यार्थ्यांना दिला परिश्रम, गुणवत्ता आणि संस्कारांचा संदेश


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी मान्यताप्राप्त खरपुडी (जि. जालना) येथील डॉ. बद्रीनारायण बारवाले कृषि महाविद्यालयास’ माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी बुधवार दिनांक २४ जून २०२६ रोजी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व विद्यार्थी विकासाशी संबंधित विविध उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्रजी बारवाले, संस्थेचे सचिव कृषिरत्न मा. श्री. विजयआण्णा बोराडे, संस्थेचे विश्वस्त तथा कृषिभूषण मा. भगवानदादा काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास देशमुख, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. श्रीकृष्ण सोनुने यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, कृषि शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थी जीवनात सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त, जिज्ञासा आणि प्रामाणिकपणा या गुणांचा अंगीकार केल्यास यश निश्चित मिळते. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान, संशोधनाभिमुख दृष्टीकोन आणि नवकल्पनांचा स्वीकार करून कृषि क्षेत्रात नेतृत्व निर्माण करण्याचे आवाहन केले. चांगला विद्यार्थी बनण्याबरोबरच जबाबदार, संवेदनशील आणि राष्ट्रहित जपणारा आदर्श नागरिक बनणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी विद्यापीठ स्तरावर आवश्यक सहकार्य कायम राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.