Saturday, June 20, 2026

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; ड्रोन प्रशिक्षण केंद्र व AI3C प्रकल्पाची पाहणी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयास दिनांक १९ जून २०२६ रोजी भेट देऊन महाविद्यालयातील विविध शैक्षणिक, संशोधन तसेच पायाभूत सुविधांची पाहणी केली.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित AI3C (Artificial Intelligence Innovation and Incubation Centre) प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा व इतर सुविधांची पाहणी कुलगुरूंनी प्रकल्प प्रमुख तथा कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या समवेत केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयातील रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RPTO) अर्थात ड्रोन प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन तेथील कार्यपद्धती आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. ड्रोन प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी डॉ. विशाल इंगळे यांनी नुकतीच एनसीसी इंडिया (NCC India) च्या नागपूर विभागाच्या विंग कमांडर राधिका मॅडम व त्यांच्या पथकाने विद्यापीठातील ड्रोन प्रशिक्षण केंद्राला दिलेल्या भेटीची माहिती दिली. तसेच भविष्यात एनसीसी कॅडेट्सना ड्रोन प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावित उपक्रमाबाबत सविस्तर माहिती माननीय कुलगुरूंना सादर करण्यात आली.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी विविध विभागप्रमुख, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत संशोधन, अध्यापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन केले.

महाविद्यालयासाठी शासनाकडून नुकत्याच मंजूर झालेल्या आकृतीबंधासंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ, नवीन पदनिर्मिती तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.

माननीय कुलगुरूंच्या या भेटीमुळे महाविद्यालयातील विविध विकासकामांना अधिक गती मिळणार असून संशोधन, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष आधारित उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.