Wednesday, June 17, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अमली पदार्थ : व्यसन व समस्या’ विषयावर विशेष जनजागृती व्याख्यान संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक १७ जून २०२६ रोजी अमली पदार्थ : व्यसन व समस्या” या विषयावर विशेष जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. राजगोपाल कालानी उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुभाष काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेचे गीत सादर करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल रामटेके यांनी युवकांमध्ये वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत चिंता व्यक्त केली. व्यसनामुळे व्यक्तीच्या आरोग्य, शिक्षण आणि करिअरवर विपरीत परिणाम होतो. यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून ज्ञान, कौशल्य विकास आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण विकसित करणारे प्रभावी व्यासपीठ असून स्वयंसेवकांनी व्यसनमुक्तीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी आवाहन केले. तसेच निरोगी, सुदृढ आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रमुख पाहुणे डॉ. राजेश कदम यांनी युवकांमध्ये वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत चिंता व्यक्त केली. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शैक्षणिक संस्था, पालक आणि समाज यांची संयुक्त जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जनजागृती अभियान राबवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे, तसेच युवकांनी आपली ऊर्जा शिक्षण, संशोधन, क्रीडा आणि समाजसेवा यांसारख्या विधायक कार्यात खर्च करून राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. सुभाष काळे यांनी अमली पदार्थ : व्यसन व समस्या” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. व्यसनामुळे व्यक्तीचे आरोग्य, शिक्षण, करिअर आणि कौटुंबिक जीवन प्रभावित होत असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहून सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. राजगोपाल कालानी यांनी अमली पदार्थांच्या व्यसनामुळे युवकांचे भविष्य धोक्यात येत असल्याचे सांगितले. व्यसनमुक्ती ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक चळवळ बनली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहून आत्मविश्वास, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करावा, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. सुभाष विखे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी माहिती देत युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित केली.

कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ. सुमंत जाधव, डॉ. रघुनाथ जायभाये, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. गजानन वसू आणि डॉ. अनिकेत वाईकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मुदिता इंगळे हिने केले, तर आभार प्रदर्शन कु. आर्या चोपडे हिने केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. शंकर शामार्थी, श्री. प्रमोद राठोड, श्री. हनुमंत ढगे तसेच विद्यार्थी भाग्यश्री आडे, सपना भरदम, हर्षदा सुरवसे, यशराज जाधव, सौरभ निहाल आणि स्वराज ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.