वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत शासकीय कृषि व कृषि
व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, जिरेवाडी येथे भारतीय
हवामान विभाग (IMD) व भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR),
नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या स्वयंचलित
हवामान यंत्राचे उद्घाटन माजी कृषिमंत्री तथा माननीय आमदार श्री. धनंजय मुंडे
यांच्या हस्ते दिनांक २६ जून २०२६ रोजी संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे
होते. यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यापीठ अभियंता श्री.
दीपक काशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिनेशसिंह चौहान (जिरेवडी), डॉ.
बाबासाहेब ठोंबरे (लातूर), डॉ. संजीव बंटेवाड (अंबाजोगाई), विद्यापीठ उप अभियंता डॉ दयानंद टेकाळे, सत्यसाईबाबा कन्स्ट्रक्शनचे इंजी.
रितेश माने, इंजी. प्रसाद इंगळे तसेच महाविद्यालयातील
प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. दिनेशसिंह
चौहान यांनी केले. त्यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या कृषि व कृषि व्यवसाय
व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमांची माहिती देत महाविद्यालय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या
विविध उपक्रमांची उपस्थित मान्यवरांना माहिती दिली.
उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना माननीय आमदार धनंजय मुंडे यांनी कृषि व कृषि
व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये शासनाची भूमिका, शासन स्तरावर
करण्यात आलेले प्रयत्न याबाबत माहिती दिली. तसेच येणाऱ्या काळात हे महाविद्यालय महाराष्ट्रातील
उत्कृष्ट कृषि शिक्षण संस्थांपैकी एक म्हणून नावारूपास यावे, यासाठी विद्यापीठ प्रशासन, प्राचार्य आणि सर्व
प्राध्यापकांनी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी
केले.
अध्यक्षीय समारोपात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले
की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ हे देशातील नावाजलेल्या कृषि
विद्यापीठांपैकी एक असून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणारे अग्रगण्य कृषि
विद्यापीठ आहे. येत्या काळात जिरेवाडी येथे स्थापन होणारे हे महाविद्यालय राज्यासह
देशपातळीवर आदर्श कृषि महाविद्यालय म्हणून विकसित होईल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. अनंत
मुंडे व श्री. गोपाळ विग्ने यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विनोद शिंदे, सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय राठोड, तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री. उदय चव्हाण, श्री. वाकडे, श्री. ऋषी धोत्रे, श्री. नागेश दरकसे, श्री. अक्षय कांबळे आणि श्रीमती मोडके उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी प्रा. बाबासाहेब मस्के यांनी केले.


.jpeg)
.jpeg)


.jpeg)