Friday, October 16, 2026

जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर वाढवा : डॉ. हरिहर कौसडीकर

 वनामकृविच्या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागास पाणी फाउंडेशनअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची भेट


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागास परभणी जिल्ह्यातील पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत कार्यरत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या दहा प्रतिनिधींनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान प्रतिनिधींनी मृदा आरोग्य संवर्धन, मृदा परीक्षण, जैविक व सेंद्रिय खतांचा वापर तसेच रासायनिक खतांच्या संतुलित वापराबाबत शास्त्रीय माहिती जाणून घेतली.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली. शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. तसेच अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी तळ्यातील गाळाचा शेतीसाठी प्रभावी उपयोग करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रारंभी विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी विभागातील विविध संशोधन व तांत्रिक उपक्रमांची माहिती दिली. मृदा परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापनाचे नियोजन, जैविक व सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर आणि रासायनिक खतांचा संतुलित व मर्यादित वापर यांचे महत्त्व त्यांनी विशद केले. जमिनीची सुपीकता व आरोग्य टिकवून ठेवण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करणे आणि पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून खतांचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मृदा परीक्षण केल्यानंतरच रासायनिक खतांचा वापर करावा, असे आवाहनही डॉ. कौसडीकर यांनी केले.

या भेटीदरम्यान प्रतिनिधींनी विभागातील केंद्रीय मृदा परीक्षण प्रयोगशाळा, खतांच्या ब्रिकेट निर्मिती प्रकल्प, गांडूळखत व त्याच्या उपपदार्थ निर्मिती प्रकल्प तसेच जैविक खत निर्मिती प्रकल्पांना भेट दिली. माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व, गांडूळखत निर्मिती, जैविक खतांचा वापर आणि शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविण्याच्या विविध पद्धतींबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.

यावेळी प्राध्यापक डॉ. सुरेश वाईकर, जैविक खत प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. भाग्यरेषा गजभिये आणि डॉ. स्नेहल शिलेवंत उपस्थित होते. भेटीस आलेल्या प्रतिनिधींनी विभागातील तांत्रिक माहिती जाणून घेत विविध उपक्रमांविषयी चर्चा केली.

शेतकरी उत्पादक गटांनी विद्यापीठाच्या संपर्कात राहून कृषि तंत्रज्ञान व निविष्ठांच्या उत्पादनासंदर्भात प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन डॉ. कौसडीकर यांनी केले. शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून तालुकानिहाय जैविक व सेंद्रिय निविष्ठांच्या उत्पादनाचे छोटे-छोटे उपक्रम सुरू केल्यास स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होण्यासोबतच शाश्वत शेतीला चालना मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले. कृषि निविष्ठा व विभागातील विविध उपक्रमांशी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात आले.

या भेटीमुळे विद्यापीठातील कृषि संशोधन व तंत्रज्ञान शेतकरी उत्पादक गटांपर्यंत पोहोचण्यास, मृदा आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास आणि जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढवून शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. भेट देणाऱ्या शेतकरी उत्पादक गटांच्या प्रतिनिधींमध्ये प्रगतशील शेतकरी रमेश विठ्ठलराव दुधाटे गोळेगावकर, गजानन जी. सायखेडकर, कृष्णा गव्हाणे, रामेश्वर साबळे आणि गजानन आंबोरे यांचा समावेश होता.