श्रम कमी करणाऱ्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन; ७६ महिला शेतकऱ्यांसह ९४ शेतकऱ्यांचा सहभाग
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय
समन्वयित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला यांच्या वतीने राष्ट्रीय महिला शेतकरी
दिवस शेंद्रा, ता. जि. परभणी येथे उत्साहात साजरा करण्यात
आला. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी आयोजित या कार्यक्रमात
महिला शेतकऱ्यांना शेतीतील शारीरिक श्रम कमी करणारे आधुनिक कृषि तंत्रज्ञान,
भरडधान्यांचे महत्त्व, मूल्यवर्धित पदार्थ
निर्मिती, महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच विविध शासकीय
योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील ७६ महिला शेतकरी आणि
१८ पुरुष शेतकरी अशा एकूण ९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे
आयोजन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला यांच्या केंद्र
समन्वयिका तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आले. तसेच त्यांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये महिलांचे योगदान
महत्त्वपूर्ण असून, खुरपणी, आंतरमशागत, कापणी, मळणी आणि
शेतीमाल हाताळणी यांसारख्या कामांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक श्रम
करावे लागतात. हे श्रम कमी करणे, वेळेची बचत करणे आणि कामाची
कार्यक्षमता वाढविणे या उद्देशाने कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन केले.
श्रम कमी करणाऱ्या कृषि उपकरणांचे प्रात्यक्षिक
कार्यक्रमात
प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या विविध श्रम कमी करणाऱ्या कृषि साधनाचे आणि
अवजारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपकरणांची कार्यपद्धती, उपयोग आणि शेतीतील दैनंदिन कामे सुलभ
करण्यासाठी त्यांची उपयुक्तता याविषयी महिला शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
आधुनिक उपकरणांचा योग्य वापर केल्यास शारीरिक श्रम कमी होण्याबरोबरच वेळेची बचत
होऊन शेतीची कामे अधिक कार्यक्षमतेने करता येतात, हे
प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले. यासोबतच प्रकल्पांतर्गत विकसित
विविध मूल्यवर्धित पदार्थ आणि श्रीअन्न पदार्थ तयार करण्याची प्रात्यक्षिकेही
दाखविण्यात आली.
भरडधान्ये आणि मूल्यवर्धनातून उत्पन्नवाढीच्या संधी
भरडधान्यांचे
(मिलेट्स) पोषणमूल्य, दैनंदिन आहारातील
त्यांचे महत्त्व तसेच त्यांचे उत्पादन, प्रक्रिया आणि
मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीमधील संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. महिला
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीज्ञानासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून
भरडधान्यांपासून विविध पदार्थ तयार करणे आणि त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे
यांसारख्या संधींचा लाभ घ्यावा, असे या मार्गदर्शनातून
अधोरेखित करण्यात आले.
महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथांना व्यासपीठ
कार्यक्रमात
महिला शेतकऱ्यांच्या अनुभवांना आणि यशोगाथांना विशेष महत्त्व देण्यात आले. महिला
शेतकरी तथा महिला बचतगटाच्या अध्यक्षा श्रीमती दीक्षा दुधाटे यांचा शेतीतील कष्ट, बचतगटाच्या माध्यमातून स्वतःचे व कुटुंबातील
सदस्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल विद्यापीठाने विकसित केलेले
नवीन ‘राजकेसर’ आंब्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
महिला शेतकरी
श्रीमती सीताबाई पवार यांनीही उपस्थितांसमोर आपली यशोगाथा मांडली. त्या सन २०२२
पासून अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला यांच्या स्टेकहोल्डर
म्हणून प्रकल्पाच्या विविध उपक्रमांशी जोडलेल्या आहेत. त्यांनी शेतीतील आपले अनुभव, अडचणींवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि
मिळविलेले यश याविषयी माहिती दिली. या अनुभवांच्या देवाणघेवाणीतून उपस्थित महिला
शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली.
शासकीय योजनांची माहिती आणि कृषि मार्गदर्शन
महिला
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती
देण्यात आली. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच अखिल भारतीय
समन्वयित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला यांच्या माध्यमातून महिलांपर्यंत
कृषिविषयक माहिती, उपयुक्त तंत्रज्ञान
आणि कौशल्यविकासाच्या संधी पोहोचविण्याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास
सरपंच सुधाकर ढगे, उपसरपंच लक्ष्मीबाई
जोंधळे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख खलीद शेख अहेमद,
माजी उपसरपंच सुभाष जोंधळे तसेच मिनाबाई जोंधळे, अंजनबाई जोंधळे, रेखा जोंधळे, प्रतीक्षा
जोंधळे, रामकिशन पवार आदी प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन कैलास जोंधळे (यंग प्रोफेशनल-II)
यांनी केले, तर चंद्रप्रकाश लहाडे (यंग
प्रोफेशनल-I) यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन
व व्यवस्थापन सादेक शेख (यंग प्रोफेशनल-II), विकास शिक्रे
(यंग प्रोफेशनल-I) आणि सय्यद आमेर (मल्टी टास्किंग ऑपरेटर)
यांनी केले.
महिला
शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग,
आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, शासकीय
योजनांची माहिती आणि यशोगाथांची देवाणघेवाण यांमुळे हा कार्यक्रम महिला
शेतकऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि आत्मनिर्भरता वाढविण्याच्या
दृष्टीने उपयुक्त ठरला.



.jpeg)


.jpeg)

.jpeg)
