Thursday, October 15, 2026

कृषि महाविद्यालय, परभणी येथे सायबर सुरक्षा व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

 विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील जिमखाना विभागाच्या वतीने महाराष्ट्र सायबर पोलीस व नवा मोंढा पोलीस ठाणे, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायबर सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक (PSI) नानावरे मॅडम व पोलीस कॉन्स्टेबल श्री. आठवले यांनी उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाइन फसवणुकीचे धोके आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले.

आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप अकाउंट हॅकिंग, बनावट लिंक, फसवे QR कोड, OTP मागवून केली जाणारी आर्थिक फसवणूक, अनधिकृत APK ॲप्स डाउनलोड करणे, बनावट ऑनलाइन नोकरीच्या जाहिराती तसेच डिजिटल अटक यांसारख्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, कोणालाही OTP, पासवर्ड किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये, केवळ अधिकृत स्रोतांमधूनच ॲप्स डाउनलोड करावीत आणि सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले.

सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा तसेच www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले. सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे, सुरक्षित डिजिटल व्यवहारांची सवय लावणे आणि संभाव्य ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक माहिती मिळवणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

यावेळी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिमखाना उपाध्यक्ष डॉ. पी. एस. नेहरकर, मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. बडगुजर, विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ. झटे, डॉ. अनंत लाड, डॉ. फुलारी, डॉ. खोब्रागडे यांच्यासह महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण होऊन सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल व्यवहारांचे महत्त्व अधोरेखित झाले.