हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबांना होणार लाभ
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील संशोधन संचालक डॉ. भगवान
आसेवार यांनी थायलंडमधील पाथुम थानी येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AIT)
येथे आयोजित ‘हवामान अनुकूल डिजिटल शेती आणि
उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या विषयावरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात
विद्यापीठाच्या संशोधन कार्याचे सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणातून
विद्यापीठाचे संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि कृषी क्षेत्रातील
योगदान आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले.
दिनांक ५ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात
१२ देशांतील ३५ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती
अधिक सक्षम, शाश्वत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर
हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.
प्रशिक्षणाच्या उद्घाटन सत्रात एआयटीच्या Faculty of Food, Agriculture and Natural Resources चे अधिष्ठाता प्रा. अनिल कुमार अनाल, उपअधिष्ठाता
प्रा. अविषेक दत्ता आणि अभ्यासक्रम संचालक डॉ. सुशील कुमार यांची प्रमुख उपस्थिती
होती. विविध देशांतील कृषी संशोधक, तज्ज्ञ आणि प्रतिनिधींना
एकत्र आणणाऱ्या या प्रशिक्षणात हवामान अनुकूल शेती, डिजिटल
कृषी तंत्रज्ञान आणि शाश्वत कृषी पद्धतींवर भर देण्यात आला.
प्रशिक्षणांतर्गत काटेकोर शेती पद्धती, कृषी हवामान सल्ला सेवा, अचूक शेतीसाठी
ड्रोन तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्स व व्हर्टिकल फार्मिंग,
पुनरुत्पादक व शाश्वत शेती, बायोचार निर्मिती,
स्वयंचलित सिंचनासाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), स्मार्ट ग्रीनहाऊस, आधुनिक वनस्पती उत्पादन प्रणाली
आणि डिजिटल विपणन अशा विविध विषयांवर व्याख्याने, प्रात्यक्षिके
व क्षेत्रभेटी आयोजित करण्यात आल्या.
या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, राज्य शासनाचे संबंधित
अधिकारी, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
(MCAER) तसेच विद्यापीठाचे संचालक आणि कुलसचिव यांचे डॉ. भगवान आसेवार
यांनी आभार मानले.
डॉ. भगवान आसेवार यांनी सादरीकरणाद्वारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठात सुरू असलेल्या संशोधन कार्याची, विकसित करण्यात येत असलेल्या कृषी
तंत्रज्ञानाची तसेच कृषी क्षेत्रातील विद्यापीठाच्या योगदानाची माहिती दिली. या
आंतरराष्ट्रीय व्यासपीठामुळे विद्यापीठाच्या संशोधन कार्याची ओळख जागतिक स्तरावर
पोहोचण्यास मदत झाली.
या प्रशिक्षणातून प्राप्त होणारे ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मराठवाड्यातील हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः बदलत्या हवामान परिस्थितीत शेतीची उत्पादकता टिकविणे, नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे आणि शेतकरी कुटुंबांचे उपजीविकेचे साधन अधिक सक्षम करण्यासाठी या ज्ञानाचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






