Thursday, October 15, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात ग्राहक हक्क जनजागृती कार्यक्रम उत्साहात

 अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर प्रदर्शनातून ग्राहक हक्कांविषयी जनजागृती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील संसाधन व्यवस्थापन व ग्राहक विज्ञान विभागाच्या वतीने दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्राहक हक्क जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विभागाच्या अभ्यासक्रमांतर्गत पाचव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्क, ग्राहक संरक्षण आणि जबाबदार ग्राहकत्व याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

हा कार्यक्रम अधिष्ठाता तथा विभाग प्रमुख डॉ नीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी विषय शिक्षक ज्योती मुंडे यांनी आयोजित केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  

या पोस्टर प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी ग्राहकांचे हक्क, ग्राहक संरक्षण कायदा, वस्तूंची गुणवत्ता व सुरक्षितता, योग्य माहिती मिळविण्याचा हक्क, तक्रार निवारण व्यवस्था तसेच ग्राहकांची कर्तव्ये या विषयांवर आधारित आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केली. ‘जागरूक ग्राहक बना’, ‘ग्राहकांचे हक्क जाणून घ्या’ आणि ‘स्मार्ट ग्राहक बना’ अशा संदेशांतून दैनंदिन खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये ग्राहकांनी सजग राहण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी पोस्टर प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सचे अवलोकन केले. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी केलेल्या या सर्जनशील उपक्रमातून ग्राहक हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली. वस्तू खरेदी करताना त्यांची गुणवत्ता, किंमत, उत्पादन व समाप्ती दिनांक, पावती आणि आवश्यक माहिती तपासावी, तसेच कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास योग्य तक्रार निवारण यंत्रणेचा वापर करावा, याबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्राहक हक्कांविषयी सैद्धांतिक ज्ञानासोबतच त्याची व्यावहारिक मांडणी करण्याची संधी मिळाली. तसेच पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून महाविद्यालयीन स्तरावर ग्राहक जागृतीचा संदेश प्रसारित करण्यात आला.

संसाधन व्यवस्थापन व ग्राहक विज्ञान विभागाच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व संबंधित कर्मचारी सहभागी झाले होते. ग्राहकांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवून जबाबदारीने खरेदी करावी आणि इतरांनाही ग्राहक हक्कांबाबत जागरूक करावे, हा या उपक्रमाचा प्रमुख संदेश होता.