Tuesday, October 13, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाची सांस्कृतिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी

 समूह नृत्य व सुगम गायन स्पर्धेत द्वितीय, तर समूहगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, सेलू येथे दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या महोत्सवात महाविद्यालयाने समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक, सुगम गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तर समूहगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.

या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक परंपरेला नवी झळाळी मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सांघिक भावनेला प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या यशाबद्दल महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. अश्विनी बिडवे, डॉ. दिनेश खोगरे, आदिनाथ बेले, कैलास जोधळे तसेच नृत्यदिग्दर्शक कैलास यांचे विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सराव, मेहनत, सांघिक समन्वय आणि मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य यांमुळे हे यश प्राप्त झाले.

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रासोबतच सांस्कृतिक क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या यशामुळे महाविद्यालय परिवारात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आल्या.