वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे एकात्मिक
पाणलोट व्यवस्थापन तसेच मृद व जलसंधारणाच्या उपाययोजनांबाबत दिनांक १८ ऑक्टोबर २०२६
रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.
या बैठकीस
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या सहसचिव श्रीमती सुशिला यादव, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब
ठोंबरे, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे
अधिष्ठाता डॉ. रावसाहेब भाग्यवंत, मृद व जलसंधारण
अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. मधुकर मोरे तसेच सिंचन व निचरा अभियांत्रिकी
विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. विशाल इंगळे उपस्थित होते.
बैठकीमध्ये माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन केले तसेच पाणलोट क्षेत्राचे
शास्त्रीय पद्धतीने नियोजन, देखरेख व मूल्यमापन
करण्यासाठी रिमोट सेन्सिंग (RS) आणि भौगोलिक माहिती प्रणाली
(GIS) या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबाबत
सविस्तर चर्चा करण्यात आली.
मृद व
जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषि, फलोत्पादन, वन विभाग,
मनरेगा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA),
स्वयंसेवी संस्था आणि कृषि विद्यापीठ यांच्यामध्ये समन्वय असणे
आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच शास्त्रीय माहिती आणि स्थानिक
परिस्थितीचा विचार करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, विविध
विभागांतील माहिती एकाच ठिकाणी संकलित करणे, कोरडवाहू
शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविणे या
विषयांवरही विचारविनिमय झाला.
पाणलोट
विकासासाठी ‘रिज टू व्हॅली’ (Ridge to
Valley) या संकल्पनेनुसार उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर भर
देण्यात आला. याअंतर्गत जलसंधारण संरचनांची उभारणी, भूजल
पुनर्भरणासाठी रिचार्ज शाफ्टची निर्मिती आणि पाणलोट क्षेत्रातील उपलब्ध
जलस्रोतांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
याशिवाय रिमोट सेन्सिंग व जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित पाणलोट विकासाचा सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करणे, संबंधित विभागांच्या समन्वयासाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे तसेच कार्यक्षम जलव्यवस्थापन आणि कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाचा व्यापक अवलंब करणे यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. मधुकर मोरे यांनी केले तर डॉ. विशाल इंगळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

