माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींचा गौरव; कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व
तंत्रज्ञान महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालय
(DGCA) मान्यताप्राप्त ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (VNMKV–RPTO)
येथे सारथीच्या सहकार्याने आयोजित ‘सेनापती धनाजी जाधव शेतकरी ड्रोन
प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत’ प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे
वितरण दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले.
कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, ड्रोन
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीतील विविध कामे अधिक कार्यक्षमतेने करणे आणि
ग्रामीण भागातील युवकांना ड्रोन पायलट म्हणून कौशल्याधारित प्रशिक्षण देणे,
हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत ड्रोन
पायलट प्रशिक्षणाच्या सारथीच्या सहाव्या बॅचचे सात दिवसीय प्रशिक्षण नागरी विमान
वाहतूक महासंचालनालयाच्या मान्यतेनुसार दिनांक ११ ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कृषि
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ड्रोन पायलट प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात
आले होते. या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. ही ११ बॅच
विद्यार्थ्यांची असून आतापर्यंत सारथीच्या सहकार्याने ५७ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
देण्यात आले.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रशिक्षणार्थींना
मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कृषि क्षेत्राच्या प्रगतीत
योगदान देण्याचे आवाहन केले. जीवनात दूरदृष्टी, सातत्यपूर्ण मेहनत, कौशल्यविकास आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन यांचा अंगीकार करणे आवश्यक
असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षणातून प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग
प्रत्यक्ष शेतीमध्ये तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी
करावा, असेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या उपसचिव माननीय
सुशीला यादव, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषि
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रावसाहेब भाग्यवंत,
VNMKV–RPTO चे प्रमुख डॉ. विशाल इंगळे तसेच मृद व जलसंधारण विभागाचे
प्राध्यापक डॉ. मधुकर मोरे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रास्ताविकात डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी RPTO च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या
प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले. कृषि क्षेत्रातील फवारणी, पीक
निरीक्षण आणि शेती व्यवस्थापन यांसारख्या कामांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाची
उपयुक्तता स्पष्ट करताना प्रशिक्षित ड्रोन पायलट निर्माण करण्यासाठी अशा प्रशिक्षण
कार्यक्रमांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
या उपक्रमामुळे कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास, कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यास आणि युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमास संबंधित विभागांचे अधिकारी, प्राध्यापक, प्रशिक्षण समन्वयक आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

.jpeg)

.jpeg)
