वनामकृवि - भारत मौसम विज्ञान विभाग (IMD) यांच्यात सामंजस्य करार; मराठवाड्यातील हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला सेवांना मिळणार बळ
मराठवाड्यातील हवामान निरीक्षण, अचूक हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी
कृषि हवामान सल्ला सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात
आले आहे. भारत मौसम विज्ञान विभाग (IMD), मुंबई आणि वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्यात केंद्र शासनाच्या ‘मिशन
मौसम’ उपक्रमांतर्गत एकात्मिक हवामान निरीक्षण प्रणाली (Integrated
Meteorological Observation System–IMOS) उभारण्यासाठी दि. १६ ऑक्टोबर
रोजी सामंजस्य करार करण्यात आला.
ही अत्याधुनिक प्रणाली विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कृषि हवामानशास्त्र
संशोधन प्रकल्प (AICRP on
Agrometeorology) येथे उभारण्यात येणार आहे. या प्रणालीअंतर्गत सी-बँड
पोलॅरिमेट्रिक डॉप्लर हवामान रडार (C-Band Polarimetric Doppler Weather
Radar), मानक हवामान उपकरणांनी सुसज्ज पृष्ठभागीय हवामान वेधशाळा (Surface
Meteorological Observatory) आणि रेडिओसॉन्ड वेधशाळा (Radiosonde
Observatory) या तीन महत्त्वपूर्ण सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
रेडिओसॉन्ड प्रणालीद्वारे हवामान फुग्याच्या साहाय्याने वातावरणाच्या उच्च स्तरांवरील
तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा
यांसारख्या हवामानविषयक घटकांची निरीक्षणे घेता येतील.
या सामंजस्य करारप्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि आणि प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईचे प्रमुख तथा वैज्ञानिक श्री. बिक्रम सिंह उपस्थित होते.
विद्यापीठाच्या वतीने विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर व हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास
डाखोरे, तर भारत मौसम विज्ञान विभागाच्या वतीने श्री. शंभू रवींद्रन,
श्री. महेश बुरटे, श्री. पठाण यांच्यासह अन्य अधिकारी
उपस्थित होते.
हवामान आधारित शेतीला मिळणार नवी दिशा
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मराठवाड्यात अत्याधुनिक हवामान
निरीक्षण सुविधांची उभारणी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रणालीमुळे हवामानविषयक
निरीक्षणांची वैज्ञानिक क्षमता वाढेल. तसेच हवामानातील बदलांचे अधिक प्रभावी विश्लेषण
करून शेतीसह विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त हवामान आधारित सेवा विकसित करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
श्री. बिक्रम सिंह यांनी वनामकृवि येथे उभारण्यात येणारी एकात्मिक हवामान निरीक्षण
प्रणाली ही वैशिष्ट्यपूर्ण सुविधा ठरेल, असे सांगितले. या केंद्रामार्फत हवामान
निरीक्षण, माहिती संकलन व विश्लेषण आणि हवामान अंदाज निर्मिती
यांना चालना मिळण्यासोबतच भविष्यात देशातील अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी हे केंद्र
संदर्भ व मार्गदर्शन केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता असल्याचे त्यांनी स्पष्ट
केले.
हवामान माहिती संकलनापासून अंदाज निर्मितीपर्यंत मार्गदर्शन
सामंजस्य कराराच्या निमित्ताने वनामकृविचे प्राध्यापक व कर्मचारी आणि भारत मौसम
विज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये संवादात्मक सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये हवामान
निरीक्षण, हवामानविषयक माहितीचे संकलन, तिचे विश्लेषण, हवामान अंदाज तयार करण्याची प्रक्रिया आणि विविध हवामानविषयक उत्पादनांची निर्मिती
याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
IMD च्या निथा, सुष्मा अय्यर आणि जिस्मी यांनी हवामान निरीक्षणापासून
माहिती प्रक्रिया व विश्लेषणापर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती दिली. तसेच विभागाकडून
उपलब्ध होणाऱ्या हवामान अंदाजांचा शेतस्तरावरील कृषि नियोजनासाठी प्रभावी वापर कसा
करता येईल, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांना वेळेवर व अधिक उपयुक्त सल्ला मिळण्यास मदत
हवामानातील अनिश्चितता, पावसाचे बदलते स्वरूप आणि अवकाळी पाऊस यांसारख्या आव्हानांच्या
पार्श्वभूमीवर ही प्रणाली मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हवामानविषयक अधिक
व्यापक निरीक्षणे आणि त्यांचे शास्त्रीय विश्लेषण यांमुळे पेरणी, सिंचन, खत व्यवस्थापन, कीड व रोग
व्यवस्थापन तसेच काढणी यांसारख्या कृषि कामांचे नियोजन करण्यासाठी अधिक उपयुक्त हवामान
आधारित सल्ला सेवा विकसित करण्यास मदत होईल. परिणामी, हवामानातील
बदलांशी जुळवून घेणारी आणि जोखीम कमी करणारी शेती पद्धती विकसित करण्याच्या प्रयत्नांना
बळ मिळेल.
भारत मौसम विज्ञान विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्यातील
हा सामंजस्य करार हवामान विज्ञान आणि कृषि संशोधन यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणारा
असून, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामान आधारित निर्णय घेण्यासाठी अधिक सक्षम करण्याच्या
दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.



.jpeg)




