परिसर स्वच्छतेसोबतच मनाची स्वच्छताही महत्त्वाची – अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय,
परभणी येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली
राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ (दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६) अंतर्गत
दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने परिसर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेद्वारे
महिनाभर राबविण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करताना महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.
प्रवीण वैद्य म्हणाले की, परिसराच्या स्वच्छतेसोबतच मनाची स्वच्छताही तितकीच आवश्यक आहे. स्वच्छता ही
केवळ परिसरापुरती मर्यादित न राहता प्रत्येकाने आपल्या विचारांत, वर्तनात आणि दैनंदिन आचरणातही स्वच्छतेची भावना जोपासली पाहिजे. सार्वजनिक
ठिकाणांची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असून, विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे संस्कार आपल्या जीवनात रुजवून समाजातही त्याबाबत
जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या स्वच्छता मोहिमेत प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून
महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी
जागरूकता निर्माण करणे, श्रमप्रतिष्ठेची भावना वाढविणे, सामाजिक बांधिलकी जोपासणे
आणि सार्वजनिक परिसराप्रती जबाबदारीची जाणीव दृढ करणे हा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास पदवी शिक्षण प्रभारी डॉ. दिलीप झटे, तसेच विविध विभागांचे
प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. प्रफुल्ल घंटे, वनस्पती शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या
प्रभारी डॉ. गोदावरी पवार, डॉ. सुरेश वाईकर आणि डॉ. सुदाम शिराळे
यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व प्रथम सत्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कृषि
वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख आणि सर्व प्राध्यापकांनीही या उपक्रमात उत्साहाने
सहभाग नोंदविला.
दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प
अभियाना’च्या माध्यमातून स्वच्छता, सामाजिक जाणीव आणि सामूहिक सहभाग या मूल्यांना
प्रोत्साहन देण्यात आले. अभियानाच्या सांगतेनिमित्त आयोजित ही स्वच्छता मोहीम नियोजनबद्ध
पद्धतीने पार पडली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.
धीरज पाथ्रीकर व डॉ. फरिया खान, तसेच डॉ. संतोष ठोंबरे, डॉ. तेजश्री कच्छवे,
डॉ. गजानन नाईक, श्री. भारत शिंदे आणि श्री. विजय
गारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी सर्व आयोजक, प्राध्यापक,
अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून
समाधान व्यक्त केले. स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम न राहता ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा
अविभाज्य भाग व्हावी, तसेच स्वच्छ, सुंदर
आणि आरोग्यदायी परिसराच्या निर्मितीसाठी सर्वांनी सातत्याने योगदान द्यावे,
असेही त्यांनी नमूद केले.

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)



.jpeg)


