Monday, September 12, 2016

सुप्रसिध्‍द कवि प्रा. इन्‍द्रजित भालेराव यांच्‍या कवितांनी कृषीच्‍या विद्यार्थ्‍यात चढले स्‍फुरण

परभणी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यी आयोजीत गणेशोत्‍सवाच्‍या व्‍याख्‍यनमालेचे प्रा. इन्‍द्रजित भालेराव यांनी गुंफले दुसरे पुष्‍प
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या वतीने गणेशोत्‍सवानिमित्‍त विविध विषयावर व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक ८ सप्‍टेबर रोजी या व्‍याख्‍यानमालेचे दुसरे पुष्‍प सुप्रसिध्‍द कवी प्रा. इन्‍द्रजित भालेराव यांनी गुंफले. ाविद्यालयाच्‍या या परभणी येथी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले होते तर प्राचार्य डॉ. विलास पाटील, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. आर. डी. आहीरे, डॉ. पी. आर. झंवर, गणेशोत्‍सव समिती अध्‍यक्ष प्रविण पोपळघट, उपाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर कदम यांची व्‍यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमात कवी प्रा. इन्‍द्रजित भालेराव यांनी कवितेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांचे अर्थशास्‍त्र, समाजशास्‍त्र, मानसशास्‍त्र आदिंची मांडणी केली. कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यापीठ गीतांनी केली,  
‘शेती संस्‍कृतीचे कुळ’
‘शेती संस्‍कृतीचे कुळ शेती जीवनाचे मूळ
आम्‍ही लावितो कपाळी रान मळयातली धुळ
इथे शिकवितो आम्‍ही कसे वाढावे झाडाने
इथे ठरवितो आम्ही कसे पिकावे पाडाने
आम्‍ही संशोधनातून देश नेतो पुढे पुढे
शेतकरी बांधवांना आम्‍ही शिकवितो धडे
कसे होतील हिरवे आज सुकलेले माळ’

‘लढायला शिक’
‘शिक बाबा शिक लढायला शिक
कुणब्‍याच्‍या पोरा आता लढायला शिक
जातील हे दीस आणि होईलही ठीक
उद्या तुझ्या शेतामधी उधाणेल पीक
गाळलेल्‍या घामासाठी रस्‍त्‍यावर टीक
कुणब्याच्‍या पोरा आता लढायला शिक’  

या कवितेच्‍या माध्‍यमातुन कवीने शेतक-यांना लढणाचा संदेश दिला

‘दोस्‍ता’
ही कविता सादर करून गावाकडील परिस्थितीचे भान करून दिले

‘काटयाकुटयाचा तुडवित रस्‍ता
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्‍ता
जेव्‍हा दुष्‍काळ, दुष्‍काळ घिरटया घाली
तव्‍हा गावाला, गावाला कुणी ना वाली
कसे सुगीत घालतात गस्‍ता माझ्या गावाकडं.....
या भूमीचा, भूमीचा मूळ अधिकारी
बाप झालाय, झालाय आज भिकारी
गाव असून झालाय फिरस्‍ता, माझ्या गावाकडं...’

‘आधी घडवा चरित्र आपले
घडवा आपला गाव
मग घ्‍या छत्रपतीचे नाव’

या कवितेतुन विद्य‍ार्थ्‍यांना आपले चरित्र घडविण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.


अध्‍यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. डि एन गोखले म्‍हणाले की, प्रा इन्‍द्रजित भालेराव कवितेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांचे असलेले विदारक चित्र सर्वस्‍तरापर्यंत पोहचविण्‍याचे मोठे कार्य करीत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केदार यांनी केले तर प्रमुख व्‍यक्‍त्‍यांचा परिचय ज्ञानेश्‍वर शिंदे यांनी दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप खरबळ यांनी केले तर आभार स्‍वप्‍निल भोसले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्या‍र्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Sunday, September 11, 2016

गृहविज्ञान विस्‍तार व संदेशवहन व्‍यवस्‍थापन विभागात छायाचित्रीकरणावर तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या गृहविज्ञान विस्‍तार व संदेशवहन व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या वतीने दिनांक १ ते ३ सप्‍टेंबर दरम्‍यान छायाचित्रिकरण (व्हिडीयोग्राफी) या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न झाले. सदरिल प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थीना विविध कॅमे-यांची ओळख, विविध प्रकाराचे चित्रीकरण, एडिटींग, मिक्सिंग आदी विषयावर प्रात्‍यक्षिकांसह मार्गदर्शन करण्‍यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप महिला आर्थिक विकास महामंडहचे जिल्‍हा समन्‍वयक श्री एम सी पटेल यांच्‍या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रशिक्षणाचे समन्‍वयीका डॉ प्रभा अंतवाल या होत्‍या तर श्री. योगेश देशमुख हे विशेष अतिथी होते. विद्यापीठातील सोळा विद्यार्थ्‍यांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदविला, समारोपीय कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ चित्रा बेल्लुरकर यांनी केले तर आभार सौ शितल राठोड यांनी मानले.

Thursday, September 8, 2016

वनामकृविच्‍या वतीने बदनापुर (जिल्‍हा जालना) येथे रबी शेतकरी मेळाव्याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचे कृषी विभाग (जिल्‍हा जालना) यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती दिनानिमित्‍त दिनांक १७ सष्‍टेबर रोजी बदनापुर (जिल्‍हा जालना) येथील कृषी महाविद्यालयात रबी पीक शेतकरी मेळाव्‍याचे सकाळी १०.३० वाजता आयोजन करण्‍यात आले असुन मेळाव्‍याचे उद्घाटन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषी व फलोत्‍पादन मंत्री तथा विद्यापीठाचे प्रती कुलपती मा. ना. श्री. पांडूरंगजी फुंडकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे. मेळाव्‍यास परिवहन व खारभुमी विकास मंत्री मा. ना. श्री. दिवाकररावजी रावते, पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री तथा जालन्‍याचे पालकमंत्री मा. ना. श्री. बबनराव लोणीकर व वस्‍त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्‍स्‍यविकास राज्‍यमंत्री मा. ना. श्री. अर्जुन खोतकर यांची प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थिती लाभणार असुन जालना जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष मा. श्री. तुकाराम जाधव, पुणे येथील कृषी परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. डॉ. राम खर्चे, जालना लोकसभा सदस्‍य खासदार मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे, विधान परिषद सदस्‍य आमदार मा. श्री. विक्रम काळे, विधान परिषद सदस्‍य आमदार मा. श्री. सतिश चव्‍हाण, विधान परिषद सदस्‍य आमदार मा. श्री. सुभाष झांबड, विधानसभा सदस्‍य आमदार मा. श्री. राजेश टोपे, विधानसभा सदस्‍य आमदार मा. श्री. नारायण कुचे, विधानसभा सदस्‍य आमदार मा. श्री. संतोष दानवे, विभागीय आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट व कृषी आयुक्‍त मा. श्री. विकास देशमुख यांची विशेष अतिथी म्‍हणुन उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार आहेत. मेळाव्‍यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ रबी पीकाबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करणार असुन विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारित प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे, तरी मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बाळासाहेब भोसल, कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे, जालना जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. दशरथ तांभाळे व बदनापुर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

Wednesday, September 7, 2016

कृषी शिक्षणात मुल्‍य शिक्षणाचा अंंतर्भाव करावा लागेल......शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण

गणेशोत्‍सव २०१६ आयोजित व्‍याख्‍यानामालेचे गुंफले पहिले पुष्‍प
समाज निर्मितीत शिक्षकाचा मोठा वाटा असुन विद्यार्थ्‍यीचे व्‍यक्‍तीमत्‍व घडतांना त्‍याच्‍यावर शिक्षकांचे संस्‍कार होत असतात, विद्यार्थ्‍यी हे सर्व गुरूचे संचित असतात. आज शिक्षकांची जबाबदारी वाढली असुन विद्यार्थ्‍यीच्‍या अनेक अपेक्षा आहेत. आजचे शिक्षण व्‍यवस्‍थेत भौतिकसुखाच्‍या दृष्‍टीने विद्यार्थ्‍यांना अध्‍यायन केले जाते, कृषी शिक्षणात आज मुल्‍य शिक्षणाचा अतंर्भाव करावा लागेल, असे मत शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या वतीने गणेशोत्‍सव २०१६ निमित्‍त व्‍यक्‍तीमत्‍व विकासासाठी व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले असुन शिक्षण दिनाचे औजित्‍य साधुन दिनांक ६ सप्‍टेबर रोजी आदर्श शिक्षक व आजचे विद्यार्थी या विषयावर शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांच्‍या भाषणाने व्‍याख्‍यानमालेचे पहिले पुष्‍प गुंफण्‍यात आले. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ उद्य खोडके, विभाग प्रमुख डॉ डि एन धुतराज, डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ आर डी आहीरे, प्रा एन जे लाड, गणेशोत्‍सव अध्‍यक्ष प्रविण पोपळघट, उपाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन यांनी अनेक भुमिकेतुन समाजास योगदान दिले, परंतु शिक्षक म्‍हणुन त्‍यांचे मोठे योगदान असुन त्‍यांचा जन्‍मदिन भारतात शिक्षक दिन म्‍हणुन साजरा करतो. विविध जयंती, उत्‍सव, सण आदीं साजरे करतांना विचाराच्‍या जागर करण्‍याची संधी असते, यात विद्यार्थ्‍यी घडत असतात, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ विलास पाटील, डॉ आनंद कार्ले, प्रा विजय जाधव आदीसह ज्ञानेश्‍वर शिंदे, शुभम गोदरे, निखिल मुळे, लक्ष्‍मण कदम, पंकज घोडके, प्रीती गायकुळे विद्यार्थ्‍यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्‍यांनी गुरूजनवर्गांचा सत्‍कार केला. शाम थोरे यांनी स्‍वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्‍ता भोसले यांनी केले तर आभार सदानंद देवकते यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Monday, September 5, 2016

हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर कोरडवाहु क्षेत्रात करडई पीकास मोठा वाव......मा. डॉ. जे. एस. संधु

वनामकृवित राष्‍ट्रीय पातळीवरील करडई व जवस पीकासंबंधी शास्‍त्रज्ञांची वार्षिक गट बैठक संपन्‍न
देशभरातील विविध राज्‍यातील सव्‍वाशे शास्‍त्रज्ञांचा सहभाग
वनामकृवित राष्‍ट्रीय पातळीवरील करडई व जवस पीकासंबंधी शास्‍त्रज्ञांची वार्षिक गट बैठकीच्‍या उद्घाटन प्रसंगी मा. डॉ. जे. एस. संधु, कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु डॉ. बी. बी. सिंग,  डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ. विष्‍णुवर्धन रेडडी, डॉ. पी. के. सिंग, मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, डॉ. अशोक ढवण, डॉ. बी. बी. भोसले आदीं
मार्गदर्शन करतांना डॉ. जे. एस. संधु
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
आज भारतास खाद्यतेल मोठया प्रमाणावर आयात करावे लागत असुन पुढील दहा वर्षात ही मागणी मोठया प्रमाणात वाढणार आहे. यासाठी तेलबिया पीकांच्‍या लागवडी खालील क्षेत्र वाढविणे आवश्‍यक असुन करडई सारख्‍या कमी पाण्‍यावर येणा-या पीकांना अधिक महत्‍व द्यावे लागेल. हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर कोरडवाहु क्षेत्रात करडई या पीकास मोठा वाव असल्‍याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक मा. डॉ. जे. एस. संधु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे राष्ट्रीय पातळीवरील करडई व जवस पीकांसंबंधी शास्‍त्रज्ञांची वार्षिक गट बैठकीचे आयोजन दिनांक २ ते ४ सप्टेंबर दरम्‍यान करण्‍यात  आले होते, बैठकीत उपस्थित शास्‍त्रज्ञांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. बैठकीच्‍या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होत तर आयसीएआर चे सहाय्यक महानिदेशक डॉ. बी. बी. सिंग, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, हैद्राबाद येथील भारतीय तेलबीया संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. विष्‍णुवर्धन रेडडी, डॉ. पी. के. सिंग, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. जे. एस. संधु पुढे म्‍हणाले की, जवस या पीकास तेलबीया पीक पेक्षा तंतुमय पीक म्‍हणुन प्रसार करावा लागेल. शेतक-यांच्‍या परिस्थितीशी अनुकूल तंत्रज्ञान दिले तरच त्‍याचा अवलंब शेतकरी करतील, यासाठी कृषी शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या गरजा व मागणी नुसार संशोधन करावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, इतर खाद्यतेलाच्‍या तुलनेत करडई तेलात पोषणमुल्‍य अधिक आहेत, करडई तेलाचा औषधी व सौ़दर्य प्रसाधनात वापर मोठया प्रमाणात करणे शक्‍य आहे. तसेच जवस पीकाच्‍या धाग्‍यापासुन तयार कापडयास लोकांची मागणी वाढत आहे, यास मोठी आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठ उपलब्‍ध असुन या पीकातील औषधी मुल्‍य वाढण्‍याच्‍या दृष्‍टीने संशोधनाची गरज आहे.
प्रास्‍ताविकात संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी करडई पिकांच्‍या वाणाबाबत वनामकृविचे मोठे योगदान असुन विद्यापीठ विकसित परभणी कुसुम (परभणी-१२), बिनकाटेरी वाण परभणी-४०, परभणी ८६ (पुर्णा) आदी वाणांची लागवड राज्‍याच नव्‍हे तर इतर राज्‍यात मोठया क्षेत्रावर केली जात असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे यांनी केले तर करडई पैदासकार डॉ एस बी घुगे आभार मानले. बैठकीस महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा, आसाम, मेघालय आदी राज्यामधुन करडई व जवस पीकासंबंधी १२५ शास्त्रज्ञ उपस्थित होते. बैठकीत करडई व जवस पिकांबाबत संशोधनाबाबत चर्चा करून या पीकाच्‍या पुढील संशोधनाची दिशा निश्चित करण्‍यात आली.

Saturday, September 3, 2016

मराठवाडयातील पीक पध्‍दतीत बदल करावा लागेल....... आमदार मा. डॉ. राहुल पाटील

विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरील अंतर्गत विशेष पीक संरक्षण मोहीमेचे उद्घाटन

अनिश्चित पर्जन्‍यमान व हवामान, कमी उत्‍पादकता, शेतमालास कमी भाव आदी अनेक समस्‍या शेतक-यांपुढे असुन शेतकरी आत्‍महत्‍या होत आहेत. यासाठी आपणास पीक पध्‍दतीत बदल करावा लागेल, शेतक-यांना शाश्‍वत पाणी व वीजेचा पुरवठा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन परभणीचे आमदार तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. राहुल पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या वतीने राबविण्‍यात येत असलेल्‍या विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी अंतर्गत विशेष पिक संरक्षण मोहीमेच्‍या उद्घाटन (२ सप्‍टेंबर रोजी) प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. प्रल्‍हाद शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, प्राचार्य डॉ. पी. एन. सत्‍वधर, प्राचार्य डॉ. ए. एस. कदम, प्रगतशील शेतकरी श्री प्रताप काळे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मा. डॉ. राहुल पाटील पुढे म्‍हणाले की, कृषी विद्यापीठातील मर्यादित मनुष्‍यबळामुळे संशोधन व विस्‍तार कार्यावर मर्याद येत आहेत. अनेक प्रगतशील शेतकरी नवनवीन कृषी तंत्रज्ञान वापरत आहेत, अनेक शेतकरी संशोधक असुन त्‍यांच्‍या संशोधनाचा समावेश विद्यापीठाच्‍या संशोधन करावा. विद्यापीठास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुलगुरु लाभल्यामुळे कोरडवाहू शेती संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचविण्याचे काम कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे सातत्याने केले जाते, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त करून विद्यापीठाच्या या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, विद्यापीठ आपल्‍या दारी मोहिमे अंतर्गत विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ योग्‍य वेळी, योग्‍य मार्गदर्शन प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन देत असुन याचा फायदा शेतक-यांना होत आहे.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी. बी. भोसले यांनी विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी अंतर्गत चालु असलेल्‍या विशेष पिक संरक्षण मोहीमेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले. याप्रसंगी आमदार मा. डॉ. राहुल पाटील यांच्‍या हस्‍ते सदर मोहीमेच्‍या वाहनांना हिरवा झेंडा दाखविला. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व प्रगतशील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माहिती केंद्राचे प्रा. डी. डी. पटाईत, डॉ. एम. व्ही. कुलकर्णी, एस. बी. जाधव, के. डी. कौसडीकर, व्ही. एस. सातपुते, अशोक पंडित, हनुमान बनसोडे, गणेश कटारे, उत्तम बेद्रे, पांडुरंग डिकळे आदींनी परिश्रम घेतले.
शेतक-यांच्या प्रत्‍यक्ष शेतावर कृषी शास्‍त्रज्ञांनी भेट देऊन मार्गदर्शन करण्यासाठी कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु व विस्तार शिक्षण संचालक मा. डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषि विभाग यांच्या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्ह्रयात विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रांच्या व कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून, सर्व घटक महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनांच्या सहकार्याने विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी अंतर्गत विशेष पिक संरक्षण मोहीम गेल्‍या आठवडयापासुन दिवसापासुन राबविण्‍यात येत आहे. परभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने परभणी व हिंगोली जिल्ह्राकरिता सदरिल कार्यक्रम दि. २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येत असुन या दोन जिल्हयाकरिता शास्त्रज्ञांचे एकूण चार चमु करण्यात आले असुन छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन प्रक्षेत्र भेट अशा स्वरुपाचे कार्यक्रम घेण्‍यात येत आहेत. साधारणत: १५ दिवसांचा कालावधीत परभणी व हिंगोली जिल्हयातील एकूण ७० गांव मध्‍ये राबविण्‍यात येणार असुन आजपर्यंत ४७ गावात सदर कार्यक्रम राबविण्‍यात आला आहे. तसेच मराठवाडयातील साधारणत: ३५० ते ४०० गावांमध्ये १५ सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.

Thursday, September 1, 2016

वनामकृविच्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात चर्चासत्र संपन्‍न

वनामकृवि विकसित नांदेड-४४ बीटी वाण लवकरच.......कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
वनामकृविच्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राद्वारे प्रसारीत एनएचएच-४४ हा लोकप्रिय संकरीत कपाशीचा वाण बीटी जनुकयुक्त (बीजी-२) स्वरूपात परिवर्तीत करण्याचे काम प्रगतीपथावर असुन येणा-या हंगामात प्रायोगिक तत्‍वावर या वाणाच्या बियाणे काही प्रमाणात महाबीज मार्फ़त वितरीत करण्यात येतील, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी दिली. वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्‍या वतीने दिनांक ३१ ऑगस्ट रोजी आयोजीत कापूस पीकावरील कीड व रोग व्यवस्थापन विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री. केदार साळुंके पाटील, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री लाडके, केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्हणाले की, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील २० अमेरिकन सरळ वाणांमध्ये बीजी-१ बीटी जनुकाचा अंतर्भाव करण्‍यात आला असुन यापैकी तीन वाण हे वनामकृवि विकसीत आहेत. तर सघन लागवडीत उच्च उत्पादकता असणा-या १४ देशी वाणांपैकी चार वाण हे वनामकृवि विकसीत आहेत. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त वर्षभर विवीध कार्यक्रम घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कापूस पीकामध्ये येणा-या नवनवीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्नशील रहावे, अशी सुचना मा. श्री. केदार साळुंके यांनी मांडली. शेंदरी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शेतक‌-यांनी लागवडीपासून सजग राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. तुकाराम मोटे यांनी आपल्‍या भाषणात केले.

कपाशीवर येत असलेली शेंदरी बोंडअळी व ईतर किड-रोग यांच्या व्यवस्थापनाकरीता वाढत जाणारा खर्च कमी करणे व योग्य वेळी उचित व्यवस्थापन याबाबत माहिती देण्‍यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले होते. शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची कारणे व व्यवस्थापनाबाबतची सचित्र माहिती देणा-या कापूस संशोधन केंद्राने तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन व वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांनी केले. चर्चासत्रात डॉ. शिवाजी तेलंग, डॉ. अशोक जाधव, डॉ. पवन ढोके, प्रा. अरविंद पांडागळे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्राच्‍या धनेगांव प्रक्षेत्रावर घेण्‍यात आलेल्‍या एनएचएच-४४ जनुक परिवर्तीत संकरीत वाणासह इतर विवीध वाण व लागवडपद्धती आदी प्रयोगांची पाहणी मान्यवर व शेतक-यांनी केली. चर्चासत्रास कृषि विभाग व आत्माचे अधिकारी-कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.