Monday, January 2, 2017

वनामकृविच्‍या वतीने डिसेंबर, २०१७ मध्‍ये औरंगाबाद येथे “जागतिक वातावरण बदल : शेती व जलक्षेत्रावर होणारे परिणाम“ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद

विविध देशातील शास्‍त्रज्ञांचा राहणार सहभाग
महाराष्ट्र राज्‍यातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्था आणि पुणे येथील कृषि संशोधन व तंत्रज्ञान नियतकालिक यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १६ डिसेंबर २०१७ दरम्यान “जागतिक वातावरण बदल : शेती व जलक्षेत्रावर होणारे परिणाम“ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये वातावरण बदल व परिवर्तन‍शिलता व प्रक्रिया, शेतीवरील परिणाम, हवामान बदलास जुळवून घेण्याची प्रक्रिया, हवामान बदलाची तीव्रता कमी करणे, हवामान बदल व जलसाठे, जनावरे व मत्‍स्‍य मध्ये हवामान बदलास जुळवून घेण्याची प्रक्रिया, वातावरण बदल व वारंवारता, आपत्ती व्यवस्थापन, पावसातील खंड, वातावरणातील उच्च घटना, हवामान बदलानुसार शेती, हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर अल्पभुधारक शेतकरी सक्षम होणे, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट या विषयावर विचारमंथन होणार आहे. महाराष्ट्रातील विशेषत: मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ याबरोबरच युरोपातील अनेक राष्ट्रांमधून या समस्या अलीकडच्या काळात वारंवार अनुभवास येत असल्याने त्यांचा कृषी उत्पादनावर व जलसाठ्यांवर अनिष्ठ परिणाम होऊन शेतक­यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्‍वभूमीवर सदरिल परिसंवादाचे औरंगाबाद येथे आयोजन करण्‍यात आले असुन मुख्‍य आयोजक परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे.
सदरील आंतरराष्ट्रीय परिसंवादास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक तथा प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मभुषण मा. डॉ. राजेंद्रसिंह परोडा, हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय कोरडवाडू संस्थेचे (इक्रिसॅट) महासंचालक मा. डॉ. डेव्हीड बर्गव्हिन्सन, पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाघ्‍यक्ष मा. डॉ. राम खर्चे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. परिसंवादाच्‍या आयोजन समितीमध्ये वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरूलू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. आर. जी. दाणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. तपस भट्टाचार्या, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांचा समावेश असुन सल्‍लागार समितीमध्‍ये श्रीलंका, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया येथील प्रख्यात शास्त्रज्ञ व देशातील विविध कृषि विद्यापीठांचे कुलगुरूंचा समावेश आहे. परिसंवादामध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, विद्यार्थी, अशासकीय संस्था तसेच प्रगतशील शेतकरी सहभागी होणार आहेत.
या परिसंवादाचे व्यवस्थापन करण्यासाठी सल्‍लागार व आयोजन समितिचे गठण करण्यात आले असुन परिवसंवादासंबंधी संपुर्ण माहिती www.ccaw2017.org या संकेत स्थळावर उपलब्ध असल्‍याचे वनामकृविचे संशोधन संचालक तथा मुख्‍य आयोजक डॉ. दत्तप्रसाद वासकर परभणी यांनी कळविले आहे.

माळेगांव येथील कृषि प्रदर्शनात वनामकृविच्‍या दालनास व्दितीय क्रंमाकाचे पारितोषिक

नांदेड जिल्‍हातील माळेगांव येथे दिनांक २७ ते ३१ डिसेंबर दरम्‍यान खंडोबा यात्रेनिमित्‍त कृषि व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल प्रदर्शनात कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्रे, कृषि विभाग व विविध कंपन्‍याचे सुमारे शंभर दालनाचा समावेश होता. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख, विस्‍तार शिक्षण अधिकारी प्रा. पी एस चव्‍हाण यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ विकसित विविध पिकांची वाणे, तंत्रज्ञान व जीवंन नमुने आदीचा समावेश असलेल्‍या विद्यापीठाच्‍या दालन मांडण्‍यात आले होते. विद्यापीठाच्‍या सदरिल दालनास प्रदर्शनाचे व्दितीय क्रमांकाचे उत्‍कृष्‍ट दालन म्‍हणुन प्रशस्‍तीपत्र देण्‍यात आले. विद्यापीठाच्‍या वतीने श्री वैजनाथ सातपुते यांनी प्रशस्‍तीपत्र स्‍वीकारले. प्रदर्शनात वै‍जनाथ सातपुते, कौसडीकर, घाडगे यांनी शेतक-यांना व मान्‍यवरांना विद्यापीठ तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली तर साखरे यांनी प्रदर्शनात सहकार्य केले. वनामकृविच्‍या दालनास नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. श्रीमती गुंडले, आमदार मा. श्री. प्रतापराव चिखलीकर, जि प उपाध्‍यक्ष मा. श्री दिलीप धोंडगे, नांदेडचे जिल्‍हाधिकारी श्री. सुरेश काकानी, माजी आमदार श्री. शंकरअण्‍णा धोंडगे आदी मान्‍यवरांसह शेतकरी, महिला शेतकरी, विद्यार्थ्‍यी यांनी मोठया संख्‍येने भेटी देऊन विद्यापीठाच्‍या वाणांची व तंत्रज्ञानाची माहिती घेतली, विशेषत: सोयाबीनचे एमएयुएस-१६२ व तुरीचे बीडीएन-७११ हे वाण आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली. स‍दरिल पारितोषिकाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी अभिनंदन केले.

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात स्वच्छतेसंबंधी अॅपबाबत मार्गदर्शन

परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत दिनांक ३१ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी स्वच्छतेसंबंधी अॅपच्या कार्यप्रणालीचे प्रशिक्षण संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक कडाळे हे होते तर परभाण्‍ी शहर महा‍नगरपालिकेच्‍या सहाय्यक आयुक्‍त श्रीमती श्रीमती विजया घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थी व कर्मचारी यांना शहरांच्‍या स्‍वच्‍छता अभियानात सहभाग नोंदवावा असा सल्‍ला अध्यक्षीय समारोपा प्राचार्य डॉ. अशोक कडाळे यांनी दिला तर सहाय्यक आयुक्त श्रीमती श्रीमती विजया घाडगे यांनी आपल्या भाषणात स्वच्छता अॅप डाऊनलोड करुन स्वच्छ सर्वेक्षण २०१७ शहराच्‍या स्वच्छता सेवेत योगदान देण्‍याचे आवाहन केले. सदरील अॅप केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने विकसित केलेले आहे. या अॅपच्या सविस्तर कार्यप्रणाली विषयी शेख अर्शद यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छतेविषयक काहीही समस्या असली तरी स्वच्छता अॅप त्याचे निराकरण करण्यास मदत करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रवींद्र शिंदे व कार्यक्रमाधिकारी संजय पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  स्वयंसेविका कल्पना भोसले, विकास सांगळे, विश्वजित थोरात आदि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. भास्कर भुइभार, प्रा. विवेकानंद भोसले, प्रा. स्मिता सोलंकी, प्रा. सुमंत जाधव, प्रा. सुहास जाधव, प्रा. हरीश आवारी, प्रा. सुभाष विखे, प्रा.श्याम गरुड, अमृत उबाळे आदीसह विद्यार्थ्‍यी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, January 1, 2017

कृषि महाविद्यालयात परभणी शहर महानगर पालिकेचे वतीने स्‍वच्‍छता अॅप कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात परभणी शहर महानगर पालिकेचे वतीने स्‍वच्‍छता अॅप कार्यशाळेचे आयोजन दिनांक ३१ डिसेंबर रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर सहाय्यक आयुक्‍त विजया घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात सहाय्यक आयुक्‍त विजया घाडगे यांनी स्‍वच्‍छता अॅपबाबत मार्गदर्शन करून अॅपचे जास्‍तीत जास्‍त महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यींनी डाऊनलोड करून शहर स्‍वच्‍छते अभियानात सहभाग घेण्‍याचे आवाहन केले. अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले की, कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात, परभणी शहर स्‍वच्‍छता अभियानात आपला हातभार लावुन सामाजिक बांधिलकी जपावी, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. कार्यक्रमात अरशद शेख यांनी स्‍वच्‍छता अॅपबाबत सविस्‍तर सादरिकरण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ के डि नवगिरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Friday, December 30, 2016

वनामकृविच्‍या महिला शेतकरी मेळाव्‍याचे तोंडापुर (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्रात आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय, हिंगोली येथील कृषि विज्ञान केंद्र व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग, हिंगोली यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दिनांक ३ जानेवारी रोजी तोंडापुर (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्रात सकाळी ११­.०० वाजता महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचे उद्घाटन सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन व अल्‍पसंख्‍याक विकास व वक्फ राज्‍यमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री मा. ना. श्री. दिलीप कांबळे यांच्‍या हस्‍ते होणार असुन हिंगोली लोकसभा संसद मा. खा. श्री. राजीव सातव व हिंगोली जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मा. सौ. लक्ष्‍मीबाई यशवंते हे विशेष अतिथी म्‍हणुन उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार असुन विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. अब्‍दुला खान दुर्राणी, मा. आ. श्री. विक्रम काळे, मा. आ. श्री. सतीश चव्‍हाण, मा. आ. श्री. रामराव वडकुते, विधानसभा सदस्‍य मा. आ. श्री. जयप्रकाश मुंदडा, मा. आ. श्री. तानाजी मुटकूळे, मा. आ. डॉ. संतोष टारफे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. एच. पी. तुम्‍मोड, कोल्‍हापुर येथील स्‍वयंसिध्‍दा संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात शेतकरी महिलाचे काबाटकष्‍ट कमी करणारे तंत्रज्ञान, अन्‍न व फळप्रक्रिया तंत्रज्ञान, बालकांचा विकास आदी विषयांवर विद्यापीठाचे तज्ञ मार्गदर्शन करणार असुन नाबार्डच्‍या वतीने कॅशलेस प्रणालीबाबत मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. याप्रसंगी कृषि प्रदर्शनाचेही आयोजन करण्‍यात आले असुन यात विद्यापीठ तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनांचा व महिला बचत गटाच्‍या दालनांचा समावेश राहणार आहे. सदरिल मेळाव्‍यास शेतकरी महिलांनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री विजय लोखंडे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटनम यांनी केले आहे.

Thursday, December 29, 2016

पालम येथे शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्‍न

टिप - सदरिल बातमी प्राचार्या, गृहविज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त

Wednesday, December 28, 2016

ऊती संवर्धन तंत्रज्ञान आर्थिकदृष्‍टया किफायतीशीर झाले पाहिजे...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलुक्युलर तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

ऊती संवर्धनाच्‍या माध्‍यमातुन विविध पिकांच्‍या गुणवत्‍तेत व उत्‍पादकतेत सुधारणा करण्‍यास मोठा वाव आहे, पंरतु हे तंत्रज्ञान आर्थिकदुष्‍टया किफायतीशीर झाले पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभागाच्‍या वतीने व भारत सरकारच्‍या जैवतंत्रज्ञान विभागाच्‍या सौजन्‍याने चौदा दिवसीय दिनांक २७ डिसेंबर ते ९ जानेवारी दरम्‍यान वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलुक्‍युलर तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक २७ डिसेंबर रोजी स‍दरिल प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपूजे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, विभाग प्रमुख तथा प्रशिक्षणाचे आयोजक डॉ. डि. बी. देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, आज ऊस व केळी ऊती संवर्धीत रोपांपासुन शेतकरी चांगले उत्‍पादन घेत आहेत, परंतु हया तंत्रज्ञानापासुन विकसित रोपांची किंमत अधिक असल्‍यामुळे त्‍याच्‍या वापरावर मर्यादा येत आहे. त्‍याकरिता ऊती संवर्धन तंत्रज्ञान कमी खर्चिक करण्‍यासाठी शास्‍त्रज्ञांनी प्रयत्‍न करावा. आज मर्यादीत पिकांतच याचा वापर होत असुन तुर, हरभरा व इतर फळपिकांत याचा वापर शक्‍य आहे. देशाच्‍या वाढणा-या लोकसंख्‍येसाठी अन्‍नसुरक्षेचे उदिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्‍याचे प्रतिपादन विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपूजे यांनी आपल्‍या मार्गदर्शनात केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ. डि बी देवसरकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. मीना वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ गोदावरी पवार यांनी केले. सदरिल प्रशिक्षणात राज्‍यातील विविध विद्यापीठातील, महाविद्यालयातील व संशोधन केंद्रातील प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञ सहभागी झाले आहेत. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक व प्रशिक्षणार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.