वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची रेशीम संशोधन योजना, , कृषि विभाग, आत्मा, केंद्रीय रेशीम बोर्ड, जिल्हा रेशीम कार्यालय आणि अग्रणी बँक, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सिल्क अँड मिल्क’ शेतकरी कार्यशाळा दिनांक २६ जुलै २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेस परभणी जिल्ह्यातील ६०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात बाल्य व प्रौढ रेशीम कीटक संगोपन तंत्रज्ञान, तुती लागवड तंत्रज्ञान, उझी माशी व्यवस्थापन, रेशीम उद्योगासाठीच्या विविध
शासकीय योजना तसेच दुग्ध व्यवसाय वृद्धीविषयी तज्ज्ञ आणि अनुभवी रेशीम उत्पादक
शेतकऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या उद्घाटक तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक
बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय
ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी
परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’ हा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
तुती लागवडीपासून रेशीम कोष उत्पादन आणि वस्त्रनिर्मितीपर्यंतचा संपूर्ण रेशीम हब
परभणी जिल्ह्यात उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे स्थानिक
युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त
केला. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर कोणतीही अडचण येऊ
दिली जाणार नाही, असे
स्पष्ट करत त्यांनी रेशीम उत्पादनासाठी आधुनिक बाजारव्यवस्था विकसित करणे, रेशीम वस्त्रनिर्मितीस चालना देणे, ‘रेशीम भवन’ उभारण्यासाठी प्रयत्न
करणे तसेच जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) मार्फत ‘सिल्क अँड मिल्क’साठी
स्वतंत्र योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. जिल्ह्यातील
अधिकाधिक शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करत त्यांनी
उत्पन्नवाढीसाठी पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम शेती आणि दुग्धव्यवसायाची जोड देण्याची
गरज अधोरेखित केली. “रेशीम शेतीची आस धरा, लक्ष्मी येईल तुमच्या घरा” या
संकल्पनेवर आधारित ‘सिल्क विथ मिल्क’ हे मॉडेल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी
प्रभावी ठरेल, असा विश्वास माननीय पालकमंत्री
यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी
कमी गुंतवणुकीत अधिक उत्पन्न देणारा आणि रोजगारनिर्मितीस चालना देणारा प्रभावी
पूरक व्यवसाय असल्याचे सांगितले. बदलत्या कृषि परिस्थितीत पारंपरिक शेतीसोबत रेशीम
व्यवसायाचा स्वीकार करून शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे विविधीकरण करत आर्थिक स्वावलंबन
आणि शाश्वत प्रगती साधावी, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक यांना ‘सिल्क अँड
मिल्क’ प्रकल्पांतर्गत पात्र शेतकऱ्यांना आवश्यक वित्तीय सहाय्य वेळेत उपलब्ध
व्हावे, यासाठी कर्ज मंजुरी व वितरणाची
प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक
आणि गतिमान करण्याचे आवाहन केले. शेतकरी, विद्यापीठ, बँका आणि विविध शासकीय संस्थांमधील समन्वयातून हा
प्रकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त
केला.
माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण(भाप्रसे) यांनी सांगितले की, पारंपरिक पिकांमधून वर्षातून एकदाच
उत्पन्न मिळते आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे त्यात नुकसान होण्याची शक्यता असते.
मात्र, रेशीम उद्योगामध्ये वर्षभरात ८ ते
९ कोषपिके घेता येत असल्यामुळे अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम
उद्योगासोबत दुग्ध व्यवसायही स्वीकारावा. परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’मुळे
अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याची उदाहरणे त्यांनी यावेळी नमूद केली.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक श्री. वाय. व्ही. एस. एस. नागेश्वरराव
यांनी बँकेच्या कर्जवाटप धोरणाविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.
श्रीमती नतिशा माथुर (भाप्रसे), संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.
प्रशांत देशमुख, प्रादेशिक प्रबंधक, एसबीआय श्री. दिनेश झा, श्री. शिवाजी भरोसे, डॉ. केदार खटिंग व श्री. रामचंद्र
अकुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत ‘मेरा
रेशीम मेरा अभिमान २.०’ या अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात
आला. अभियानाची माहिती केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ-‘डी’ श्री. अशोक जाधव
यांनी दिली. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा) -२.० योजनेची घडीपत्रिका
प्रकल्प संचालक (आत्मा), परभणी श्री. दौलत चव्हाण यांनी मान्यवरांच्या हस्ते
प्रकाशित केली. ग्लोबल विकास ट्रस्टचे श्री. मुक्तेश्वर कडभाने यांनी ट्रस्टतर्फे
देण्यात येणाऱ्या अनुदान योजनांची माहिती दिली.
यावेळी ‘सिल्क अँड मिल्क’ या संकल्पनेच्या
लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच २१ प्रगतशील शेतकऱ्यांना माननीय पालकमंत्री
महोदया व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. रेशीम
उद्योगाच्या प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सेवानिवृत्त रेशीम
शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत लटपटे यांना ‘सेवागौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात
आले.
परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’ संकल्पनेच्या विस्तारासाठी योगदान
दिल्याबद्दल श्री. सुनील हट्टेकर, श्री. गोविंद कदम आणि श्री. शंकर वराट यांचा सन्मान
करण्यात आला. तसेच महाराष्ट्रात जैविक पद्धतीने रेशीम कीटकांवरील नुकसानकारक उझी
माशी व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार केल्याबद्दल रेशीम संशोधन योजनेचे
डॉ. संजोग बोकन व श्री. धनंजय मोहोड यांना केंद्रीय रेशीम बोर्ड आणि रेशीम संचालनालयातर्फे
पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंचालक (रेशीम), छत्रपती संभाजीनगर डॉ. महेंद्र ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. सुनील हट्टेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संजोग बोकन यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सागर मिसाळ, श्री. रमेश इक्कर, श्री. दत्ता जटाळे, श्री. परमेश्वर भंडारे आणि श्री. व्यास यांनी विशेष परिश्रम घेतले.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)

