यावर्षी अल निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सूनच्या आगमनास
विलंब झाला असून पावसाची सुरुवात अनियमित झाली. त्यामुळे सोयाबीनची पेरणी सर्वत्र
एकाच वेळी न होता टप्प्याटप्प्याने झाली. तसेच अनेक भागांमध्ये आतापर्यंत झालेला पाऊस
सरासरीपेक्षा कमी असल्याने सोयाबीनची अपेक्षित वाढ होताना दिसून येत नाही. अशा
परिस्थितीत जमिनीतील अपुऱ्या आर्द्रतेमुळे व प्रतिकूल वातावरणामुळे सोयाबीनच्या
मुळांद्वारे आवश्यक अन्नद्रव्यांचे, विशेषतः
लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण व्यवस्थित होत नाही. परिणामी, सोयाबीनच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत पाने पिवळी किंवा पांढरट पडणे
(क्लोरोसिस) ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या समस्येच्या
पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. गजानन गडदे, डॉ. दिगंबर पटाईत आणि
श्री. मधुकर मांडगे या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे एकात्मिक व्यवस्थापनाच्या
उपाययोजना अवलंबण्याचे आवाहन केले आहे.
क्लोरोसिस म्हणजे काय?
लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्याचे झाडाकडून पुरेसे
शोषण न झाल्यास सोयाबीनमध्ये क्लोरोसिस ही शारीरिक विकृती दिसून येते. ही समस्या
केवळ जमिनीत लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे उद्भवत नाही, तर जमिनीत लोह उपलब्ध असूनही ते झाडांना शोषून घेता न आल्यामुळे निर्माण
होते.
लक्षणे
लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता सर्वप्रथम
कोवळ्या पानांवर दिसून येते. पानांच्या शिरा हिरव्या राहतात, तर शिरांमधील भाग पिवळा पडतो. सुरुवातीची त्रिदलीय (ट्रायफोलिएट) पाने
काही काळ हिरवी राहतात, तर नवीन पानांवर लक्षणे स्पष्ट
दिसतात. हरितद्रव्याचे प्रमाण कमी
झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते. झाडांची वाढ खुंटते व उत्पादनात घट
येते.
कारणे
चुनखडीयुक्त व कमी निचऱ्याच्या जमिनीत ही समस्या अधिक
प्रमाणात आढळते. जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असल्यास लोह पिकांना उपलब्ध
स्वरूपात राहत नाही. ते फेरिक स्वरूपात रूपांतरित झाल्यामुळे पिकांना शोषून घेता
येत नाही. जमिनीत जास्त ओलावा किंवा मुळांना ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्यास लोहाचे
शोषण कमी होते. पावसाची उघडीप, ढगाळ वातावरण व
प्रतिकूल मृदा परिस्थितीमुळेही लोहाचे शोषण बाधित होऊ शकते.
एकात्मिक व्यवस्थापन
पाण्याचा ताण पडल्यास तुषार सिंचनाद्वारे संरक्षित पाणी
द्यावे. ईडीटीए चिलेटेड मिश्र सूक्ष्म अन्नद्रव्य (ग्रेड–२) ५० ग्रॅम किंवा ५०
मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार ८–१० दिवसांनी
दुसरी फवारणी करावी. ज्या शेतात अतिरिक्त पाणी साचले असेल तेथील पाण्याचा त्वरित
निचरा करून वाफसा स्थिती निर्माण करावी. वापसा आल्यानंतर व पीक ३०–३५ दिवसांचे
होण्यापूर्वी एक कोळपणी करावी.
महत्त्वाच्या सूचना
सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी शक्यतो सकाळी किंवा
सायंकाळी करावी. त्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण अधिक प्रभावी होते. शिफारशीत
मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करू नये. जास्त
प्रमाणामुळे पानांवर करपण्याची शक्यता असते. जमिनीचा सामू (पीएच) जास्त असलेल्या
शेतात नियमित सेंद्रिय खतांचा वापर केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता
सुधारण्यास मदत होते. क्लोरोसिसची सुरुवातीची लक्षणे दिसताच त्वरित उपाययोजना
केल्यास प्रकाश संश्लेषण सुरळीत राहून उत्पादनातील संभाव्य घट टाळता येते.
अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा
व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.

.jpeg)

.jpeg)

