Monday, August 14, 2023

वनामकृविच्‍या वतीने आमदार माननीय श्री रत्‍नाकर गुट्टे यांच्‍या मौजे बनपिंपळा येथील शेतीत ड्रोनव्‍दारे फवारणीचे प्रात्‍यक्षिक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक १३ ऑगस्‍ट रोजी मौजे बनपिंपळा येथील आमदार मा श्री रत्‍नाकर गुट्टे यांच्‍या शेतात ड्रोनव्‍दारे फवारणीचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले. यावेळी आमदार मा श्री रत्‍नाकर गुट्टे, कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, युवा उद्योजक श्री सुनीलजी गुट्टे, गंगाखेड शुगरचे मुख्‍याधिकारी राजेंद्र डोंगरे, श्री प्रल्‍हादराव मुरकुटे, श्री संदीप आळनुरे, श्री हनुमंत मुंडे, रामप्रसाद सातपुते, श्री बालासाहेब लटपटे, सरपंच श्री गोविद सानप, श्री स्‍वप्निल मुंडे, आदीसह शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठात चालु असलेल्‍या आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल तंत्रज्ञान यावरील संशोधनाची माहिती माननीय आमदार श्री रत्‍नाकर गुट्टे यांना दिली.






Sunday, August 13, 2023

कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांनी केले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन

तीन दिवसात हिंगोली जिल्‍हयातील आठ गांवातील शेतकरी बांधवाच्‍या प्रक्षेत्राची पाहणी 

वसुंधरा फाउंडेशन व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांचे शेतकऱ्यांच्या बांधावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे दिनांक ९ ते ११ ऑगस्‍ट दरम्‍यान हिंगोली जिल्‍हयात आयोजन करण्‍यात आले होते. दिनांक ९ ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील वाकोडी, माळधामणी व बोल्डावाडी तर दिनांक १० ऑगस्ट रोजी हिंगोली तालुक्यातील भिंगी, आंबाळा, चिंचाळा, तर दिनांक ११ ऑगस्ट रोजी सेनगाव तालुक्यातील भगवती, वरखेडा या गावांमध्ये विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी पीक पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यात विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे आणि सहाय्यक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  या प्रक्षेत्र भेटी दरम्‍यान सोयाबीनवर ब-याच ठिकाणी  पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो असुन शेतकऱ्यांनी वेळीच या रोगाला ओळखून त्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. यात प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून त्यांना जाळून किंवा जमिनीत पुरून नष्ट करणे गरजेचे आहे, तसेच रोगाचा प्रसार करणा-या पांढ-या माशीचे व्यवस्थापन शिफारस केलेल्या किटकनाशकाची फवारणी करून करणे गरजेचे आहे.

सोयाबीनची वाढ कमी झाली असल्यास, वाढीसाठी १९:१९:१९ या विद्राव्य खताची व ग्रेड-२ चे माइक्रोन्युट्रीएंट ची फवारणी करण्याचा सल्‍ला विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी दिला. सोयाबीनमधील अन्नद्रव्यांचा कमतरतेमुळे होणारा पिवळेपणा (क्लोरासीस), पाने खाणाऱ्या अळ्या, चक्री भुंगा व खोड माशीच्या व्यवस्थापन विषयीही सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, ज्यामध्ये विविध पिकांमधील मधील तण नियंत्रण, हळद पिकाची बेडवरील लागवड, कंदमाशी नियंत्रण, हुमणी नियंत्रण करण्यासाठी उपाय व विविध पिकांतील खत व्यवस्थापन, त्याच बरोबर कापूस पिकावरील रसशोषक किड,लाल्या रोग, बोंडअळी अशा विविध प्रकारच्या किडींचे व रोगांचे व्यवस्थापन करण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांना कीटकनाशके फवारणी करतांना एकापेक्षा जास्त कीटकनाशके मिसळून फवारण्या करू नये तसेच फवारणी करतांना किटकनाशकामुळे मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी योग्य काळजी घेऊनच फवारणी करावी असे सांगितले. विद्यापीठामध्ये उपलब्ध विविध जैविक निविष्ठांचा वापर करण्‍याचा सल्‍ला दिला. शेती विषयक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी माहिती घेण्यासाठी विद्यापीठाचे विविध प्रसार माध्यमे जसे की विविध मोबाईल ॲप्लिकेशन, फेसबुक, यूट्यूब चैनल, ब्लॉग द्वारे विद्यापीठाशी संपर्कात राहावे आणि अधिक माहिती करिता विद्यापीठाची कृषी वाहिनी क्रमांक ०२४५२-२२९००० या संपर्क करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले. कार्यक्रमात गोदा फार्मचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.नितीन चव्हाण, वसुंधरा फाउंडेशन, संचालक श्री.गोविंद पाटील व वसुंधरा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिनेश मंगीराज व टीम वसुंधरा फाउंडेशन उपस्थित होते.









Saturday, August 12, 2023

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात मेरी माटी, मेरा देश उपक्रम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमानिमित्त देशात व राज्यात “मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रम दिनांक ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत असुन त्या अनुषंगाने दिनांक ९ ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने  हा उपक्रम राबविण्‍यात आला. उपक्रमात सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांच्या सह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हातात माती घेऊन पंचप्राण शपथ घेतली. देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना वंदन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह अभियान राबविण्यात आले.

मार्गदर्शनात डॉ. खोडके म्‍हणाले कि, भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकसंख्या असलेला व पाचव्या क्रमांकावरील आर्थिक महासत्ता असलेला देश आहे. भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी ज्या शहीद, स्वातंत्र्यसैनिक व वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व त्त्यांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत असतानाच त्यांच्या कार्याचे व त्यागाचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व ज्ञात व अज्ञात देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची संधी म्हणजे मेरी माटी, मेरा देश उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक, शासकीय कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख प्रा.भास्कर भुइभार, डॉ.स्मिता खोडके, प्रा.विवेकानंद भोसले, डॉ.पंडित मुंढे, डॉ.सुभाष विखे, डॉ.मधुकर मोरे, डॉ.संदीप पायाळ, डॉ.प्रमोदिनी मोरे, डॉ.विशाल इंगळे, डॉ.श्याम गरुड, प्रा. दत्ता पाटील, शंकर शिवणकर, लक्ष्मीकांत राऊतमारे, सुजाता मुस्तापुरे, मंचक डोंबे, आनंद देवकर, सुनिता तळेकर, सुधा सालगोडे, हर्षल मनोहर, अनिल बेडवळ, माणिक खटींग, अनिल हरकळ, आयोजक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. रवींद्र शिंदे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, August 10, 2023

मौ. कोल्हावाडी (ता. मानवत) येथे पशूंचे रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना, परभणी कृषि महाविद्यालय आणि पशुसंवर्धन विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दिनांक ५ ऑगस्‍ट रोजी मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथे पशूंना लंपी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच विठ्ठल भिसे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मोहन पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब नरळदकर, रावेचे कार्यक्रम समन्वयक विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, पशुधन विकास अधिकारी डॉ. पी.आर. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. मोहन पाटील यांनी फळबाग लागवडीबाबत मार्गदर्शन केले तर डॉ.बाळासाहेब नरळदकर यांनी लंपी चर्म रोग पासून संरक्षण बाबत माहिती दिली. डॉ. राजेश कदम यांनी ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम बद्दल माहिती देऊन शेतकरी बांधवानी विद्यापीठ तंत्रज्ञान अवलंब करण्‍याचे आवाहन केले. डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम किटकावरील उझी माशीचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत तर डॉ. पी. आर. पाटील यांनीरोग प्रतिबंधक उपाय सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. रमेश पाटील यांनी केले. सुत्रसंचालन अंकिता जाधव तर उपसरपंच विठ्ठल भिसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले संचालक शिक्षण आणि प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी कृषीकन्या आर.बी. हेळगे, के.जी.काकडे, इंगोले, ए.ए. कदम, गुंजाळ, जैस्वाल, ए.एस.कदम, व्हि.बी. कदम, एस.एम.कदम, कटके, खडसे,आर.आर.जाधव, पी.बी. जाधव, कालेवाड, ए.बी. जाधव यांनी परिश्रम घेतले.

माजी कुलगुरू कै. डॉ.‌ विनायकराव पवार यांना भावपुर्ण श्रध्‍दांजली

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठ) माजी कुलगुरू डॉ.‌ विनायकराव मोतीराम पवार (वय ७६) यांचे दिनांक ८ रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांचे मूळ गाव पिंपळगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक) आहे. 

डॉ. विनायकराव पवार यांनी पुणे कृषी महाविद्यालय व नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय) येथे कृषी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १९७४ मध्ये आचार्य (पीएचडी) पदवी संपादन केली.१९७९-८० मध्ये त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफर्डमधील विषाणू विज्ञान संस्थेतून पोस्ट डॉक्टरल अभ्यास पूर्ण केला. डॉ. पवार यांनी त्यांच्या सेवेची सुरुवात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी कीटकशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून सुरू केली. त्यानंतर ते परभणीच्या मराठावाडा कृषी विद्यापीठातील कीटकनाशके संशोधन प्रकल्पांतर्गत कीटकशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते राहुरी कृषी विद्यापीठात कृषी कीटकशास्त्रज्ञ विभाग प्रमुख, पदव्युत्तर पदवी संस्थेच सहयोगी अधिष्ठाता, विस्तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक राहिले. २ ऑगस्ट २००० ते २ ऑगस्ट २००५ या कालावधीत परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते. कुलगुरू पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते पुणे (सांगवी) येथे स्थायिक झाले होते. दिनांक ९ ऑगस्‍ट रोजी विद्यापीठाच्‍या वतीने कै. डॉ. विनायकराव पवार यांना श्रध्‍दाजंली वाहण्‍यात आली. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, माजी कुलगुरू डॉ विनायकराव पवार यांच्‍या कुलगुरू पदाच्‍या काळात विद्यापीठाच्‍या शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्यास एक नवी दिशा मिळाली. त्‍यांच्‍या जाण्‍याने विद्यापीठाने एक हाडाचा शिक्षक आणि संशोधक गमावला, अशी भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली. शोकसभेस विद्यापीठातील वरीष्‍ठ अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, August 8, 2023

सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) : असे करा एकात्मिक व्यवस्थापन

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचा सल्‍ला

यावर्षी सोयाबीनची पेरणी उशिराने झालेली आहे तसेच मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप झालेली आहे. त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन रोप अवस्थेतच पिवळे- पांढरे पडत आहे. लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. क्लोरासीस हि जमिनीत लोहाची (फेरसची) कमतरतेमुळे होत नसून ती काही कारणाने झाडांद्वारे लोह शोषण न केल्याने होते.

लक्षणे: लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरां फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे.  लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

कारणे: लोह ची कमतरता विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य-क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते. तथापि, बर्‍याचदा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते. तसेच जमिनीत मुळांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने देखील मुळाद्वारे लोह कमी शोषला जाऊन क्लोरासीस होतो.

व्यवस्थापन: शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी. वापसा आल्यानंतर पीक ३०-३५ दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी. ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (II) ५० ग्रॅम किंवा ५० मिली अधिक १९:१९:१९ खत १०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता वाटल्यास ८-१० दिवसांनी परत एकदा फवारणी करावी. पाण्याचा ताण पडल्यास तुषारच्या साह्याने संरक्षित पाणी द्यावे. सिंचन सुविधा उपलब्ध नसल्यास १३:००:४५ (पोटॅशियम नायट्रेट) या विद्राव्य खताच्या १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार ८ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी. मांडगे यांनी दिली. अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२ २२९००० वर  संपर्क करा.

 








संदर्भ : वनामकृवि संदेश क्रमांक- ०३/२०२३ (०८ ऑगस्ट २०२३)


Monday, August 7, 2023

शेतीत जास्‍तीत जास्‍त उत्‍पादनापेक्षा शाश्‍वत उत्‍पादनाचे लक्ष असले पाहिजे ......... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित दोन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन

हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असुन शाश्‍वत शेतीकरीता संशोधनात भर दयावा लागेल. कधी - अधिक पर्यन्‍य, पावसातील खंड, वाढणारे तापमान, अतिवृष्‍टी तर कधी दुष्‍काळ आदी परिस्थितीत शाश्‍वत उत्‍पादन देणारे वाण, तंत्रज्ञान निर्मिती करण्‍याची गरज आहे. शेतीत जास्‍तीत जास्‍त रासायनिक खते, निविष्‍ठांचा वापर करून जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन घेण्‍यापेक्षा निविष्‍ठांचा कार्यक्षम वापर करून शाश्‍वत उत्‍पादन प्राप्‍त करणे हे आपले लक्ष असले पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भारत सरकाराच्‍या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग पुरस्‍कृत हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमी शाश्‍वत शेती करिता संशोधनाच्‍या बाबीयाविषयावर दोन दिवसीय विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन दिनांक ७ व ८ ऑगस्‍ट रोजी करण्‍यात आले असुन दिनांक ७ ऑगस्‍ट रोजी कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

व्‍यासपीठावर जुनागढ कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ ए आर पाठक, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्‍ही एम मायंदे, माजी कुलगुरू मा डॉ के पी गोरे, आयएआरआयच्‍या कृषि अभियांत्रिकी विभागाचे माजी प्रमुख डॉ जे एस पन्‍वार, सहाय्यक महासंचालक डॉ जिंदेन्‍द्र कुमार, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे शास्‍त्रज्ञ डॉ अखिलेश मिश्रा, आयआयटी खरगपुर चे माजी प्राध्‍यापक डॉ के एन तिवारी, डॉ आर डि राय, डॉ सय्यद ईस्‍माईल, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, आयोजन सचिव डॉ यु एन खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माजी कुलगुरू मा डॉ ए आर पाठक म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाचे तुर, ज्‍चारी पिकांचे चांगले वाण महाराष्‍ट्राबाहेर अनेक राज्‍यात प्रचलित आहेत. जागतिक पातळीवर भारत अन्‍नधान्‍य, दुध, फळ पिके इत्‍यादीच्‍या उत्‍पादनात आघाडीवर आहे, परंतु जीवनशैली व पौष्टिक अन्‍नाच्‍या कमतरतामुळे अनेक व्‍याधीस मानवास सामोरे जावे लागत आहे. शेती क्षेत्रातुन मोठया प्रमाणात हरित वायुचे उत्‍सर्जन होत असुन याचे प्रमाण कमी करण्‍याकरिता संशोधनावर भर दयावा लागेल.   

माजी कुलगुरू मा डॉ व्‍ही एम मायंदे म्‍हणाले की, मानवाचे आरोग्‍य हे आहारावर आधारीत असुन आहार हे पौष्टिक अन्‍नधान्‍य उपलब्‍धतेवर उपलब्‍ध आहे, त्‍यामुळे शेती क्षेत्र अत्‍यंत महत्‍वाचे आहे. अन्‍न सुरक्षासह स्‍वास्‍थवर्धक अन्‍न सुरक्षावर भर दयावा लागेल. माजी कुलगुरू मा डॉ के पी गोरे म्‍हणाले की, दिवसेंदिवस माती व पाणी यांचा -हास होत असुन मृदा संवर्धन व जल संवर्धन यावर संशोधनात प्राधान्‍य दयावा लागेल.

शास्‍त्रज्ञ डॉ अखिलेश मिश्रा यांनी भारत सरकारच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग देशातील दर्जेदार संशोधनाकरिता निधी उपलब्‍ध केला जातो, त्‍याकरिता चांगल्‍या संशोधन प्रस्‍ताव तयार करून सादर करण्‍याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात आयोजन सचिव डॉ उदय खोडके कार्यशाळेच्‍या आयोजनाची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ सुनिता पवार व प्रा प्रितम भुतडा यांनी केले तर आभार डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी मानले. दोन दिवस चालणा-या कार्यशाळेत देशातील विविध नामांकित संशोधन संस्‍थेतील तज्ञ मार्गदर्शन करणार असुन हवामान बदलांच्‍या पार्श्‍वभुमीवर कोणत्‍या बाबींवर कृषि संशोधनाची गरज आहे, यावर विचारमंथन होणार आहे. कार्यशाळेतील विचारमंथनाव्‍दारे विद्यापीठाच्‍या संशोधनाची दिशा निश्चित करण्‍यास मदत होणार असुन शास्‍त्रज्ञांना संशोधन विषय निश्चित करण्‍याकरिता मार्गदर्शक ठरणार आहे. संशोधन प्रकल्‍प तयार करून विविध निधी देणा-या शासकीय व खाजगी संस्‍थेकडुन निधी प्राप्‍त करणे, शासकिय संस्‍था, खाजगी कंपन्‍या, शैक्षणिक संस्‍था आदींच्‍या एकत्रित सहभागातुन संशोधन याबाबत मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. कार्यशाळेत परभणीसह राहुरी, अकोला, दापोली कृषी विद्यापीठातील कृषि शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, परिसरातील प्रगतशील शेतकरी, शेती क्षेत्राशी निगडीत खाजगी कंपन्‍यातील अधिकारी सहभागी झाले आहेत.