Thursday, September 24, 2026

‘फार्म ऑफ द फ्युचर’ अंतर्गत वनामकृवित ड्रोन फेनोटायपिंग प्रशिक्षण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प (AICRPAM) यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या पोकरा (PoCRA) प्रकल्प आणि आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने ‘फार्म ऑफ द फ्युचर’ प्रकल्पांतर्गत तीन दिवसीय ड्रोन फेनोटायपिंग प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक २१ ते २३ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला.

आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा कृषी संशोधन व पीक व्यवस्थापनामध्ये प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रशिक्षणामध्ये ड्रोनच्या सहाय्याने पीक फेनोटायपिंग, हवाई प्रतिमा संकलन, पीक निरीक्षण, पिकांच्या वाढीचे मूल्यांकन तसेच शेतपातळीवरील विविध माहितीचे संकलन व विश्लेषण याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थींना तांत्रिक मार्गदर्शनासोबतच ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष वापराचे आणि प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अश्विनी, श्री. स्वप्नील इंगळे, श्री. निनाद आणि श्री. रोहित, TIH, IIT मुंबई यांनी ड्रोन तंत्रज्ञान, फेनोटायपिंग तसेच कृषी क्षेत्रातील त्याच्या विविध उपयोगांबाबत प्रशिक्षण दिले.

कार्यक्रमाचे आयोजन ‘फार्म ऑफ द फ्युचर’ प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक तथा विद्यापीठाचे कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांच्या समन्वयातून करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये डॉ. आनंद दौंडे, डॉ. भाग्यश्री गजभिये, डॉ. सुनीता पवार, डॉ. प्रशांत जाधव, श्री. मधुकर मांडगे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. प्रियांका तसेच राज्य कृषी विभागाचे श्री. देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

ड्रोनआधारित तंत्रज्ञानामुळे पीक निरीक्षण, पीक मूल्यांकन, अचूक शेती, हवामान जोखीम व्यवस्थापन आणि हवामान-सक्षम शेती यांना अधिक प्रभावीपणे चालना मिळणार आहे. ‘फार्म ऑफ द फ्युचर’ या संकल्पनेच्या माध्यमातून आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान कृषी संशोधन आणि शेतकऱ्यांच्या निर्णयप्रक्रियेशी जोडण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.