वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील
प्रथम वर्ष बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी) अभ्यासक्रमाच्या नवप्रवेशित
विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ कार्यक्रम-२०२६’ दिनांक २४ सप्टेंबर
२०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ.
रावसाहेब भाग्यवंत, शिक्षण प्रभारी प्रा. विवेकानंद भोसले,
जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, नवप्रवेशित
विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, कृषि अभियांत्रिकी हे केवळ पदवी मिळविण्याचे क्षेत्र नसून शेतीतील
प्रत्यक्ष समस्या सोडविण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष
यांचा प्रभावी वापर करण्याचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कौशल्य,
संशोधनवृत्ती, उद्योजकता आणि शेतकऱ्यांप्रती सामाजिक
बांधिलकी विकसित करावी.
ते पुढे म्हणाले, आजच्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत
जलव्यवस्थापन, कृषि यांत्रिकीकरण, अचूक
शेती, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल
तंत्रज्ञान यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर
होत आहे. या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांनी भविष्यातील कृषि क्षेत्राच्या
गरजा ओळखाव्यात आणि सक्षम कृषि अभियंते म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी.
विद्यार्थ्यांनी दूरदृष्टी, जिज्ञासा,
सातत्य, कठोर परिश्रम आणि चारित्र्यनिर्मिती या
गुणांचा अंगीकार करावा, असे आवाहनही माननीय कुलगुरूंनी केले.
तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत पालकांची भूमिका महत्त्वाची असून,
महाविद्यालयानेही विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य
करावे, असे त्यांनी नमूद केले.
शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठातील
शैक्षणिक संधी, शिस्त, अभ्यासक्रमाची
रचना तसेच विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाचे महत्त्व
स्पष्ट केले. ते म्हणाले, विद्यार्थी जीवनातील पहिल्या दिवसापासूनच
वेळेचे नियोजन, नियमित अभ्यास, शिस्त आणि
सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारला, तर शैक्षणिक तसेच व्यावसायिक
जीवनातील उद्दिष्टे साध्य करणे शक्य होते.
अधिष्ठाता डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत
करताना कृषि अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रांतील रोजगार व स्वयंरोजगाराच्या
संधींची माहिती दिली. ते म्हणाले, कृषि अभियांत्रिकीच्या
माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतीतील उत्पादनक्षमता वाढविणे, नैसर्गिक
संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्याची
संधी मिळते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील उपलब्ध प्रत्येक संधीचा उपयोग आपल्या
सर्वांगीण विकासासाठी करावा.
शिक्षण प्रभारी प्रा. विवेकानंद भोसले यांनी प्रास्ताविकातून दीक्षारंभ
कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. नवप्रवेशित विद्यार्थ्यांना
महाविद्यालयातील शैक्षणिक, सहशैक्षणिक, क्रीडा,
संशोधन आणि विस्तारविषयक विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन डॉ. रघुनाथ जायभाये यांनी केले, तर शेवटी डॉ. अनिश कांबळे यांनी आभार मानले.
या दीक्षारंभ कार्यक्रमामुळे नवप्रवेशित विद्यार्थ्यांना कृषि अभियांत्रिकी
शिक्षणाची दिशा, विद्यापीठातील उपलब्ध शैक्षणिक व
संशोधनाच्या संधी तसेच भावी कारकिर्दीच्या विविध पर्यायांबाबत मार्गदर्शन मिळाले.
‘ज्ञान, कौशल्य आणि चारित्र्य’ या मूल्यांवर
आधारित नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात विद्यार्थ्यांनी उत्साहाने केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील डॉ. सुमंत जाधव, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. पंडित मुंढे, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. संदीप पायाळ, इंजी. लक्ष्मीकांत राऊतमारे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ. विशाल इंगळे, डॉ. दत्ता पाटील, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. अश्विनी गावंडे आणि डॉ. गजानन वासू यांच्यासह महाविद्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
.jpeg)
.jpeg)

.jpeg)



.jpeg)