सेवा संकल्प अभियान केवळ औपचारिक न राहता नागरिककेंद्रित व्हावे : अधिष्ठाता डॉ. रावसाहेब भाग्यवंत
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे
यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत संपूर्ण मराठवाड्यात
विविध उपक्रम दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत
आहेत.
याच अभियानांतर्गत शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ
कार्यक्रम-२०२६’ अंतर्गत सेवा संकल्प अभियान दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी
उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.
रावसाहेब भाग्यवंत होते. प्रमुख अतिथी म्हणून परभणीचे तहसीलदार श्री. संदीप
राजापुरे तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिनेश कुमार झा उपस्थित
होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी नवप्रवेशित
विद्यार्थ्यांना उज्ज्वल शैक्षणिक व व्यावसायिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कृषि
अभियांत्रिकी क्षेत्रातील वाढत्या संधींची माहिती देताना ते म्हणाले की, सेवा संकल्प अभियान हा केवळ
औपचारिक उपक्रम न राहता तो नागरिककेंद्रित आणि समाजाभिमुख झाला पाहिजे. या
अभियानाच्या माध्यमातून नवप्रवेशित विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता
त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये आणि राष्ट्रसेवेची भावना रुजविणे आवश्यक
आहे. विद्यार्थ्यांचा समाजाशी थेट संपर्क वाढावा तसेच त्यांना शासकीय व सामाजिक
योजनांची माहिती व्हावी, हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार श्री. संदीप राजापुरे
म्हणाले की, विद्यार्थी जीवन हा मानवी
आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी करणारा काळ आहे. केवळ
पदवी मिळविणे हे विद्यार्थ्यांचे अंतिम ध्येय नसून, शिक्षणातून मिळालेले ज्ञान
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे.
प्रशासकीय सेवा आणि देशसेवेच्या विविध संधी विद्यार्थ्यांसमोर आहेत. त्यासाठी
विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच व्यक्तिमत्त्व विकासावरही भर द्यावा. त्यांनी
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवा तसेच शासकीय कामकाजाची माहिती देत
कठोर परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिनेश कुमार
झा तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, डिजिटल बँकिंग तसेच केंद्र व राज्य
शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत
आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत, यासाठी बँकेमार्फत उपलब्ध असलेल्या विविध सुविधांचा
लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. सुभाष विखे, डॉ. सुमंत जाधव, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. रघुनाथ जायभाये, डॉ. अनिश कांबळे, डॉ. पंडित मुंढे, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. संदीप पायाळ, इंजी. लक्ष्मीकांत राऊतमारे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ. विशाल इंगळे, डॉ. दत्ता पाटील, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. अश्विनी गावंडे आणि डॉ. गजानन
वासू यांच्यासह महाविद्यालयीन कर्मचारी व प्रथम वर्षाचे नवप्रवेशित विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.

