Thursday, September 24, 2026

गणेशोत्सव २०२६ अंतर्गत प्रेरणादायी व कारकीर्द मार्गदर्शनपर व्याख्यानांनी विद्यार्थ्यांना मिळाली यशाची दिशा

 वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास व स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन


गणेशोत्सव २०२६ आणि महाविद्यालयाच्या क्रीडा सप्ताहाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी २१ व २२ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यवर्ती सभागृहात प्रेरणादायी व कारकीर्द मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, जीवनाकडे आनंदी व मानवतावादी दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देणे तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य नियोजन व दिशा देणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रेरित राहून चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात आणि यूपीएससी, एमपीएससी, कर्मचारी निवड आयोग (SSC), कंबाईन, बँकिंग, रेल्वे तसेच संरक्षण दलातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना व्यक्तिमत्त्व विकासावरही भर द्यावा, असे मार्गदर्शन या कार्यक्रमातून करण्यात आले. “समजून घ्या, शिका, जगा आणि जीवन समृद्ध करा” या विचारातून विद्यार्थ्यांना जीवनातील आनंद, आत्मविकास आणि करिअर यांचा समतोल साधण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिस्त, नियमांचे पालन आणि स्वतःच्या भूमिकेची जाणीव या बाबी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच जबाबदार नागरिक म्हणून स्वतःची जडणघडण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कृषि महाविद्यालय, परभणीचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी स्पष्ट उद्दिष्ट निश्चित करून ध्येयकेंद्रित (Target-oriented) नियोजन करावे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले.

दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी आदर्श महाविद्यालय, नांदेड येथील प्रा. विश्वधार देशमुख यांनी ‘माणुसकी, जीवन आणि आनंद’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. मानवी जीवनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करताना त्यांनी जाणीवपूर्वक आत्मविकास, सकारात्मक विचारसरणी आणि मानवतावादी मूल्यांचे महत्त्व विशद केले.

विद्यार्थ्यांनी केवळ करिअरमधील यशाचा ध्यास न घेता व्यक्तिमत्त्व विकास, चांगल्या सवयी, सकारात्मक दृष्टिकोन आणि परस्परांप्रती संवेदनशीलता जोपासावी. जीवनातील ध्येय साध्य करत असतानाच जीवनाचा आनंद घेणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रा. सिद्धेश्वर कोघे यांचे मार्गदर्शन

दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील अल्फा कोचिंग क्लासेसचे संचालक, प्रेरणादायी वक्ते व कारकीर्द मार्गदर्शक प्रा. सिद्धेश्वर कोघे यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, बँकिंग, नाबार्ड (NABARD), रेल्वे तसेच संरक्षण दलातील परीक्षांची तयारी करताना आवश्यक असलेली मानसिकता, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सातत्य आणि चिकाटी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी योग्य ध्येय निश्चित करून त्यानुसार नियोजनबद्ध अभ्यास करणे, उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करणे आणि अपयशातून शिकत सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी जिमखान्याचे उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम नेहरकर आणि माजी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झवर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार डॉ. रणजित चव्हाण यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथरीकर व डॉ. फारिया खान तसेच गणेशोत्सव २०२६ मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष सार्थक धुमाळ, उपाध्यक्ष सौरभ नखाते, कोषाध्यक्ष मयुरा जोनवाल आणि सचिव ताहेर शिकलगार यांनी विशेष परिश्रम घेतले.