Thursday, October 8, 2015

मौजे वझुर येथे रबी शेतकरी मेळावा संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, रेशीम संशोधन योजना व पुर्णा तालुका कृषि अधिकारी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पुर्णा तालुक्‍यातील मौजे वझुर येथे दिनांक ७ ऑक्‍टोबर रोजी रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळाव्‍यास प्रमुख पाहुणे म्‍हणुन दादाहरी ग्रामीण विकास सेवाभावी संस्‍थेचे अध्‍यक्ष श्री. अजितदादा वरपुडकर उपस्थित होते तर सरपंच श्री. लक्ष्‍मणराव पवार अध्‍यक्षस्‍थानी होते. कार्यक्रमास जिल्‍हा परिषद सदस्‍य सुरेश पवार, विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे, रावे समन्‍वयक डॉ. राकेश अहिरे, माजी सरपंच राजाभाऊ पवार, तालुका कृषी अधिकारी श्री आर पी देशपांडे, रेशीम संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शाहीद देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्‍यात श्री. अजितदादा वरपुडकर यांनी आपल्‍या भाषणात गावातील जलसंधारणासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे सांगितले तर शाश्‍वत शेतीसाठी पशुधनाचे योग्‍य व्‍यवस्‍थापनाबाबत डॉ बी एम ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण कृषि कार्यानुभवाबाबत डॉ. राकेश अहिरे, रबी ज्‍वारी हंगामाबाबत डॉ. पी. के. वाघमारे, गहु व हरभरा लागवडीबाबत डॉ नारखेडे, करडई लागवडीबाबत डॉ. एस. व्‍ही. पवार, रे‍शीम उद्योगाबाबत डॉ. सी. बी. लटपटे यांनी तर जनावरांच्‍या गोठा व्‍यवस्‍थानाबाबत डॉ. शाहीद देशमुख यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्‍यात शेतकरी भारत पवार, गरुड, सुदाम शिंदे यांनीही रेशीम उद्योगाबाबत स्‍वत:चे अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिदुत तुकाराम मंत्री यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एच. घंटे यांच्‍यासह ग्रामीण कृषि कार्यानुभवाचे कृषिदुत अरुण कठाळे, आशिष भराडे, सुदर्शन काळे, शेख वसीस, प्रशांत गिते, नारायण घुगे, पंकज दुधाटे, बालाजी बोयेवार, तानाजी मुळे, कैलास भाकड, प्रदिप बरमे, अंगद नवघरे, सुशील पवार, यशवंत देवरे, विनोद पितळे, सुनिल नांदे, ओंकार झाडे, सचिन घाडगे, प्रविण पुंडगे, मोहम्‍तद आसिफ आदींनी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 


Sunday, October 4, 2015

गावपातळीवर शेतक-यांनी स्‍वत:ची बियाणे बॅक विकसीत करावी......संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर

हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रमातंर्गत शेतकरी मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पातंर्गत हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रमाच्‍या वतीने दिनांक ३० सप्‍टेंबर रोजी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर हे होते तर प्रगतशील शेतकरी श्री विठलराव पारधे, श्री. ज्ञानोबा पारधे, सहयोगी संचालक (बियाणे), डॉ. ही. डी. सोळंके, डॉ. डब्‍ल्‍यु. एन. नारखेडे, डॉ. ए. एस. कडाळे व डॉ. बी. व्‍ही. आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
   अध्‍यक्षीय भाषणात संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, कोरडवाहु शेतीत स्‍थैर्य आणण्‍यासाठी शेतकरी बांधवानी सामुहिक प्रयत्‍न करणे गरजेचे असुन पारंपारीक पिकासोबतच शेवंगा, हदगा, कडीपत्‍ता या बाजारात मागणी व मुल्‍य भाव असणा-या पिकांची लागवड करावी, शेतकरी बांधवांनी विद्यापीठ विकसीत बियाण्‍याचा वापर करून गावापातळीवरच स्‍वतःची बियाणे बॅंक विकसीत करावी, असा सल्‍लाहि त्‍यांनी दिला.
   बाभुळगांव येथील प्रगतशील शेतकरी श्री गिरीष पारधे आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, कोरडवाहु शेती यशस्‍वी करण्‍यासाठी उपलब्‍ध साधनसामुग्रीचा कार्यक्षम वापर, पीक पध्‍दतीतील बदल, पीक फेरपालट, आंतरपिक पध्‍दती, एकात्मिक अन्‍नद्रव्‍ये व्‍यवस्‍थापन, बीबीएफ व सरी वरंबा तंत्रज्ञान, ठराविक ओळीनंतर सरी काढणे, फवारणीतुन अन्‍नद्रव्‍यांचा वापर, विहीर पुनर्भरण, कुपनलिका पुनर्भरण, संरक्षित पाण्‍याचा वापर, शेततळे व त्‍यांचे व्‍यपस्‍थापन आदी विविध तंत्रज्ञान हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतकरी बांधवानी आत्‍मसात केले असुन उत्‍पादनात स्थिरता आणण्‍यात यश मिळविले आहे, असे अनुभव कथन केले.
   कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. बी. व्‍ही. आसेवार यांनी योजनेचे उदे्दश व स्‍वरूप विशद करून शेतकरी बांधवानी रब्‍बी हंगामात वेळेवर पेरणी करून  उपलब्‍ध ओलाव्‍याचे कार्यक्षम व्‍यवस्‍थापन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ. आनंद गोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. एम.एस. पेंडके यांनी केले.
   या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसीत बियाण्‍याचे व खताचे वाटप करण्‍यात आले. यात हरभरा (आकाश, विजय), रब्‍बी ज्‍वारी (परभणी मोती, परभणी ज्‍योती व मालदांडी), करडई (परभणी १२) आदी बियाणे वितरीत करण्‍यात आले. तांत्रिक सत्रात डॉ. आनंद गोरे यांनी रब्‍बी पीक व्‍यवस्‍थापनाबदल तर प्रा. मदन पेंडके यांनी कुपनलिका पुनर्भरण, शेततळयांची निगा व देखभाल, सं‍रक्षित सिंचन यावर मार्गदर्शन केले. यावेळी शिवार फेरीचेही आयोजनही करण्‍यात येऊन शेतकरी बाधवांनी कोरडवाहु ती संशोधन प्रकल्‍पाच्‍या विविध संशोधन प्रयोगांना भेटी दिल्‍या. यात पावसाचे खंड व्‍यवस्‍थापनावर आच्‍छादनाचा वापर व पोटॅशियम नायट्रेट फवारणीचे प्रयोगातील कपाशीची वाढ चांगली दिसुन आली. 
   मेळाव्‍यास मौजे बाभळगांव येथील शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी बांभुळगांव येथील श्री गिरीष पारधे, श्री विष्‍णु दळवे, श्री ओमप्रकाश दळवे, ज्ञानोबा पारधे आदींसह डॉ. मेघा सुर्यवंशी, डॉ. गणेश गायकवाड, श्रीमती सारीका नारळे, श्री. माणिक संमिद्रे, श्री सयद, श्री चतुर कटारे, श्री भंडारे आदींनी परीश्रम घेतले.
  सदर हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रम कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांचे मार्गदर्शनाखाली परभणी तालुक्‍यातील मौजे बाभळगांव येथे गेली तीन वर्षापासुन यशस्‍वीपणे राबविण्‍यात येत असुन या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन हवामान बदलानुरूप तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवाना उपयोग होतांना दिसुन येत आहे.

वनामकृविमार्फत आदिवासी शेतक-यांना विविध शेती निविष्‍ठांचे वाटप


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील बीज तंत्रज्ञान संशोधन व पैदासकार बियाणे विभाग येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या राष्‍ट्रीय बीज संशोधन योजनेंतर्गत असलेल्‍या आदिवासी उपयोजनाच्‍या वतीने दि १ ऑक्‍टोबर रोजी आदिवासी शेतक-यांना विविध शेती निविष्‍ठांचे वाटप कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर, सह्योगी संचालक (बियाणे) डॉ व्‍ही डी सोंळुके यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञानाची ज्ञानगंगा आदिवासी शेतक-यांपर्यत पोह‍जविणे व त्‍यांच्‍या कृषि विकासास हातभार लावणे, हा मुख्‍य उद्देश ठेऊन आदिवासी उपयोजने मार्फत नां‍देड जिल्‍ह्यातील हदगांव तालुक्यातील मौजे कुसळवाडी, चौरंबा (खु,) व चौरंबा (बु.) येथील पंच्‍चाहत्‍तर निवडक आदिवासी शेतक-यांना रब्‍बी हंगामासाठी लागणारे विविध शेती निविष्‍ठा जसे विद्यापीठ विकसित बियाणे, जैविक व रासयानिक खते व किटकनाशके आदींचे वाटप करण्‍यात येणार असुन यातील काही शेतक-यांना प्रातिनिधिक स्‍वरूपात वाटप करण्‍यात आले. सदरिल कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व आदिवासी शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ जी एस पवार हीने केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा आर एम कोकाटे, श्री बी एम शिंदे, श्री बी बी देशमुख यांनी परिश्रम घेतले. 

Saturday, October 3, 2015

स्वच्छतेबाबत सर्वांनी जागरूक राहावे........शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान  महाविद्यालयाच्‍या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनाक २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन हे होते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय खोडके हे उपस्थित होते.
शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून उपस्थितांना स्‍वच्‍छतेची शपथ दिली.   मार्गदर्शनपर भाषणात शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन यांनी स्वच्छतेच्‍या बाबतीत सर्वांनी जागरूक राहून मुळातच अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्‍यावी, असा सल्‍ला दिला तर प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी माननीय पंतप्रधान यांनी राष्ट्र उभारणीकरिता हाती घेतलेली स्वच्छतेची मोहीम प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासाकरिता पूरक असून त्याचे आपण पालन करावे, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

या अभियानात प्रभाताफेरिन काढुन श्रमदान करण्‍यात आले. श्रमदानात विद्यार्थ्‍यासह महाविद्यालयातील प्रा. भास्कर भुईभार, प्रा. विवेकांनंद भोसले, प्रा. डॉ. स्मिता खोडके, प्रा. हरीश आवरी, प्रा. सुमंत जाधव, प्रा. मधुकर मोरे, प्रा. पंडित मुंढे, प्रा. गोपाल शिंदे, प्रा. प्रमोदिनी मोरे, लक्ष्मीकांत राऊतमारे, अमृत उबाळे, के. बी. फाजगे, अनिल पांचाळ, एम. जे. डोंबे, डब्ल्यू. के. खराटे, गजानन रनेर आदींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कल्पना भोसले, प्रशांत अटकळ, अजय सातपुते, शरद गवळी, प्रसाद वारे, ज्ञानेश्वर मोरे, हनुमान बावणे, पूजा शेट्टे, वृषाली खाकाळ, आश्विनी पवार आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीताराम बच्चे याने तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा संजय पवार यांनी केले.

औरंगाबाद जिल्‍ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील मौजे बिल्‍डा येथे प्रक्षेत्र दिन साजरा



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍प व मोदीपुरक (मेरत) येथील अखिल भारतीय एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन योजना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शेतक-यांच्‍या शेतावरील प्रयोग योजनेतंर्गत दिनांक १ ऑक्‍टोंबर रोजी जि. औरंगाबाद जिल्‍ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील मौजे बिल्‍डा येथे प्रक्षेत्र दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमास मेरट येथील प्रमुख मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. आर. एस. यादव, मुख्‍य कृषि विद्यावेत्‍ता डॉ. डब्‍ल्‍यु. एन. नारखेडे, फुलंब्रीचे तालुका कृषि अधिकारी श्री सोनवणे साहेब व मंडळ कृषि अधिकारी श्री नरके साहेब आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. आर. एस. यादव यांनी शेतक-यांना उपयुक्‍त मार्ग्‍दर्शन केले तर डॉ. नारखेडे यांनी एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन बद्दल माहिती दिली. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते लाभार्थ्‍यांना मातीच्‍या आरोग्‍य पत्रिकेचे वाटप करण्‍यात आले. तालुका कृषि अधिकारी श्री सोनवणे साहेब यांनीही शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषिविद्यावेत्‍ता डॉ. के. टी. जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. देशपांडे श्री लोंढे, श्री शेख, श्री मुंढे, श्री डुकरे, श्री सुदेवाड, श्री योमे आदींनी परिश्रम घेतले.
  सदरिल योजनेंतर्गत एकात्मिक शेती पध्‍दतीचा भाग म्‍हणुन मका–हरभरा या पिकामधील संतुलीत अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापनाचे महत्‍व पटवुन देण्‍यासाठी सहा गावांत एकुण चोवीस शेतक-यांना हरभरा बियाणे व खताचे वाटप करण्‍यात येऊन दुग्‍ध्‍ उत्‍पादनासाठी गोधनांच्‍या आरोग्‍यासाठी क्षार मिश्रण मिनरल मिक्‍चर ३९ गोपालकांच्‍या समूहास देण्‍यात आले. तसेच मारवेल गवताचे वाटपही करण्‍यात आले.
  एकात्मिक शेती पध्‍दतीव्‍दारे शेतक-यांना विविध जोडधंद्याच्‍या माध्‍यमातुन बळकटी देऊन शेतीमधील संभाव्‍य नुकसानीची दाहकता कमी करता येऊ शकते, हे प्रत्‍यक्ष प्रयोगाच्‍या माध्‍यमातुन दर्शविण्‍यासाठी नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदच्‍या शेतक-यांच्‍या शेतावरील प्रयोग योजनेंतर्गत कार्यरत भारतीय एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन संस्‍थाव्‍दारे औरंगाबाद जिल्‍ह्यातील पैठण तालुक्‍यातील मौजे दामरोळ, धारेगांव, देवगांव तसेच फुलंब्री तालुक्‍यातील मौजे बिल्‍डा, मुर्शीदाबादवाडी, किनगांव या गावात हा प्रकल्‍प राबविण्‍यात येत असुन मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. आर. एस. यादव यांनी सदरील शेतक-यांच्‍या शेतावरील प्रयोगांना भेट देऊन पाहणी केली व समाधान व्‍यक्‍त केले. 

Friday, October 2, 2015

महात्‍मा गांधी जयंती निमित्‍त कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यानी राबविली परिसर स्‍वच्छता मोहिम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने महात्‍मा गांधी व लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंती निमित्‍त दि २ ऑक्‍टोबर रोजी विद्यापीठ परिसर स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली. यावेळी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते महात्‍मा गांधी व लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्‍यात आले. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांनी उपस्थितांना स्‍वच्‍छतेची शपथ दिली. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ डि एन गोखले व रासेयोचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी वर्षभरात कृषि महाविद्यालयच्‍या विद्यार्थ्‍यानी विविध मोहिमेत सहभाग घेऊन स्‍वच्‍छता मोहिम यशस्‍वीपणे राबविल्‍याचे सांगितले. विद्यापीठ परिसरात स्‍वच्‍छता रॅली काढण्‍यात येऊन राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा ए एम कांबळे व प्रा विजय जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसेवक तसेच राष्‍ट्रीय छात्र सेनचे छात्र सेना अधिकारी डॉ जयकुमार देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिक यांच्‍यासह पाचशे विद्यार्थ्‍यांनी स्‍वयंस्‍फुर्तीने विद्यापीठ परिसर स्‍वच्‍छता मोहिमेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा ए एम कांबळे यांनी केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख, महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Thursday, October 1, 2015

शेतक-यांनी जमिनीचा प्रकार व जमिनीतील ओलावा विचारत घेऊन पिकांची निवड करावी..... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृविचा "विदयापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी" उपक्रमास पुनश्‍च: प्रारंभ


गेल्‍या काही वर्षात मराठवाडयातील पिक पध्‍दतीत अनेक बदल झाले कडधान्‍य, दालवर्गीय पिकांचे क्षेत्रात घट होऊन सोयाबीन व कापसाचे क्षेत्रात वाढ झाली आहे, या पिक पध्‍दतीत साठ टक्‍के पाण्‍याची गरज वाढली असुन पाऊसात खंड पडल्‍यास मोठे नुकसान होत आहे. शेतक-यांनी जमिनीचा प्रकार व जमिनीतील ओलावा विचारत घेऊन पिकांची निवड करावी तरच होणारे संभाव्‍य नुकसान टाळता येईल. विद्यापीठाकडे मर्यादीत मनुष्‍यबळ असुनही ‘विद्यापीठ आपल्‍या दारी’ उपक्रम राबवित असुन यात रबी हंगामाचे नियोजन व पिक संरक्षणावर भर देण्‍यात येणार असुन शेतक-यांना याचा निश्चितच लाभ होईल, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.  
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने परभणी व हिंगोली जिल्‍हात राबविण्‍यात येणा-या "विदयापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी" उपक्रमाच्‍या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्रगतशील शेतकरी श्री सोपनराव अवचार, श्री रामप्रभु निरस यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, जलसंधारण व कोरडवाहु शेती प्रगतीसाठी कृषि विद्यापीठ व शासनस्‍तरावर सातत्‍यने प्रयत्‍न होणे गरजेचे आहे. जलसंधारणावर भर दयावा लागेल, जलयुक्‍त शिवार उपक्रमामुळे हंगामात पाण्‍याची पातळी वाढतांना दिसत आहे, पंरतु यावर शास्‍त्रीयरित्‍या संशोधन होणे गरजेचे आहे. हवामान बदलामुळे शेती पध्‍दतीत अनेक बदल घडत असुन शेतक-यांना बदलत्‍या हंगामानुसार तंत्रज्ञान दयावे लागेल. विद्यापीठाचे विस्‍तार कार्य अधिक बळकट करण्‍यासाठी शेतकरी, लोकप्रतिनिधी व प्रसार माध्‍यामांनी सहकार्य करावे. विद्यापीठाकडे ज्‍वारी, करडई व हरभरा पिकांचे दर्जादार बियाणे उपलब्‍ध असुन रब्‍बी हंगामात याची लागवड करावी, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार आपल्‍या मनोगतात विद्यापीठाचे कुलगुरू कोरडवाहु संशोधनात देशापातळीवर मोठे संशोधक असुन त्‍यांच्‍या ज्ञानाचा फायदा शेतक-यांना व्‍हावा असे मत व्‍यक्‍त केले तर प्रगतशील शेतकरी श्री रामप्रभु निरस आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, यावर्षी कमी पाऊसमानात विद्यापीठाने शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब केलेल्‍या शेतक-यांना लाभ झाला असुन ‘विद्यापीठ आपल्‍या दारी’ उपक्रम वर्षभर राबविण्‍यात यावा, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.   
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी सांगितले की, प्रत्‍येक गावातील व प्रत्‍येक शेतक-यांच्‍या शेती विषयक विविध समस्‍या आहेत, ‘विद्यापीठ आपल्‍या दारी’ उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन त्‍यांच्‍या प्रश्‍नांना थेट विद्यापीठ शास्‍त्रज्ञ उत्‍तर देऊ शकतील. तसेच मराठवाडयात झालेल्‍या पर‍तीच्‍या पाऊसाचा रब्‍बी पिकांना लाभ होण्‍याच्‍या दृष्‍टीने हा उपक्रम उपयुक्‍त ठरेल.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ यु एन आळसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री के डि कौसडीकर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ पी आर देशमुख, प्रा पी एस चव्‍हाण, प्रा डि डि पटाईत, प्रा एस बी जाधव, डॉ मधुमती कुलकर्णी, गणेश कटारे, एकनाथ डिकळे, हनुमंत बनसोड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, वि‍भाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विविध शास्‍त्रज्ञांना चमुच्‍या वाहनास हिरवा झेंडा दाखविण्‍यात आला.