Thursday, July 6, 2017

गृहविज्ञान महाविद्यालयाचे रूपांतर सामाजिक विज्ञान महाविद्यालयात

सामाजिक विज्ञान: विद्यार्थ्‍यांना व्यावसायिभिमूख करणारा अभिनव अभ्‍यासक्रमास यावर्षी पासुन सुरूवात
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील गृहविज्ञान महाविद्यालयाचे रूपांतर सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक विज्ञान महाविद्यालय (कम्‍युनिटी सायन्य कॉलेज) असे करण्‍यात आले असुन हा अभ्‍यासक्रम अधिक व्‍यावसायिभिमुख करण्‍यात आला आहे. भारतात सन १९२० दरम्यान ब्रिटीश राजवटीत गृह विज्ञान अभ्यासक्रमाची बीजे रूजविण्यात येऊन पुढे त्याची पाळेमुळे देशभर फैलावत गेली. मध्यंतरीच्या कालावधीत या अभ्यासक्रमात अनेक परिवर्तने झाली. तथापी आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्‍यांना अधिक व्यावसायिभिमुख बनवण्यासाठी भारत सरकार; भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली; विविध राज्यातील कृषि विद्यापीठे तथा महाराष्ट्र शासन यांनी एकत्रितपणे पाऊले उचलत गृहविज्ञान पदवी अभ्यासक्रमाची व्याप्ती वृध्दिंगत करण्याच्या हेतूने अनेक बदल करून्‍ त्याचे नामांतर सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमात करण्यात आले आहे. या अनुषंगाने महाविद्यालयातील विभागांच्या पारंपारिक नांवात बदल करण्यात येऊन संपूर्ण अभ्यासक्रमातही समाजाच्‍या गरजेनुसार अनेक सुधारणा करण्यात आल्या. सदरील अभ्यासक्रमास अभियांत्रिकी, वैद्यकीय या अभ्यासक्रमांप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्‍यांना ही पदवी प्राप्त करण्यासाठी चार वर्षीय अभ्यासक्रमात (+) एकूण १८० क्रेडीट्सह परस्पर-पूरक असणा­या विविध ५८ विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. विद्यार्थ्‍यांना दर्जेदार पध्दतीने हे शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने प्रात्याक्षिके व प्रत्यक्ष अनुभावांवर भर देऊन हॅन्डस ऑन ट्रेनिंगला (HOT) प्राधान्य देण्यात आलेले आहे. असा हा अद्ययावत अभ्यासक्रम स्टुडन्टस् रेडी प्रोग्राम (Student Ready - Students Rural Entrepreneurship Awareness and Development Yojana) म्हणून राबवण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करतांना विद्यार्थ्‍यांना प्रारंभीक तीन वर्षांच्या कालावधीत सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमातील प्रमुख विषयांचे अध्ययन करावे लागणार असून अंतीम चतुर्थ वर्षात विद्यार्थ्‍यांच्या आवडीनूसार व प्रथम तीन वर्षात त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांआधारे महाविद्यालयातील चार विभागांपैकी कोणत्याही एका विभागा व्यावसायिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांना ठोस प्रशिक्षण देऊन सक्षम केले जाणार आहे. याकरिता प्रख्यात संस्थांमध्ये इम्प्लांट ट्रेनिंग, ग्रामीण विभागात कार्य करण्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी रावे (RAWE- Work Experience in Rural Areas) तथा अंतीम सत्रात व्यावसायिकतेसंबंधी आवश्यक असणा­या क्षमता विद्याथ्र्यांमध्ये विकसित होण्यासाठी अनुभवमय अध्ययन कार्यक्रम (ELP- Experiential Learning Programme) अशा अभिनव उपक्रमांचा समावेश या अभ्यासक्रमात केलेला आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये कृषि विद्यापीठाशी संलग्नीत असणारे गृह विज्ञान महाविद्यालय यापुढे सामाजिक विज्ञान महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणार असून अशा सर्व महाविद्यालयांमध्ये समान धर्तीवर हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्‍यांना देशातील विविध राज्यात उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग सोपा झाला आहे. तसेच राज्यस्तरीय तथा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्‍यांसाठी हा अभ्यासक्रम निश्चितच लाभदायी असेल, अशी माहिती गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा. विशाला पटणम यांनी दिली.
महाराष्ट्रात असणा­या एकूण चार कृषि विद्यापीठांपैकी केवळ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामध्ये सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम राबवला जाणार असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. 

सामाजिक विज्ञान पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पध्दती 
-  इयत्ता १२वी विज्ञान (१०+) किंवा समतूल्य अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक
- मुला-मुलींसाठी प्रवेश खूला
- संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन असून त्यासंबंधीचे माहितीपत्रक व अर्ज www.mcaer.org   mahaagriadmission.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- उमेदवारांनी प्रवेश माहिती पुस्तिका (Prospectus) काळजीपूर्वक वाचून व्यवस्थिपणे प्रवेश अर्ज सादर करावा.
-  प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० जुलै २०१७ 
या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाप्रमाणेच पदव्यूत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सोय असून अद्यावत प्रयोगशाळा व वर्ग, मार्गदर्शन व समुपदेशन चिकित्सालये, विद्यार्थी कॉन्सलींग व प्लेसमेंट सेल, स्टुडंट- फ्रेंडली शैक्षणिक वातावरण, इंटरनेट, कॉम्प्युटर लॅब, उच्च विद्या विभुषित व अनुभवी प्राध्यापक वृंद आहे.

विद्यार्थ्‍यांना उपलब्ध संधी
सामाजिक विज्ञान या विषयातील पदवीधर व पदव्यूत्तर विद्यार्थ्‍यांना विविध क्षेत्रात कार्य करण्याच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. प्रामुख्याने आहारतज्ज्ञ, बालविकास अधिकारी, शाळांचे प्रशासक, कॉन्सलर, मुख्याध्यापक, शिक्षक, महाविद्यालयात प्राध्यापक, इंटेरियर डिझायनर, इव्हेन्ट मॅनेजर, हॉटेल मॅनेजर, अन्न निरीक्षक, फॅशन डिझायनर, बुटीक मॅनेजर, पत्रकारीता, प्रेस रिपोर्टर, अनाऊन्सर आकाशवाणी व दूरदर्शन कार्यक्रम संचलन कर्ता, विस्तार अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, मल्टीमिडीया डेव्हलपर्स अशा अनेक पदांवर खाजगी निमशासकीय, शासकीय संस्थांमध्ये तसेच विविध योजनांचे प्रकल्प संचालक, संशोधक अशा विविध क्षेत्रात नोकरी-व्यवसाय करून अर्थार्जन करण्यासाठी विद्यार्थ्‍यांना १०० टक्के संधी उपलब्ध आहेत. परंतु असे यश प्राप्त करून आनंदी जीवन व्यतीत करण्यासाठी विद्यार्थ्‍यांनी त्यांच्या संवाद कौशल्यात निपूणता, अभ्यासक्रमातील विविध संकल्पनेत स्पष्टता, वर्गातील १०० टक्के उपस्थिती याबाबत कठोर परिश्रम करणे अतिशय आवश्यक आहे.
सौजन्‍य
प्रा. विशाला पटनम, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या
सामाजिक महाविद्यालय, वनामकृवि, परभणी
(भ्रमणध्वनी : 9822754922)
डॉ. जया बंगाळे

Wednesday, July 5, 2017

वृक्ष लागवड मोहिमेस वनामकृविच्या विविध कार्यालयाच्या वतीने मोठया प्रतिसाद

महाराष्‍ट्र शासनाच्‍या महत्‍वकांक्षी चार कोटी वृग लागवड उपक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील विविध महाविद्यालय व कार्यालय मोठा प्रतिसाद 

औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्र येथे वृक्ष लागवड
औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात औरंगाबादचे जिल्‍हाधिकारी मा. श्री नवलकिशोर राम यांच्‍या हस्‍ते वृक्ष लागवड करून या मोहिमेस सुरवात करण्‍यात आली. यावेळी कार्यक्रम समन्‍वयक डॉ एस बी पवार, सहाय्यक जिल्‍हाधिकारी श्री कटारीया, उपजिल्‍हाधिकारी श्री संदिप सानप, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. उद्य देवहाणकर, तहसिलदार श्री शेळके, तालुका कृषि अधिकारी श्री व्‍यंकट ठके, शास्‍त्रज्ञ डॉ किशोर झाडे, प्रा. दिप्‍ती पाटगांवकर, डॉ एन डी देशमुख, डॉ अनिता जिंतुरकर आदीसह शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

परभणी येथील अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयात वृक्ष लागवड
परभणी येथील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात दिनांक 1 जुलै रोजी राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत वृक्षदिंडी काढण्‍यात येऊन वृक्ष लागवड मोहिम राबविण्‍यात आली. यावेळी प्राचार्य डॉ ए आर सावते, डॉ एच एम सय्यद, डॉ डी एम शेरे, प्रा हेमंत देशपांडे, प्रा. डी आर मोरे, प्रा के एस गाढे, प्रा. आर बी क्षीरसागर, प्रा जी एम माचेवाड, डॉ बी एस आगरकर, प्रा. प्रविण घाटगे, प्रा एस के सदावर्वे, प्रा. ए ए जोशी, प्रा. इम्रान हाश्‍मी, श्री बी एम पाटील आदीसह विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

बदनापुर येथील कृषि महाविद्यालयात वृक्ष लागवड
बदनापुर येथील कृषि महाविद्यालयात प्राचार्य डॉ जी एम वाघमारे यांच्‍या हस्‍ते वृक्ष लावगडीचा प्रारंभ करण्‍यात येऊन महाविद्यालयाच्‍या परिसरात 340 विविध वृक्षाची लागवड करण्‍यात आली. यावेळी डॉ माने, डॉ हिंगोले, डॉ सरोदे, डॉ हनवते, प्रा रासकर, प्रा. नागलोत, प्रा. चौधरी, डॉ सुरडकर, प्रा. अंधारे, प्रा. कदीर आदीसह अधिकारी, कमचारी व‍ विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदविला. 

विद्यापीठ शास्‍त्रज्ञा डॉ पपीता गौरखेडे (पाथरीकर) यांना “युवा शास्त्रज्ञ-२०१७” पुरस्कार

आंतरराष्ट्रीय उष्‍णकटिबंधीय कृषी नियतकालीकाव्‍दारे ऋषिकेश (उत्तराखंड) येथे दि २४-२५ जुन दरम्‍यान पार पडलेल्‍या ५ व्या आंतरराष्ट्रीय कृषी, उद्यानविद्या व वनस्पतीशास्त्र परिषदेत “युवा शास्त्रज्ञ-२०१७” पुरस्काराने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्‍या शास्‍त्रज्ञा डॉ पपीता हिरामनजी गौरखेडे (पाथरीकर) यांना सन्मानित करण्यात आले. सदरील परिषदेसाठी विविध राज्यातून आलेल्या शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवुन विविध तांत्रिक सत्रांमध्ये शोधनिबंध सादर केले. डॉ पपीता गौरखेडे यांनी “विद्राव्य ग्लुकोनेटेड खतांचे कापसावरील फवारणीचे निष्कर्ष” यावरील शोधनिबंध सादर केला होतो. याबाबत सदरील पुरस्कार शिमला येथील भारतीय कृषि अुनसंधान परिषदेचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ  डॉ. अरुण शुक्ला व परिषदेचे आयोजक डॉ. विजय झा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याबाबत कुलसचिव डॉ. विलास पाटील, डॉ. सय्यद ईस्माईल, डॉ. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. प्रभाकर अडसूळ, प्रा. अनिल मोरे, डॉ. स्वाती झाडे, प्रा. गजभिये, डॉ. सदाशिव आडकिणे व सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. 

Saturday, July 1, 2017

पर्यावरण संतुलनासाठी एक विद्यार्थ्‍यी एक वृक्ष ही संकल्‍पना रूजवणे गरजेचे.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वृक्ष दिंडी व वृक्ष लागवड महोत्‍सवाचे उद्घाटन


महाराष्‍ट्रात सर्वात कमी वनराई ही मराठवाडयात आहे, केवळ वृक्ष लागवड करून उपयोगाचे नसुन वृक्ष संवर्धनाचा संकल्‍प करणे आवश्‍यक आहे. पर्यावरण संतुलनासाठी माननीय पंतप्रधानाची संकल्‍पना एक विद्यार्थ्‍यी एक वृक्ष ही रूजवणे गरजेचे असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व सामाजिक वनीकरण विभाग परभणी (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्त विद्यमाने भव्‍य वृक्ष दिंडी व वृक्ष लागवड महोत्‍सवाचे उदघाटन कृषि महाविद्यालयाच्‍या प्रांगणात दिनांक 1 जुलै रोजी करण्‍यात आले. महाराष्‍ट्र शासनाने यावर्षी राज्‍यात चार कोटी वृक्ष लागवड मोहिम हाती घेतली असुन या मोहिमेचे उद्घाटन करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. श्रीमती उज्‍वलाताई राठोड या होत्‍या तर उद्घाटक कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व विशेष अतिथी म्‍हणुन जिल्‍हाधिकारी मा. श्री पी शिवा शंकर हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सुशिल खोडवेकर, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, उपजिल्‍हाधिकारी श्री सुदर्शन गायकवाड, तक्रार निवारण अधिकारी डॉ आखिल शेख, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विभागीय वनाधिकारी श्री प्रेमानंद डोंगरे, विभागीय वनाधिकारी श्री सुरेश केवटे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, वृक्ष लागवड करतांना लिंब झाडाची लागवड केल्‍यास याचा पर्यावरणाच्‍या दृष्‍टीने जास्‍त उपयोग होईल. एक विद्यार्थ्‍यी एक वृक्ष ही माननीय पंतप्रधानाची संकल्‍पना महाविद्यालयांनी राबवावी, महाविद्यालयातील शिक्षण पुर्ण झाल्‍यानंतर विद्यार्थ्‍यांनी लावलेले झाडाचे संवर्धन झाले असल्‍याच त्‍यांना पदवी प्रदान करावी, अशी यंत्रणा निर्माण करावी. परभणी कृषि महाविद्यालय राबवित असलेली ही संकल्‍पना निश्चितच कौतुकास्‍पद आहे
जिल्‍हाधिकारी मा. श्री. पी. शिवा शंकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, राज्‍याने चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प केला असुन परभणी जिल्‍हयाचे सव्‍वासात लाख वृक्ष लागवडीचे उदिदष्‍ट आहे. परभणी जिल्‍हयातील ग्रीन कव्‍हर वाढविण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना व युवकांना पुढाकार घ्‍यावा लागेल. आपले घर, शेती, शाळा, महाविद्यालय आदी परीसरात वृक्ष लागवड करून त्‍यांचे संवर्धन करण्‍याची जबाबदारी घ्‍यावी.
अध्‍यक्षीय समारोपात जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. श्रीमती उज्‍वलाताई राठोड यांनी पाणी टंचाई वर मात करण्‍यासाठी समाजातील प्रत्‍येक घटकांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन मोहिमेत योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन केले. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषि विद्यापीठाचा परिसर हिरवळीने नटलेला असुन शहरातील नागरिकांच्‍या आरोग्‍यादृष्‍टीने निश्चितच लाभदायी आहे

यावेळी वृक्ष दिंडीस हिरवा झेंडा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दाखवुन प्रारंभ करण्‍यात  आला तसेच मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ परिसरात वृक्ष लागवड करण्‍यात आलीकार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी महाविद्यालयातील प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांनी वृक्ष लागवड करून वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतली असल्‍याचे सांगितले. सुत्रसंचालन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले तर आभार श्री सुरेश केवटे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य प्रा. विशाला पटणम, प्राचार्य डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ अरविंद सावते, प्राचार्य डॉ अरूण कदम, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, राष्‍ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी व राष्‍ट्रीय छात्र सेनेचे छात्राधिकारी यांच्‍या पुढाकाराने अधिकारी, कर्मचारी व स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतलेकार्यक्रमास जिल्‍हा प्रशासन, सामाजिक वनीकरण विभागातील व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 





वनामकृवित हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी


महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांच्‍या जयंती निमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कृषिदिन म्‍हणुन साजरा करण्‍यात आला. यानिमित्त कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते कै. वसंतराव नाईक यांच्‍या पुतळयाचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा. विशाला पटणम, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण कदम, कृषि‍ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक कडाळे, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद सावते, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते