Saturday, December 4, 2021

वनामकृवित आयोजित राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या वार्षिक प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ

परभणी कृषि महाविद्यालय व श्री शिवाजी महाविद्यालयाच्‍या १५० छात्रसैनिकांचा सहभाग 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या प्रागंणात राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या ५२ महाराष्ट्र बटालियन, नांदेड यांच्या वतीने राष्ट्रीय छात्रसैनिकांकरिता दिनांक ४ ते १० डिसेंबर दरम्यान वार्षिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक ४ डिसेंबर रोजी शिबीरास सुरूवात झाली.

शिबिरात परभणी येथील कृषि महाविद्यालय व श्री शिवाजी महाविद्यालय यांच्‍या १५० विद्यार्थां सहभागी झाले आहेत. शिबिरामध्ये छात्र सैनिंकांना ड्रिल, शस्त्र कवायत, फायरिंग, नकाशा अध्ययन, अंबुश (घात), पॅट्रोल यासह आपत्कालीन व्यवस्थापन, आत्मरक्षा, नागरी सुरक्षा, परिसर स्वछता आदी विविध विषयासह, भारतीय सैन्याचा इतिहास या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दिनांक ७ डिसेंबर रोजी शिबिरार्थी छात्र सैनिंकाकरिता फायरिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये विद्यार्थ्यांना ०.२२ रायफलद्वारे फायरिंग करण्याची संधी मिळणार आहे. शिबिरातून कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस, भारतीय सैन्य दल, केंद्रीय व राज्य राखीव दल इत्यादी परीक्षेच्या निवडीसाठी सराव होणार आहे. राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांकरिता अल्पोपहार व भोजन व्यवस्था बटालियनच्या वतीने करण्यात आलेली असुन इतर सुविधा कृषि महाविद्यालयाच्या वतीने पुरविण्यात आल्या आहेत. सदरिल शिबीर आयोजनाकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कमांडिंग ऑफिसर श्री वेत्रीवेलू , परभणी कृषि महाविद्यालायाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. बटालियनचे सुभेदार गोपाल सिंग, नायब सुभेदार लाल मोहम्मद, हवालदार सुनीलकुमार, योगेशकुमार हे प्रशिक्षण संचलित करित असुन शिबिराच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, सिनियर अंडर ऑफिसर ज्ञानेश्वर पवार, पंढरीनाथ पडुळे, शिव सरकटे, चंद्रकांत सातपुते आदी परिश्रम घेत आहेत.



सामुदायिक विज्ञान महाविद्यालय महाविद्यालयात कृषी शिक्षण दिन साजरा

उद्योजकतेचा ध्यास  आणि सातत्य व्यक्तींना यशस्वी बनवते .... उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक ३ डिसेंबर रोजी आभासी माध्यमाद्वारे कृषी शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्‍त विद्यार्थी  उद्योजकतेकडे आकर्षीत होण्याच्या दृष्टीने कृषी क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे या होत्या तर मार्गदर्शक म्हणून उद्यान पंडित श्री प्रतापराव किसनराव काळे आणि सौ छायाताई साहेबराव शिंदे हे होते.

अध्यक्षीय समारोपात डॉ. जया बंगाळे यांनी कृषी शिक्षण दिनाचे महत्त्व सांगून भारतीय अर्थव्यवस्थेचा कृषी हा आर्थिक कणा असल्याने कृषी शिक्षणाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांनी शेतीकडे एक उत्तम उद्योग म्हणून पाहावे असे नमूद केले.

मार्गदर्शनात श्री प्रतापराव काळे म्‍हणाले की, शेतकरी कुटुंबांनी समृद्ध होण्यासाठी फळबाग लागवडीस प्राधान्य द्यावे, शेतमाल विक्री व्यवस्थापनामध्ये कुटुंबातील सदस्यांनी कामाची विभागणी करून घ्यावी. जीवनात यशस्‍वीतेकरिता सकारात्मक दृष्टीकोणाबरोबरच कामामध्ये सातत्य ठेवावे.

सौ छायाताई शिंदे यांनी बचत गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणी करत असतानाचे आपलेु अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांच्यासमवेत त्यांचे पती श्री साहेबराव शिंदे यांनीही मार्गदर्शन केले, त्यांनी उद्योजकता विकास साधण्यासाठी ग्राहकांची गरज ओळखावी आणि सेवा गुणवत्ता उत्तम ठेवणे गरजेचे असल्‍याचे सांगुन  परभणी जिल्ह्यातील उद्योजक छाया शिंदे यांचे पदार्थ राज्याबाहेर केरळ पर्यंत पोहोचत असल्‍याचे सांगितले.

सुत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. तस्नीम नाहीत खान, डॉ. सुनिता काळे आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, संशोधक कर्मचारी, विद्यार्थी आदींनी सहभाग नोंदविला.


वनामकृविच्‍या पशुसंवर्धन व दुग्धशास्‍त्र विभागात जातीवंत मु-हा पशुधनाचे प्रदर्शन

हिसार (हरियाणा) येथील केंद्रीय म्‍हैस संशोधन संस्‍थेतील जातीवंत मु-हा म्‍हशी व रेडे यांची खरेदी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्धशास्‍त्र विभागात हिसार (हरियाना) येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद - केंद्रीय म्‍हैस संशोधन संस्‍था येथुन जातीवंत मु-हा म्‍हशी व रेडे यांची खरेदी करण्‍यात आलेली असुन सदर पशुधनाचे प्रदर्शन दिनांक 2 डिसेंबर रोजी आयोजित करण्‍यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालन डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ सय्यद इस्‍माईल, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ गिरीधर वाघमारे, प्राचार्य डॉ भगवान आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतकरी बांधवाच्‍या उत्‍पन्‍न वाढीच्‍या दृष्‍टीने पशुधनास महत्‍व आहे, दुग्धव्‍यवसाय हा असा व्‍यवसाय आहे, यात शेणाचा वापर शेणखत म्‍हणुन वापर करण्‍यात येऊन पिक उत्‍पादनात वाढ होते तर दुध विक्रीही करता येते. अधिक दुध उत्‍पादनाकरिता शुध्‍द जातीवंत मु-हा जातीची म्‍हशी ही मराठवाडयाकरिता उपयुक्‍त आहे. परंतु मु-हा जातीच्‍या म्‍हैशीची अनुवंशीक शुध्‍दता जोपासने आवश्‍यक आहे. त्‍यादृष्‍टीने विद्यापीठातील पशुसंवर्धन विभागाने हिसार येथुन खरेदी केलेल्‍या म्‍हशीपासुन उत्‍पादीत होणारे शुध्‍द जातीच्‍या म्‍हशी मुळे दुध उत्‍पादनात वाढ होईल तसेच सदरिल शुध्‍द मु-हा रेडे वळु मर्यादित प्रमाणात शेतकरी बांधवाच्‍या म्‍हैशी भरविण्‍याकरिताही वापरता येऊ शकेल.

शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, शेतकरी उत्‍पन्‍न वाढीकरिता पशुधन व दुग्धव्‍यवसाय यांची शेती पुरक व्‍यवसायाची जोड देण्‍याची गरज आहे. विभागात विकसित केलेले शेळीपालन, कुक्कटपालन, दुग्धव्‍यवसाय, विविध दुग्धजन्‍य पदार्थ निर्मिती व विक्री उपक्रमामुळे विद्यापीठातील विद्यार्थीना प्रत्‍यक्ष व्‍यवसाय कौशल्‍य शिक्षणाची संधी मिळेल तसेच विभागास भेट देण्‍या-या शेतकरी बांधव व महिला शेतकरी यांना माहितीसाठी उपयुक्‍त ठरेल.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, मराठवाडयातील बदलत्‍या हवामानात मु-हा जातीच्‍या पशुधनावर होणार परिणामाचा अभ्‍यास विभागाच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात यावा. विभागातील चांगल्‍या प्रतीच्‍या जातीवंत पशुधनाचा समावेश विविध ठिकाणी आयोजित पशु प्रदर्शनात घ्‍यावा, जेणे करून शेतकरी बांधवा जातीवंत पशुधनाची प्रत्‍यक्ष माहिती मिळेल.

प्रास्‍ताविकात डॉ गजेंद्र लोंढे म्‍हणाले की, हिसार येथुन आणलेल्‍या सहा म्‍हैशी पैकी दोन म्‍हैशीची वंशावळ हे या सरासरी पेक्षा जास्‍त दुध देणा-या आहेत. सदरिल जातीवंत म्‍हैशी व रेडे ही योग्‍य पध्‍दतीने पशुधन खरेदी समिती मार्फत निवड करून योग्‍य ती काळजी घेऊन आणण्‍यात आली आहेत.

सुत्रसंचालन डॉ दत्‍ता बैनवाड यांनी केले तर आभार डॉ रमेश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ शंकर नरवाडे, डॉ नरेंद्र कांबळे, डॉ संदेश देशमुख आदीसह विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Thursday, December 2, 2021

सिंचनाची सोय असल्‍यास उन्‍हाळयात सोयाबीनच्‍या दर्जेदार बियाणाची निर्मिती करता येईल..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवि आयोजित ऑनलाईन उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादन कार्यशाळेत राज्‍यभरातील एक हजार पेक्षा जास्‍त शेतकरी बांधवाचा सहभाग

मराठवाडा  विभागात सोयाबीन पिकाचे क्षेत्रात मोठी वाढ झाली असुन कपाशी पेक्षा जास्‍त क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होत आहे. गत दोन वर्षापासुन खरीप हंगामातील सोयाबीन पीक काढणीच्‍या वेळेस सतत पाऊस पडत असल्‍यामुळे बियाण्‍याची उगवणक्षमता कमी होत आहे. त्‍यामुळे खरीप हंगामात पेरणीच्‍या वेळेस दर्जेदार बियाणाचा तुटवडा निर्माण होतो. त्‍यामुळे ज्‍या शेतक-यांकडे सिंचनाची सोय आहे, असे शेतकरी उन्‍हाळी हंगामात थोडया क्षेत्रावर बीजोत्‍पादन घेऊन घरच्‍या घरी दर्जेदार बियाणे तयार करू शकतात, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील संशोधन संचालनालय आणि सोयाबीन संशोधन योजना यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक २ डिसेंबर रोजी ऑनलाईन उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादन कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, कार्यशाळेच्‍या अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यशाळेस उदघाटक म्‍हणुन इंदौर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्‍थेचे संचालिका मा डॉ निता खांडेकर या उपस्थित होत्‍या तर कार्यक्रमास विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, इंदौर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्‍थेचे माजी संचालक डॉ विरेंद्रसिंह भाटीया, आयोजक सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ शिवाजी म्‍हेत्रे आदींची विशेष उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पूढे म्‍हणाले की, बीजोत्‍पादनाकरिता उन्‍हाळी सोयाबीनची लागवड करतांना  खरिपात ज्‍या जमिनीवर  सोयाबीन  घेतले होते, त्‍या जमिनीवर घेऊ नये, त्‍या ठिकाणी रोग व किडींचा जास्‍त प्रादुर्भाव  होण्‍याची  शक्‍यता  असते. उन्‍हाळी सोयाबीन लागवड करतांना येणा-या समस्‍या खरिप हंगामातील लागवडी पेक्षा वेगळे आहेत, त्‍याची माहिती घेऊन उन्‍हाळी सोयाबीनची लागवड करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, बीजोत्‍पादनाकरिता उन्‍हाळी सोयाबीनची लागवड ही डिसेंबर महिन्‍याचा शेवटचा आठवडा ते जानेवारी महिन्‍याचा पहिला पंधरवाडा या दरम्‍यान करावी. एक एकर लागवडीपासुन आपणास आठ ते दहा एकर साठी लागणारे बियाणे आपणास मिळु शकते. खरिप हंगामातील सोयाबीन बियाणापेक्षा उन्‍हाळी  हंगामातील  सोयाबीन पासुन दर्जेदार  बियाणे  प्राप्‍त होऊ शकते. तसेच मार्गदर्शनात मा डॉ निता खांडेकर म्‍हणाल्‍या की, उन्‍हाळी हंगामातील सोयाबीन पिकांत किड-रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्‍यासाठी किड व रोग व्‍यवस्‍थापनाकडे लक्ष दयावे लागेल. शेतकरी बांधवांनी सोयाबीनच्‍या एकाच वाणाची लागवड करू नये. कमी कालावधीचा वाण असल्‍यास वर्षात दोन किंवा तिन्‍ही हंगामात सोयाबीन लागवड करणे शक्‍य आहे. खाण्‍याकरिता उपयुक्‍त असणारे सोयाबीन वाण सुध्‍दा विकसित झाले असुन त्‍याची सुध्‍दा लागवड शेतकरी करू शकतील. मार्गदर्शनात डॉ विरेंद्रसिंह भाटीया यांनी खरिप हंगामातील पावसाळी वातावरणातील आद्रतेमुळे सोयाबीन बियाणाच्‍या गुणवत्‍तेवर परिणाम होतो असे म्‍हणाले.  

कार्यशाळेतील तांत्रिक सत्रात उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादनाची आवश्‍यकता यावर डॉ सतिष निचळ, बीजोत्‍पादनासाठी वाणाची निवड यावर डॉ मिलिंद देशमुख, उन्‍हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर डॉ शिवाजी म्‍हेत्रे, उन्‍हाळी सोयाबीन पीकावरील किडींचे एकात्मित व्‍यवस्‍थापनावर डॉ राजेंद्र जाधव, उन्‍हाळी सोयाबीन रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ विक्रम घोळवे, उन्‍हाळी सोयाबीन काढणी, हाताळणी व साठवणुक यावर डॉ खिजर बेग आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविक डॉ शिवाजी म्‍हेत्रे यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ राजेंद्र जाधव यांनी केले. कार्यशाळेत उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादनाविषयीचे प्रश्‍न व शंका यावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ उत्‍तरे दिली. ऑनलाईन कार्यशाळेकरिता नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली इंजि. खेमचंद कापगाते, इंजि. रविकुमार कल्लोजी डॉ. अविनाश काकडे, डॉ. शिवराज शिंदे यांनी काम पाहिले. कार्यशाळेत राज्‍यभरातील एक हजार पेक्षा जास्‍त शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदविला, यात महाबीजमहाराष्‍ट्र राज्‍य बीज प्रमाणीकरण यंत्रणाकृषि विज्ञान केंद्रे, कृषि विभाग, शेतकरी बीजोत्‍पादन कंपनीशेतकरी गटशेतकरी बांधव आदींनीही सहभाग घेतला. ऑनलाईन कार्यशाळेचे संपुर्ण प्रसारण विद्यापीठ युटयुब चॅनल youtube.com/user/vnmkv वर उपलब्‍ध  करण्‍यात आले आहे.

ढगाळ वातावरणामुळे हरभ-यावर किडींचा प्रादुर्भाव, वनामकृविच्‍या शास्त्रज्ञांचा किडी व्‍यवस्‍थापनाचा सल्‍ला

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे हरभ-यावर घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तसेच रोप अवस्थेत हरभ-यामध्ये रोप कुरतडणा-या अळीचा देखील काही ठिकाणी प्रादुर्भाव होऊ शकतो त्याकरिता पुढील प्रमाणे किडींचे व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी दिला आहे.

घाटेअळीच्‍या व्‍यवस्‍थापनाकरीता शेतामध्ये इंग्रजी " T " आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत तसेच घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर पुढील पैकी कोणत्‍या एक रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के - ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ८८ ग्रॅम किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा फ्लुबेंडामाईड २० टक्के  - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १२५ ग्रॅम फवारावे. तसेच जमिनीलगत रोपे कुरतडणारी अळीचा प्रादुर्भाव असल्‍यास क्लोरपायरीफॉस २० टक्के - २० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर ४०० मिली खोडाभोवती आळवणी करावी.

असा सल्‍ला कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ.जी.डी.गडदे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत व श्री.एम.बी.मांडगे यांनी दिला असुन अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९००० यावर संपर्क करावा.

संदर्भ - संदेश क्रमांक: ०८/२०२१ (०२ डिसेंबर २०२१) कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी

Wednesday, December 1, 2021

वनामकृवित बचत गटाच्या महिलांसाठी कृषि यांत्रिकीकरण व मुल्यवर्धन प्रशिक्षण शिबीर संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि क्षेत्रात पशुशक्तीचा योग्य वापर - अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत दि. 2930 नोव्हेंबर दरम्यान बचत गटाच्या महिलांसाठी ‘कृषि यांत्रिकीकरण व मुल्यवर्धन’ या विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्‍न झाले.  प्रशिक्षणाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते झाले प्रभारी संचालक संशोधन डॉ. जी. के. लोंढे, मआविमचे जिल्हा संमन्वयक अधिकारी श्री बाळासाहेब झिंगाडे, तालुका कृषि अधिकारी श्री. जगताप, कृषि अभियंत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी महिलांनी बचत गटामार्फत एकत्रित होऊन लघु उद्योग करण्याबाबत सल्‍ला दिला. डॉ. गजेंद्र लोंढे यांनी शेतक­यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतमालाचे मुल्यवर्धन करणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. श्री बाळासाहेब झिंगाडे यांनी महिलांना उद्योगधंदे करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्याबाबतची विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देऊन कृषि विद्यापीठासोबत समन्वय साधुन महिलांच्या विकासासाठी एकत्रीत काम करणे गरजेचे असल्‍याचे मत व्यक्त केले तर प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी महिलांनी शेतमालाचे मुल्यवर्धन करुन प्रक्रिया उद्योग सुरु करण्‍याकरिता सदरिल प्रशिक्षण उपयुक्‍त असल्‍याचे सांगितले.

मौजे पारवा येथील प्रगतशील शेतकरी श्री. महेश शेळके यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठाने विकसीत केलेले बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुन सोयाबीन च्या उत्पादनात वाढ झाली असल्‍याचे सांगितले तर पाथरी येथील प्रगतशील शेतकरी श्री. विवेक खुळे यांनी सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ तंत्रज्ञान व रेशिम उद्योग तंत्रज्ञानामुळे शेतक­यांचा आर्थिकस्तर उंचावण्यात मदत झाली असे प्रतीपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात योजनेच्या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांनी प्रशिक्षण आयोजनाच्या मागील संकल्पना विषद केली व बचत गटातील महिलांना यांत्रिकीकरणाद्वारे कृषि उत्पन्नाचे मुल्यवर्धन कसे करता येईल व त्याद्वारे लघु ऊद्योग निर्माण करता येईल त्या बाबतचे मार्गदर्शन केले.

सदरील प्रशिक्षणात संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांनी कृषि यांत्रिकीकरण प्रात्यक्षिक, महिला गृह उद्योग व बचत गटासाठी पापड मशीन, शेवई मशिन, मिरची कांडप, दाल मिल, पिठ गीरणी, तेलघाणी इत्यादी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवुन त्याबाबतचे मार्गदर्शन केले तर अपारंपारीक उर्जा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राहुल रामटेके यांनी सौर वाळवणी प्रक्रिया उद्योग या विषयावर मार्गदर्शन केले व विविध प्रकारच्या सोलार ड्रायर मध्ये मेथी, कांदे, कारले, वांगी इत्यादी वाळवून प्रात्यक्षिकासह दाखवले. डॉ. गजेंद्र लोंढे यांनी मुल्यवर्धीत दुग्धजन्य पदार्थ निर्मिती जसे की, खवा, पनीर, बासुंदी, श्रीखंड इत्यादी पदार्थ तयार करण्याबाबतचे प्रात्यक्षिक दाखवले आणि मुल्यवर्धना नंतर आर्थिक फायदा कसा होईल यावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. आर. बी. क्षिरसागर व डॉ. के. एस. गाढे यांनी फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग तसेच बेकरी प्रक्रिया उद्योग या विषयी प्रत्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यात विविध फळांपासुन जॅम, जेली, ज्युस तयार करुन दाखवले तसेच बेकरी उद्योगामध्ये ब्रेड, केक, कुकीज व बिस्कीट हे तयार करण्याबाबचे मार्गदर्शन केले. डॉ. स्मिता खोडके, विभाग प्रमुख आणि प्रा. डॉ. शाम गरुड यांनी सोयाबीन प्रक्रियेद्वारे सोयादुध, सोया पनीर, सोयाणे इत्यादी तसेच खरमुरे, फुटाणे, लाह्या इत्यादी पदार्थ प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे तयार करुन दाखवले.

सदरिल प्रशिक्षणाचा समारोप दि. ३० नोव्‍हेबर रोजी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आत्मा प्रकल्प संचालक श्री. संतोष आळसे हे होते, तर प्राचार्य डॉ. उदय खोडके व डॉ. राहुल रामटेके यांची प्र‍मुख उपस्थिती होती. समारोप प्रसंगी मार्गदर्शनात डॉ. धर्मराज गोखले यांनी महिलांनी प्रशिक्षणाव्‍दारे प्राप्‍त कौशल्‍याच्‍या आधारे गृहउद्योग सुरु करण्याचे आवाहन केले. तर श्री. संतोष आळसे यांनी महिलांसाठी आपला शेतमालाचे मुल्यवर्धीत करुन कसा आर्थिक विकास साधवा असा सल्‍ला दिला.

प्रशिक्षणार्थींपैकी सौ. कांचन ढगे, मु. पो. शेंद्रा, सौ. प्रभावती खंदारे, मु. पो. जिंतूर, सौ. जयश्री मस्के, मु. पो. मांडाखळी,  सौ. सुष्मिता कांबळे मु. पो. कारेगाव ता. जि. परभणी यांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्‍यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. निता गायकवाड यांनी केले तर डॉ. संदेश देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्तीतेसाठी श्री. अजय वाघमारे, श्री. दिपक यंदे, श्री. भरत खटींग, श्री. रुपेश काकडे, गजानन पकाणे, श्रीमती सरस्वती पवार आदींनी परिश्रम घेतले. सौ. स्वाती घोडके यांनी आत्माद्वारे उपलब्ध झालेल्या प्रशिक्षणार्थींचे समन्वयक म्हणून कार्य केले. प्रशिक्षणात ५० पेक्षा जास्त महिलांनी नोंदणी केली व विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला.


वनामकृवित डिजीटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काटेकोर शेती यावर आधारित प्रशिक्षणास सुरूवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय कृषि अनुसंधान परिषद व जागतिक बॅक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प - नाहेप अंतर्गत आधुनिक डिजीटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काटेकोर शेती विषयावर १ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्‍यान एक महिन्याचे पदव्युत्तर व आचार्य ‍विद्यार्थाकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक १ डिसेंबर रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे हे होते तर डॉ. भारत आगरकर, डॉ. राहुल भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गोपाळ ‍शिंदे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना नाहेपच्या ‍विविध योजना व प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. तर मार्गदर्शनात डॉ. भारत आगरकर यांनी आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनात करणे गरजेचे असल्‍याचे म्‍हणाले. प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज  गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले असुन प्रशिक्षणात विद्यार्थ्‍यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा काटेकोर शेती करिता वापराबाबत शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणासाठी विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य विद्यार्थांनी मोठया संख्‍येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अनिकेत वाईकर यांनी केले तर आभार इंजि. खेमचंद कापगाते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन सचिव इंजि. खेमचंद कापगाते, इंजि. रविकुमार कल्लोजी तसेच डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. अविनाश काकडे, डॉ. शिवराज शिंदे, मुक्ता शिंदे, रेखा ढगे, गंगाधर जाधव, श्री. जगदीश माने यांनी काम पाहिले.