Thursday, July 20, 2023

वेळीच करा शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन..! , वनामकृविच्‍या किटकशास्‍त्रज्ञांचे आवाहन

मराठवाड्यातील बऱ्याच भागात पाऊस पडल्यानंतर सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर पडताना येत आहेत आढळून 

मागील दोन वर्षाप्रमाणेच या वर्षीही मराठवाड्यातील बऱ्याच भागात पाऊस पडल्यानंतर सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर पडताना आढळून येत आहेत, त्यामुळे सोयाबीन, कापूस यासारख्या पिकामध्ये रोपावस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोगलगायींना वेळीच लक्ष देऊन पुढील प्रमाणे सामुहिकरीत्या एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्‍त्रज्ञ डॉ पी आर झंवर, डॉ डी डी पटाईत, डॉ पी एस नेहरकर यांनी केले.


कसे कराला शंखी गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

गोगलगायींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी विविध पद्धतींचा एकत्रित वापर करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वप्रथम बोर्ड, भिंती, भेगा, दगडे, बांध इत्यादी ठिकाणाहून दिवसा लपून बसलेल्या गोगलगायी शक्य तितक्या प्रमाणात जमा करून नष्ट करणे गरजेचे आहे. मागील वर्षीच्या प्रादुर्भावग्रस्त भागांमध्ये, शेतकऱ्यांनी शेताच्या-बांधाच्या जवळ दोन्ही बाजूने १ ते २ फुटाचे चर काढावेत जेणेकरून गोगलगायीला जाण्यास प्रतिबंध करता येईल. मागील वर्षीच्या ज्या भागांमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता अशा भागातील नदी, नाले, ओढे, ओहळ, कालवा, पांदण किंवा पाणी साचलेला सखल भाग या ठिकाणी गोगलगायी सुप्तावस्थेत असतात, अशा ठिकाणी हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या मोहीम राबवून गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात. शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. पावसाचा अंदाज घेऊन शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा, कोरड्या राखेचा अथवा चुन्याचा १० सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा. 

फळबागेमध्ये झाडाच्या खोडास १० टक्के बोर्डोंपेस्ट (१ किलो मोरचूद + १ किलो चुना १० लिटर पाण्यात) लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही. जैविक व्यवस्थापनामध्ये निंबोळी पावडर, निंबोळी पेंड, ५ टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यास गोगलगायी शेतात येण्यापासून परावृत्त होतात. 

नियंत्रणात्मक  उपाययोजना 

सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील. गोगलगायी जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क घालूनच  करणे गरजेचे आहे. शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी.

गोगलगायींना आकर्षित करण्यासाठी शेतात ठिकठिकाणी गोणपाट ओले करून त्यावर पत्ताकोबी अथवा पपई ची पाने बारीक करून ठेवावीत, त्याला आकर्षित होऊन जमा झालेल्या गोगलगायींवर तंबाखूचा अर्क ५ लिटर (२५० ग्रॅम तंबाखू भुकटी ७.५ लिटर पाण्यात उकळून ५ लिटर तयार झालेले द्रावण) + कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद द्रावण ५ लिटर (३०० ग्रॅम कॉपर सल्फेट ५ लिटर पाण्यात) असे एकूण १० लिटर द्रावण फवारावे, त्याच्या संपर्कात आल्याने गोगलगायी मरतात. लहान शंखीच्या नियंत्रणासाठी १० टक्के मिठाची (१०० ग्रॅम प्रती १ लिटर पाणी) फवारणी फायदेशीर दिसून आली आहे. बोर्डो मिश्रण (१ किलो मोरचूद + १ किलो चुना १०० लिटर पाण्यात), कॉपर सल्फेट (३०० ग्रॅम  १० लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (२५ ग्रॅम १० लिटर पाण्यात) इत्यादीच्या फवारण्या गोगलगाय नियंत्रणासाठी नोंदणीकृत नाहीत, परंतु गोगलगाय नियंत्रणासाठी किंवा त्यांना परावृत करण्यासाठी फळबागेत काही प्रमाणात परिणामकारक आहेत.गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड दाणेदार या गोगलगायनाशकाचा वापर करावा. सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे. शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात. मेटाल्डिहाईड चा वापर, जास्त तापमान व कमी आर्द्रता असते अशावेळी जास्त प्रभावी दिसून येतो.

मेटाल्डिहाईड ला पर्याय म्हणून आयर्न फॉस्फेटचा वापर २ किलो प्रती एकर या प्रमाणात अमिष म्हणून करता येतो. आयर्न फॉस्फेटचा वापर आर्द्रता जास्त असते अशावेळीही प्रभावी दिसून येतो. आयर्न फॉस्फेटच्या संपर्कात आल्यास गोगलगायी उपाशी राहून मरतात. आयर्न फॉस्फेटचा वापर स्पिनोसॅड या कीटकनाशकासोबत (४ मिलि स्पिनोसॅड प्रती २ किलो आयर्न फॉस्फेट) केल्यास जास्ती परिणामकारक होतो. आयर्न फॉस्फेट पाळीव प्राणी व इतर प्राण्यांना सुरक्षित आहे. जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे. दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक २५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबविण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्झाम २५ टक्के ५० ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे. सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे. वरील गोगलगायनाशक अथवा अमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा. या व्यतिरिक्त अंड्यांच्या टरफालाचा चुरा, कोरडी राख,तांब्याची पट्टी अथवा जाळी, बोरिक पावडर, यीस्ट पावडरचे द्रावण, साखरेचे द्रावण इ. चा वापर गोगलगायी व्यवस्थापनासाठी करता येतो. 

अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या वरील प्रमाणे उपाय योजना पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच केल्यास गोगलगायीचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे होते, असे आवाहन कृषि किटकशास्त्र विभागातील शास्‍त्रज्ञ डॉ. पी. आर. झंवर, डॉ. डी. डी.पटाईत आणि  डॉ. पी. एस. नेहरकर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.






Monday, July 17, 2023

वनामकृवि आणि ग्‍लोबल विकास ट्रस्‍ट यांच्‍यात सामंजस्‍य करार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि ग्‍लोबल विकास ट्रस्‍ट, ग्‍लोबल परळी, सिरसाळा  यांच्‍यात दिनांक १४ जुलै रोजी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि ट्रस्‍टचे मुख्‍य विश्‍वस्‍थ मा श्री मयंक गांधी यांच्‍या मुख्‍य उपस्थितीत सामंजस्‍य करार झाला. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, डॉ डी एस मिश्रा, श्‍याम पम्‍मी, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, श्रीमती मिनल गांधी, ट्रस्‍टचे विश्‍वस्थ डॉ हरिशचंद्र वांगे, डॉ हिराकांत काळपांडे आदींची उपस्थिती होती. 

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतकरी कल्‍याणाकरिता परभणी कृषि विद्यापीठ शासनाचे विविध विभाग, देश – विदेशातील विविध संस्‍था, कृषि कंपन्‍या, अशासकीय संस्‍था यांच्‍याशी सामंजस्‍य करार करून कार्य करित आहे. सर्वांच्‍या सहकार्याने शेती व शेतकरी कल्‍याणाचे उद्दीष्‍टे आपण साध्‍य करू शकतो. माती व जल संवर्धन अत्‍यंत आवश्‍यक असुन अनियंत्रित रासायनिक किटकनाशके व खतांचा वापर टाळुन शेतीत अधिकाधिक उत्‍पादनापेक्षा शाश्‍वत उत्‍पादन प्राप्‍त करण्‍यावर भर दयावा लागेल. शेतीत निविष्‍ठांचा अधिकाधिक वापरापेक्षा योग्‍य प्रमाणात व कार्यक्षम वापर आवश्‍यक आहे.

मा श्री मयंक गांधी म्‍हणाले की, महाराष्‍ट्रातील परळी भागात शेतकरी आत्‍महत्‍याचे प्रमाण पाहता, ग्‍लोबल विकास ट्रस्‍टने ग्‍लोबल परळी प्रकल्‍प सुरू केला. नैराश्‍यग्रस्‍त शेतकरी बांधवाना प्रेरणा देऊन त्‍यांच्‍या आर्थिक उन्‍नतीकरीता कार्य करित आहे. ट्रस्‍टच्‍या प्रयत्‍नामुळे आज अनेक शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍नात दुप्‍पटीने वाढ झाल्‍याचे दिसुन येत आहे. हे कार्य विद्यापीठाच्‍या तांत्रिक पाठबळाने पुढे नेण्‍यास मदत होणार आहे. कृषि विद्यापीठे ग्रामीण भागात क्रांती घडवु शकतात, असे ते म्‍हणाले.  

सदर सामंजस्‍य कराराबाबत प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल यांनी माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ सचिन मोरे यांनी केले. ग्‍लोबल विकास ट्रस्‍ट, ग्लोबल परळी, सिरसाळा २०१६ पासून महाराष्ट्रात मृदा संवर्धन, जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाचे कार्य करत आहे. शेतक-यांच्‍या आर्थिक उन्‍नती करता कार्य करित असुन नैराश्‍यग्रस्‍त शेतकरी बांधवाना प्रेरणा देण्‍याचे कार्य करते. विद्यापीठाकडे असलेले विविध विषयातील शास्‍त्रज्ञ सदर ट्रस्‍ट्रच्‍या कृषि विषयक उपक्रमास  ज्ञान तांत्रिक पाठबळ देण्‍याचे कार्य करणार आहे. विशेषत: प्रशिक्षणाव्‍दारे क्षमता विकासावर भर देण्‍यात येणार आहे. विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर पदवीच्‍या विद्यार्थ्‍याकरिता ग्‍लोबल विकास ट्रस्‍ट्रच्‍या माध्‍यमातुन संशोधनात मदत होणार असुन सदर ट्रस्‍टचे कृषीकुल केंद्रात माती विश्लेषण प्रयोगशाळा, वनस्पती पॅथॉलॉजी लॅब, मायक्रोबियल कल्चरल लॅब, फूड प्रोसेसिंग युनिट, रेशीम उत्पादन युनिट इत्यादींच्या स्थापनेसाठी तांत्रिक मार्गदर्शन विद्यापीठ तज्ञ करणार आहे. परळी परिसरातील शेतकरी बांधवाचा विकासाकरिता प्रयत्‍न केला जाणार आहे. मराठवाडा विभागात ट्रस्‍ट माध्‍यमातुन फळबाग लागवडीची मोहिम राबविण्‍यात येत असुन याला संशोधनाची जोड देण्‍याचे कार्य विद्यापीठ करणार आहे.

Saturday, July 15, 2023

राज्‍यात सेंद्रीय शेती विकासाकरिता लोकचळवळीसोबतच शास्त्रीय ज्ञानाचे पाठबळ आवश्‍यक ........... कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि

सेंद्रीय शेती ही एक व्यापक संकल्पना असून ती देशात विविध ठिकाणी विविध प्रकारे केल्या जाते. यात अनेक प्रकारच्या निविष्ठा व विविध पद्धती वापरल्या जातात. शेतकऱ्यांच्या पद्धती, स्वदेशी तांत्रिक ज्ञान यामागील शास्त्रीय कारण व त्यांचे प्रमाणीकरण हा सेंद्रीय शेती संशोधन योजनेचा एक भाग असावा. सेंद्रिय शेतीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी आणि सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी सहकार्य, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन, ज्ञानाची देवाणघेवाण आणि यशोगाथा, समूह दृष्टिकोन समोर ठेवून काम केले पाहिजे. राज्‍यात सेंद्रीय शेती विकासाकरिता लोकचळवळ उभी करता करून शास्‍त्रीय ज्ञानाचे पाठबळ आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रकल्पाच्‍या वतीने महाराष्ट्र राज्यासाठी सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतीतील संशोधन प्राधान्य या विषयावर एक दिवसीय विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन दिनांक १२ जुलै रोजी करण्‍यात आले होते, कार्यशाळेच्या अध्यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, नागपुर येथील प्रादेशिक सेंद्रीय व नैसर्गिक शेती केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. . एस. राजपुत, अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचे प्रकल्प संचालक श्री. संतोष आळसे, यवतमाळ येथील वसंतराव नाईक कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पारलावार, प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री. सुर्यकांतराव देशमुख, श्री. शिवराम घोडके, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, सेंद्रीय शेती मधील कीड व रोगांची समस्या, बाजारपेठ व्यवस्थापन, प्रमाणीकरण या बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील तज्ञांनी व शेतक-यांनी एकत्र येवून पुढील ५ ते १० वर्षासाठीचा संशोधन व विस्तार कामाचा आराखडा तयार करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, कृषि निविष्ठावरील वाढता खर्च, जमिनीचे खालावलेले आरोग्य, रासायनिक कीटकनाशकांचा प्रमाणापेक्षा अधिक वापर व त्यांचे फळे व भाजीपाला पिकातील अवशेष, हवामान बदल या पार्श्वभूमीवर सेंद्रीय शेती ही शेतकरी उत्पादक आणि ग्राहक यांना दोघांनाही महत्वाची आहे. सेंद्रीय शेतीत निविष्ठा या शेतावरच बनविल्या पाहिजेत आणि शेतीवरील खर्च कमी केला पाहिजे. तर डॉ. एन. डी. पारलावर म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीत एकात्मिक शेती पद्धती आणि पीक अवशेष, जीवाणू खते, पिक फेरपालट यावर भर देण्याची गरज आहे.

कुलगुरू मा. डॉ. इंद्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी कार्यशाळेच्या आयोजना मागील भूमिका विषद केली. सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले व आभार डॉ. प्रितम भुतडा यांनी मानले.

तांत्रिक सत्रात मोदीपुरम (उत्तर प्रदेश) येथील भारतीय एकात्मिक शेती पद्धती अंतर्गत पीक विभाग प्रणाली व संसाधन व्यवस्थापन विभागाचे शास्त्रज्ञ (मृद विज्ञान) डॉ. अमृत लाल मीना यांनी सेंद्रीय व नैसर्गिक शेतीत जमिनीचे आरोग्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. प्रकाश चंद घासल यांनी सेंद्रीय शेतीत संशोधनाचे प्राधान्यक्रम आणि नैसर्गिक शेती राष्ट्रीय दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र) डॉ. चंद्र भानू यांनी सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतीमध्ये कीड व रोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. श्री. संतोष आळसे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची नवीन योजना यावर मार्गदर्शन केले तर सेंद्रीय प्रमाणीकरणावर तज्ञ श्री. बाळासाहेब खेमणार, श्री हर्षल जैन मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सोनुने, डॉ. पाटगांवकर. डॉ. शेळके, डॉ. अरबाड आदीसह प्रगतशील शेतकरी, सेंद्रीय शेती करणारे शेतकरी यांनी आपले अनुभव व समस्या मांडल्या, संशोधनासाठी अनेक सुचना केल्या.

राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ पसलावर, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. अमोल दहिफळे, डॉ. आनंद गोरे यांनी आपल्या केंद्राचा अहवाल व माहिती सादर केली. कार्यशाळेस प्राचार्य डॉसय्यद इस्माईलउपसंचालक श्री. बुचे, डॉए. एनडीपसलावारप्रकल्प संचालक (आत्मा) श्री. डी. एस. चव्हाण, कृषि आयुक्तालय सेंद्रीय शेतीचे राज्य समन्वयक श्री. सुनील चौधरी, विभाग प्रमुख डॉ. एम. बी. पाटील, डॉ. पी.एस. नेहरकर, डॉ. पी. एच. वैद्य, डॉ. जी. के. लोंढे, श्री. प्रतापराव काळे, श्री. नरेश शिंदे,  विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके आदींसह देशातील व राज्‍यातील शास्त्रज्ञ, विविध विभागाचे विभाग प्रमुख, राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख, कृषि विभागाचे अधिकारी, सेंद्रीय प्रमाणीकरण तज्ञ, प्रगतशील शेतकरी कार्यशाळेसाठी उपस्थित होते. कार्यशाळेच्‍या यशस्‍वीतेसाठी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान लाभले.


Friday, July 14, 2023

रासायनिक किटकनाशकांचा अतिरिक्‍त वापर टाळावा ..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

क्रॉपसॅप अंतर्गत मराठवाडा विभागातील कृषि अधिकारी व कृषि विस्‍तारक यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

शेतकरी बांधवांनी रासायनिक किटकनाशकांचा अतिरिक्‍त वापर टाळावा, किडींची आर्थिक नुकसान पातळी ओलांडण्‍या आधी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना अवलंबन करून रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळू शकतो. गेल्‍या वर्षी काही भागात गोगलगायीच्‍या प्रादुर्भावामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. क्रॉपसॅप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन किडींच्‍या प्रादुर्भावाचे अचुक सर्वेक्षण करून व्‍यवस्‍थापनाबाबत त्‍वरीत योग्‍य सल्‍ला शेतकरी बांधवापर्यंत पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभाग व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) २०२३-२४ अंतर्गत लातुर व औरंगाबाद विभागातील कृषि विभागातील अधिका-यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा दिनांक १२ जुलै संपन्‍न झाली, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, विभागीय कृषि सहसंचालक (लातुर विभाग) श्री. साहेबराव दिवेकर, विभागीय कृषि सहसंचालक (औरंगाबाद विभाग) श्री. रमेश जाधव, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ कल्याण अपेट, समन्वय अधिकारी डॉ. अनंत लाड आदींची उपस्थिती होती.

कार्यशाळेत श्री. साहेबराव दिवेकर म्‍हणाले की, यंदा पावसा अभावी काही भागात पेरणी खोळंबली आहे. आपत्‍कालीन पीक नियोजनाची गरज निर्माण झाली आहे, त्‍यादृष्‍टीने शेतक-यांना योग्‍य पिकांचे पर्याय सुचविण्‍यासाठी महसूल मंडलनिहाय आराखडे तयार करावेत. तसेच श्री. रमेश जाधव यांनी मराठवाडयात कापुस, सोयाबिन, तुर, मोसंबी, टोमाटो ही महत्वाची पिक असुन यावर येणा-या किडींचे व्यवस्थापनाचा सल्ला प्रसारमाध्यमातून वेळोवेळी देण्यात यावा जेणे करुन शेतक-यांचे होणारे नुकसान टळेल.

डॉ. सय्यद ईस्माईल यांनी क्रॉपसॅपच्या माध्यमातून किड-रोग सर्वेक्षण योग्य वेळी होणे गरजेचे आहे असे सांगितले. प्रास्ताविकात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून वेळोवेळी पिकावरील किड-रोग व्यवस्थापनाचे योग्य सल्ले देण्यात येतील असे सांगितले. सुत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले.

तांत्रिक सत्रात गोगलगाय व्‍यवस्‍थापन, तुर व टोमॅटोवरील किड व्‍यवस्‍थापन यावर डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी मार्गदर्शन केले, सोयाबिन लागवड तंत्रज्ञानावर डॉ. शिवाजी म्हेत्रे, क्रॉपसॅप प्रकल्पाचे प्रभाव, विश्‍लेषणासाठी प्रश्‍नावली यावर डॉ रणजीत चव्हाण, कापूस पिकावरील किड व्यवस्थापनावर डॉ. बस्वराज भेदे, कापुस लागवडीवर डॉ. अरविंद पांडागळे, ऊस, मका व ज्वारी पिकावरील किडिंचे व्यवस्थापनावर डॉ. अनंत लाड, सोयाबिन पिकावरील किड व्यवस्थापनावर डॉ. राजेंद्र जाधव, बदलत्या हवामानातील पिकाचे व्यवस्थापनावर डॉ. कैलास डाखोरे, खरीप पिकावरील रोग व्यवस्थापनावर डॉ. विक्रम घोळवे यांनी मागदर्शन केले.

कार्यशाळेत मराठवाड्यातील लातुर व औरंगाबाद विभागातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा समन्वयक शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) आदी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ. गोसलवाड, डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. दिगंबर पटाईत, डॉ फरिया खान, डॉ. योगेश मात्रे, श्री बालाजी कोकणे, श्री अनुराग खंडारे, दिपक लाड, सुरेश शिंदे व सोपान ढगे आदींनी परीश्रम घेतले.


Wednesday, July 12, 2023

वनामकृविस आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ जाहीर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास ग्रीन मेंटर्स संस्‍थेचा प्रतिष्ठित आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ जाहीर झाला असुन सदर पुरस्‍कार दिनांक १५ सप्‍टेंबर २०२३ रोजी न्‍युयॉर्क ये‍थे आयोजित ७ व्‍या एनवायसी ग्रीन स्कुल कॉन्‍फरन्‍समध्‍ये ७८ व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशना प्रसंगी प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती ग्रीन मेंटर्सचे डॉ विरेद्र रावत यांनी कळविले आहे. 

ग्रीन मेंटर्स ही संस्‍था युनेस्कोच्या ग्रीनिंग एज्युकेशन पार्टनरशिपचे भागीदार असुन पर्यावरण रक्षण जागरूकतेकरिता जागतिक पातळीवर कार्य करते. मागील काही वर्षापासुन विद्यापीठांर्गत संपुर्ण मराठवाडयातील महाविद्यालये, विद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्र इत्‍यादी व्‍दारे राबविण्‍यात येत असलेल्‍या पर्यावरण जागरूक उपक्रम यात वृक्ष लागवड, सौर ऊर्जाचा शेतीत व वीज निर्मिती करून वापर, स्‍वच्‍छ परिसर, सुंदर परिसर, प्‍लॉस्टिक मुक्‍ती करिता प्रयत्‍न, शेतकरी बांधवामध्‍ये सेंद्रीय शेती, जैविक खते, जैविक निविष्‍ठाचा प्रसार व प्रचार आणि विद्यार्थ्‍यांमध्‍ये शैक्षणिक अभ्‍यासक्रमाच्‍या माध्‍यमातुन शाश्‍वत पर्यावरणाबाबत जागरूकता आदी कार्यातील योगदानाच्‍या आधारे विद्यापीठाची आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ करिता निवड करण्‍यात आली आहे. 

पुरस्‍काराबाबत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्हणाले की, विद्यापीठातील अधिकारीप्राध्‍यापक, शास्त्रज्ञ, कर्मचारीव विद्यार्थ्यी यांनी  हरित विद्यापीठाकरिता उपक्रमात केलेल्या कार्याचा गौरव आहे. पर्यावरण रक्षण हे प्रत्‍येकांचे आद्य कर्तव्‍य असुन हरित वसुंधरा उपक्रमात प्रत्येकानी योगदान देण्‍याची गरज आहे. विद्यापीठ परिसरात २५ एकर प्रक्षेत्रावर घनवन व फळबाग लागवडीचे कार्य हाती घेतले असुन जीआयझेड प्रकल्‍पात अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन सौर उर्जेतुन वीज निर्मिती सोबत पिक लागवडीचे संशोधन हाती घेतले आहे. 

Saturday, July 8, 2023

विद्यापीठ विकसित वाणाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍यादृष्‍टीने १२५० एकर प्रक्षेत्रावर पेरणीस सुरूवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विभागकडे स्‍थापनेपासुन मोठया प्रमाणावर जमिनीचे क्षेत्र उपलब्‍ध आहे. या क्षेत्रावर १९७२ ते २००१ दरम्‍यान विविध पिकांच्‍या वाणांचे पायाभुत, पैदासकार, प्रमाणित आणि सत्‍यतादर्शक बीजोत्‍पादन घेतले जात होते. हे दर्जेदार बियाणे शेतक-यांना माफक दरात उपलब्‍ध करून देण्‍यात येत. परंतु गेल्‍या काही वर्षापासुन निधी व मनुष्‍यबळ अभावी यातील बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आणण्‍यात अडचणी निर्माण झाल्‍या.

यावर्षी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍याच्‍या उद्देश्‍याने मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विकासाकडे विशेष लक्ष दिले. सदर प्रक्षेत्रास माननीय कुलगुरू यांनी प्रक्षेत्रास वेळोवेळी भेट देऊन यातुन जास्‍तीत जास्‍त क्षेत्र बीजोत्‍पादनाखाली आणण्‍याकरिता करावयाच्‍या उपाय योजनांवर विचारमंथन करण्‍यात आले. या वर्षी उन्‍हाळयात १२५० पडिक जमीन लागवडीखाली आणण्‍यातील प्रमुख अडसर ठरणा-या क्षेत्रावरील काटेरी झाडेझुडपे काढुण जमिनीची नागंरणी, मोगडणी, चा-या काढणे इत्‍यादी मशागतीचे कामे करण्‍यात आली. याकरिता विद्यापीठातील विविध प्रकल्‍प व योजनातील ट्रॅक्‍टर्स व आवश्‍यक औजारे तसेच जेसीबी यांचा वापर करण्‍यात आला. सद्यस्थितीत जवळपास १२५० एकर जमिन क्षेत्र या खरीप हंगामात पैदासकार बीजोत्‍पादनाकरिता तयार झाले आहे. यावर्षी विद्यापीठ परिसरात नवीन चार मोठया क्षमतेची शेततळी निर्माण करण्‍यात आली असुन जुन्या मोठ्या शेततळयाची दुरूस्‍ती करण्‍यात आली आहे, या माध्‍यमातुन ८ – ९ कोटी लिटर पाण्‍याची साठवण क्षमता शक्‍य होणार आहे. यामुळे बीजोत्‍पादनाकरिता संरक्षित सिंचन देणे शक्य होणार आहे.

दिनांक ६ जुलै रोजी मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावर नवीन लागवडीकरिता तयार करण्‍यात आलेल्‍या प्रक्षेत्रावर बीजोत्‍पादन कार्यक्रमातंर्गत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते पेरणीचे उदघाटन करण्‍यात आले. यावेळी कुलगुरू म्‍हणाले की, विद्यापीठ विकसित विविध वाणांच्‍या बियाणास शेतकरी बांधवांची मोठी मागणी असुन विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍याकरिता विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर मोठया प्रमाणावर पैदासकार बीजोत्‍पादन कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. या पैदासकार बियाणे पासुन प्रमाणित व सत्‍यतादर्शन बीजोत्‍पादन मोठया करणे शक्‍य होऊन विद्यापीठ विकसित वाणांचे जास्‍तीत जास्‍त बियाणे शेतकरी बांधवाना उपलब्‍ध होईल.  

यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, सहयोगी संचालक बियाणे डॉ के एस बेग आदीसह इतर मान्‍यवर उपस्थित होते. या क्षेत्रावर विद्यापीठ विकसित विविध वाणांचे खरीप हंगामात सोयाबीन पिकांच्‍या एमएयुएस-६१२, एमएयुएस-७१, एमएयुएस-७२५ आणि जेएस-२०-११६ तसेच तुर पिकांचा बीडीएन-७११, बीडीएन-१३४१ या वाणांचे पैदासकार बीजोत्‍पादन घेण्‍यात येणार आहे. माननीय कुलगुरू यांनी व्‍यक्‍तीश: लक्ष घालुन आवश्‍यक यंत्रसामुगी उपलब्‍ध करून दिल्‍याने एवढे मोठे प्रक्षेत्र लागवडीखाली आणता येऊ शकले, अशी माहिती मध्‍यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ विलास खर्गखराटे यांनी दिली. सदर बीजोत्‍पादनाकरिता विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व मजुर वर्गाच्‍या मोठया प्रमाणात परिश्रम घेत आहेत.




उन्‍हाळयात १२५० एकर जमीन लागवडीकरिता तयार करतांना