Tuesday, September 22, 2026

वनामकृविच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयात ‘दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळावा’ उत्साहात संपन्न

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन; नवप्रवेशित विद्यार्थ्यांना संस्कार, संघर्ष आणि सेवाभावी वृत्तीचा संदेश

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळावा’ उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या शिक्षण विभाग, जिमखाना विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाइन पद्धतीने भूषविले. विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांचीही ऑनलाइन प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट उपस्थित होते. तसेच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शरद जोगदंड आणि तहसीलदार श्री. विलास तरंगे यांची विशेष उपस्थिती होती.

उद्घाटनपर मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार आत्मसात करण्याचे आवाहन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग सेवाभावी वृत्तीने शेतकरी आणि समाजाच्या हितासाठी करावा, असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन केले. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, कृषि क्षेत्रातील सुधारणा आणि विकास हाच देशाच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पोलीस निरीक्षक श्री. शरद जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर अत्यंत डोळसपणे करावा. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. यासोबतच विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून कटाक्षाने दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

तहसीलदार श्री. विलास तरंगे यांनी विद्यार्थ्यांनी सजग समाजभान ठेवून तसेच आई-वडिलांच्या अपेक्षा आणि विश्वासाचा विचार करून मनापासून शिक्षण घ्यावे, असे सांगितले. पालक आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्याशी आशा-आकांक्षा जोडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता जबाबदारीने वाटचाल करावी, असे त्यांनी नमूद केले.

प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण केला. दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते. संघर्ष हाच यशाचा खरा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालक प्रतिनिधी श्री. सुधाकर देशमुख आणि श्रीमती बालिका मुढे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नवप्रवेशित विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि महाविद्यालय, अंबाजोगाईचे अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड यांनी केले. श्री. राजेश रेवले यांनी काव्यात्मक आणि बहारदार शैलीत सूत्रसंचालन केले, तर शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ. विजयकुमार जाधव यांनी आभार मानले.

नवप्रवेशित विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणाची दिशा, सामाजिक जबाबदारी, तंत्रज्ञानाचा सजग वापर आणि संस्कारमूल्यांची जाणीव करून देणारा हा ‘दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळावा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.











वनामकृविद्वारा सेवा संकल्प अभियानांतर्गत बाभूळगाव येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यभर दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कृषि विद्यापीठांमार्फत शेतकरी सेवा व मार्गदर्शन, कृषि तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व प्रसार, कृषि नवोपक्रम, सामाजिक उपक्रम, जलसंधारण तसेच शाश्वत शेतीबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्याअनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाभूळगाव, ता. जि. परभणी येथील शेतकऱ्यांसाठी विद्यापीठात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे आणि डॉ. पपीता गौरखेडे यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. भगवान असेवार यांनी ‘सेवा संकल्प अभियान’चा उद्देश स्पष्ट करून शाश्वत शेती, जलसंधारण आणि आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्त्व विशद केले. बदलत्या हवामान परिस्थितीत उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने व कार्यक्षम वापर करून शेती अधिक सक्षम आणि शाश्वत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

डॉ. मधुकर मोरे यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पाणी अंदाजपत्रक (वॉटर बजेटिंग) तयार करण्याचे महत्त्व सांगितले. उपलब्ध पाणीसाठा, जमिनीतील ओलावा आणि संभाव्य पर्जन्यमान यांचा विचार करून रब्बी हंगामातील पिकांची निवड व क्षेत्राचे नियोजन करावे. तसेच उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

डॉ. पपीता गौरखेडे यांनी मृद आरोग्य, मृद परीक्षण आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. माती परीक्षणाच्या आधारे खतांचा संतुलित वापर करणे, जमिनीतील सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण वाढविणे तसेच जमिनीची सुपीकता व उत्पादकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी पिकांची सद्यस्थिती, रब्बी हंगामाचे नियोजन, पाण्याची उपलब्धता, मृद आरोग्य, खत व्यवस्थापन तसेच विविध कृषि तंत्रज्ञानाबाबत प्रश्न विचारले. उपस्थित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या समस्यांचे निरसन केले.

या मार्गदर्शन कार्यक्रमास बाभूळगाव येथील श्री. ज्ञानोबा गणपतराव पारधे, श्री. उत्तम दशरथ दळवी, श्री. बाळाभाऊ बाबूराव जमरे, श्री. ज्ञानोबा तुकारामजी पारधे, श्री. तुळशीराम माणिक पारधे, श्री. रघुनाथ लक्ष्मणराव तुरधने, श्री. राधाजी पांडुरंग आळशे, श्री. आसाराम सोनाजी कारके आणि श्री. कैलास बालाजी धुमाळ आदी शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेश खटींग आणि अमर राऊत यांनी परिश्रम घेतले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यापीठातील संशोधन, आधुनिक कृषि तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचे शास्त्रीय मार्गदर्शन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, बदलत्या हवामान परिस्थितीत योग्य कृषि निर्णय घेण्यासाठी या उपक्रमाचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे.

वनामकृविच्या लातूर येथील कृषि महाविद्यालयास पदव्युत्तर विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृहास १४.७५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली ९६ विद्यार्थिनींच्या क्षमतेचे सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येणार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीअंतर्गत कृषि महाविद्यालय, लातूर येथे पदव्युत्तर विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृह इमारत बांधण्यास महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने रु. १४ कोटी ७४ लाख ७१ हजार ६५० इतक्या अंदाजपत्रकीय खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर आणि अधिष्ठाता डॉ. दिगंबर पेरके यांनी नवीन वसतिगृहाच्या बांधकामासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या प्रशासकीय मान्यतेबद्दल विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

कृषि महाविद्यालय, लातूर येथे पदव्युत्तर विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह उपलब्ध नसून, विद्यमान वसतिगृहाची क्षमताही अपुरी आहे. त्यामुळे पदव्युत्तर विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शासनाकडे सादर केला होता. प्रस्तावित वसतिगृहाची ९६ विद्यार्थिनींची निवास क्षमता असून, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या तांत्रिक समितीने या प्रकल्पाची किंमत रु. १४७४.७१ लाख निश्चित केली होती.

प्रस्तावित वसतिगृहाचे एकूण बांधकाम क्षेत्र २७०९.४० चौ.मी. असून, तळमजला आणि पहिला मजला प्रत्येकी १३५४.७० चौ.मी. क्षेत्रफळाचा प्रस्तावित आहे. अंदाजपत्रकात इमारत बांधकामासोबतच पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्था, अंतर्गत व बाह्य विद्युत व्यवस्था, पथदिवे, अग्निशमन व्यवस्था, संरक्षक भिंत व प्रवेशद्वार तसेच चेनलिंक कुंपण आदी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार या कामाची अंमलबजावणी यंत्रणा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी राहणार आहे. या नवीन वसतिगृहामुळे कृषि महाविद्यालय, लातूर येथील पदव्युत्तर विद्यार्थिनींच्या निवासाची सुविधा वाढणार असून, त्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि शैक्षणिक वातावरणास पोषक निवासव्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

पदव्युत्तर विद्यार्थिनींसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही प्रशासकीय मान्यता महत्त्वपूर्ण असून, कृषि शिक्षणाच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला यामुळे चालना मिळणार आहे.




वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना ‘बेस्ट व्हाईस-चान्सलर अवॉर्ड-२०२५’

 कृषि शिक्षण, संशोधन, नवोन्मेष, विस्तार व शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञानातील उल्लेखनीय योगदानाची दखल

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना कृषि शिक्षण, संशोधन, नवोन्मेष, विस्तार शिक्षण तसेच शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञानाच्या प्रसारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘बेस्ट व्हाईस-चान्सलर अवॉर्ड-२०२५’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ऑल इंडिया ॲग्रीकल्चरल स्टुडंट्स असोसिएशन (एआयएएसए - AIASA) यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार ‘५व्या आंतरराष्ट्रीय ऑरगॅनिक अँड नॅचरल राईस प्रॉडक्शन सिस्टिम्स (ORP-5)’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी लक्ष्मीपत सिंघानिया सभागृह, नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. या परिषदेसाठी ऑल इंडिया ॲग्रीकल्चरल स्टुडंट्स असोसिएशन, युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस, रायचूर आणि इंडोनेशिया येथील आयपीबी विद्यापीठ (IPB University, Indonesia) हे आयोजक सहभागी आहेत.

हा सन्मान माजी केंद्रीय राज्यमंत्री, मानव संसाधन विकास व जलसंसाधने मंत्रालय; नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन तथा प्रमुख पाहुणे माननीय डॉ. सत्यपाल सिंह, इम्फाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू पद्मभूषण प्रा. (डॉ.) आर. बी. सिंह, आयोजन समिती अध्यक्ष प्रा. (डॉ.) सहदेव सिंह, एआयएएसएचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. निनाद महाजन, रायचूर कृषी विज्ञान विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. गुरुराज सुंकड,  निमॅटोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पंकज, ORP-5 चे आंतरराष्ट्रीय संयोजक प्रा. (डॉ.) स्टेफानो बोच्ची, जपान येथील तोहोकू विद्यापीठाचे प्राध्यापक प्रा. (डॉ.) मिजुहिको निशिदा, AIASA चे आधारस्थंभ डॉ. आर. पी. सिंह, संरक्षक, ORP-5 चे आयोजन सचिव प्रा. वाय. व्ही. सिंह आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुरस्काराच्या प्रशस्तीपत्रात प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाबरोबरच कृषि शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि विस्तार क्षेत्रातील योगदानाची विशेष दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ड्रोन तंत्रज्ञान, कृषि यांत्रिकीकरण, शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञान आणि देशभर तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच संस्थात्मक विकास, संशोधन भागीदारी, पायाभूत सुविधांचा विकास, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या (CSR) माध्यमातून मिळविलेला भरीव निधी यामध्ये त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या २,००० एकरांपेक्षा अधिक पडीक जमिनीचे उत्पादक कृषि क्षेत्रात रूपांतर करण्याच्या कार्याचीही प्रशस्तीपत्रात विशेष नोंद घेण्यात आली आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेत सेंद्रिय तांदूळ उत्पादन प्रणालीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यांत्रिकीकरण आणि डिजिटल बुद्धिमत्ता  (AI-Driven Mechanisation and Digital Intelligence for Organic Rice Production Systems)’ या थीम VII वरील तांत्रिक सत्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविली. या सत्रात सेंद्रिय तांदूळ उत्पादन प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषि यांत्रिकीकरण, डिजिटल तंत्रज्ञान, अचूक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासंदर्भात विविध विषयांवर तज्ज्ञांनी चर्चा केली.

प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामध्ये कृषि शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण, डिजिटल कृषि, हवामान-स्मार्ट कृषि, कृषि यांत्रिकीकरण आणि शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञान यांना विशेष चालना देण्यात येत आहे. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत ‘बेस्ट व्हाईस-चान्सलर अवॉर्ड-२०२५’ हा सन्मान प्राप्त झाल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लौकिकात आणखी भर पडली आहे.

या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे अधिकारी, संचालक, अधिष्ठाता, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच कृषि क्षेत्रातील विविध घटकांकडून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



For English

Monday, September 21, 2026

वनामकृविद्वारा सेवा संकल्प अभियानांतर्गत सोन्ना येथे शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

 रब्बी हंगामातील पिके, हवामान बदल व कीड व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियानांतर्गत संपूर्ण मराठवाड्यात विविध उपक्रम दिनांक १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राबविण्यात येत आहेत.

याच अभियानांतर्गत सोमवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी मौजे सोन्ना, ता. पूर्णा येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, सोन्ना यांच्या वतीने रब्बी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सेवा संकल्प अभियानाची माहिती देऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी मृदाशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी मातीचे आरोग्य तसेच अल निनोच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (हवामान संशोधन)चे प्रभारी अधिकारी डॉ. कैलास डाखोरे यांनी अल निनोच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील पावसाचा अंदाज आणि हवामान बदल याबाबत माहिती दिली. तसेच कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे श्री. मधुकर मांडगे यांनी ऊस पिकावरील पायरीला व पांढरी माशीचे व्यवस्थापन तसेच रब्बी हंगामातील किडींचे व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी श्री. वाघमोडे, धानोरा काळे येथील प्रगतिशील शेतकरी श्री. प्रताप काळे, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री. बळीराम कदम तसेच सोन्ना व परिसरातील जवळपास १०० शेतकरी उपस्थित होते.



Sunday, September 20, 2026

शाश्वत कृषि विस्तारासाठी शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद महत्त्वाचा – माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे

अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे उद्घाटन; वनामकृविचे  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची उपस्थिती



जागतिक हवामान बदलाचे परिस्थितीत आता शेती व्यवसायात काळसुसंगत बदल क्रमप्राप्त असून महाराष्ट्र राज्याच्या कृषि उत्पादन वृद्धीसाठी आणि एकूणच कृषि क्षेत्राच्या ऊर्जेतावस्थेसाठी कृषि विद्यापीठांसह तत्सम संस्थाद्वारे विकसित प्रगत कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करणे सोबतच त्यांचा अवलंब आणि वापर गरजेचा असल्याचे वास्तविक प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांचे प्रतिकूलपती माननीय ना. श्री.दत्तात्रय भरणे यांनी केले. ते दिनांक २० सप्टेबर २०२६ रोजी विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन तथा प्रकल्प संचालक आत्मा, महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे आयोजित तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे उद्घाटन प्रसंगी उद्घाटक तथा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित शेतकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन करताना बोलत होते.

कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञानासह उत्तम प्रतीचे पीक वाण उपलब्ध करून  पिक उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची भूमिका निभावली असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशपातळीवर एकमेव अशी १९८२ सालापासून सुरू असलेली शिवार फेरीची परंपरा आजही विद्यापीठ जोपासत असल्याचे सांगताना माननीय ना. श्री भरणे केवळ शेतकरी बंधू भगिनीच नव्हे तर विस्तारकर्ते, युवा वर्ग, लोकप्रतिनिधी आदी सर्वांनीच शिवार फेरी केली पाहिजे असे आवाहानात्मक प्रतिपादन आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात केले.

शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाकरिता कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे अनेक पिक वाण व कृषिविषयक तंत्र विकसित करून विद्यापीठाने राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग सुकर केला असून दुष्काळी परिस्थितीतही  पिकांची योग्य वाढ राखून भरीव उत्पन्न देणारे तंत्रज्ञान विकसित करून या विद्यापीठाने विदर्भाच्या शेतीचा कायापालट केला असल्याचे सांगताना आता मात्र शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठाव्दारे विकसित तंत्रज्ञान वापरणे बाबत येथील शास्त्रज्ञांशी नियमित मनमोकळी चर्चा करणे आवश्यक असल्याचे सांगत शेतकरी - शास्त्रज्ञ सुसंवाद शाश्वत कृषि विस्ताराचा पाया असल्याचे महत्वपूर्ण प्रतिपादन देखील कृषिमंत्री माननीय नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यापीठाच्या कृषि संशोधन व विस्तार कार्याची प्रशंसा करून विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या 'आदर्श दत्तक गाव' हा उपक्रम राज्याचे कृषि धोरण म्हणून अवलंबण्याची गरज प्रतिपादित केली.

या  प्रसंगी महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळ पक्ष मुख्य प्रतोत (मंत्री दर्जा) मा आ. श्री. रणधीर सावरकर, अकोला जिल्ह्याचे युवा खासदार मा. श्री.अनुप धोत्रे,  महाराष्ट्र राज्याचे कृषि सचिव मा. श्री. परिमल सिंग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू मा.कर्नल प्रा.(डॉ). शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू मा.डॉ.विलास खर्चे, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. ॲड.श्री किरण सरनाईक, विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. धीरज लिंगाडे,  विधानसभा सदस्य मा. आ. श्री. हरीश पिंपळे, महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त मा.श्री. सुरज मांढरे, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद पुणे, चे महासंचालक मा.श्री. राहुल माहिवाल, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य सर्वश्री मा. रामेश्वर ठाकरे, मा. शिवराम घोडके माजी कार्यकारी परिषद सदस्य मा. श्री. अमोल मिटकरी, महाराष्ट्र कृषि उद्योजकता विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांचेसह विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषि डॉ. देवानंद पंचभाई, नियंत्रक डॉ.हेमंत ठाकरे, कुलसचिव श्रीमती प्रिती रोडगे, विद्यापीठ अभियंता सुनील थोटांगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरील  उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले व मा.कृषिमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या विविध प्रकाशनांसोबतच विद्यापीठाव्दारे राबविण्यात येत असलेल्या आदर्श ग्राम  अभियानांतर्गत संकलित  माहितीवर आधारित एका पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यासोबतच विद्यापीठांतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे आभासी पद्धतीने पायाभरणी तथा लोकार्पण करण्यात आले.

 तत्पूर्वी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील एकंदर २२ एकर क्षेत्रातील विविध जिवंत पिक प्रात्यक्षिकांना मंत्री महोदयांनी भेट देऊन पाहणी केली. तीन दिवसीय शिवार फेरीत संपूर्ण विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींना निमंत्रित केले असून अधिकाधिक शेतकरी बंधू-भगिनींना शिवार फेरीत सहभागी होण्याचे दृष्टीने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाचे पार्श्वभूमीवर महिला शेतकरी वर्गाला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी केले आहे.





Saturday, September 19, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची धर्मापुरी येथील दादा लाड कापूस तंत्रज्ञानानुसार लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकास भेट

 


दादा लाड कापूस तंत्रज्ञानानुसार लागवड करण्यात आलेल्या मौजे धर्मापुरी, ता. परभणी येथील प्रगतिशील शेतकरी श्री. राजेंद्र सोनी यांच्या शेतास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी भेट देऊन कपाशी पिकाची पाहणी केली. या वेळी दादा लाड कापूस तंत्रज्ञानाचे जनक पद्मश्री माननीय श्री. श्रीरंग (दादा) लाड यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाच्या वापरातून दुष्काळी परिस्थितीतही कपाशीची चांगली वाढ व बोंडधारणा झाल्याचे निदर्शनास आले.

या शेतातील दादा लाड कापूस तंत्रज्ञानानुसार लागवड केलेल्या कपाशीच्या झाडांवर सुमारे २५ ते ३५ बोंडे पक्व अवस्थेत आढळून आली, तसेच मोठ्या प्रमाणावर पाते असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या पिकाला खताची केवळ एक मात्रा देण्यात आली असून, केवळ दोन फवारण्या करण्यात आल्याचे शेतकरी श्री. राजेंद्र सोनी यांनी सांगितले.

या तंत्रज्ञानामध्ये गळफांद्या काढणे व शेंडा खुडणे यामुळे झाडाची वाढ नियंत्रित राहते. परिणामी फळधारणेची लांबी वाढून खोड जाड होते. शेंडा खुडल्यामुळे कोवळी पाने झाडावर राहात नसल्याने पानांद्वारे होणारे पाण्याचे बाष्पीभवन तुलनेने कमी होण्यास मदत होते. सध्या जमिनीत पाण्याचा ताण असल्याने शेतात भेगा पडलेल्या असतानाही या तंत्रज्ञानानुसार लागवड केलेले कपाशीचे पीक चांगल्या अवस्थेत असल्याचे माननीय कुलगुरूंच्या पाहणीत दिसून आले.

या पाहणीनंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, दुष्काळी परिस्थितीत जमिनीत पाण्याचा ताण असतानाही दादा लाड कापूस तंत्रज्ञानानुसार लागवड केलेल्या कपाशीमध्ये चांगली वाढ व बोंडधारणा दिसून येत आहे. कमी निविष्ठा वापरून पिकाची वाढ नियंत्रित ठेवण्याच्या या तंत्रज्ञानातून प्रतिकूल परिस्थितीतही समाधानकारक उत्पादनाची शक्यता दिसून येते.

या वेळी पद्मश्री माननीय श्री. श्रीरंग (दादा) लाड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अनंत लाड,  प्रगतशील शेतकरी श्री. सुभाष महाजन, श्री. माऊली कापसे, यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.