Wednesday, July 25, 2018

बी.टी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव


मा. जिल्हाधिकारी श्री. पी. शिवाशंकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली पथकाने दिल्‍या जिल्हयातील
विविध जिनिंग मिल्सना भेटी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषि विभागाच्‍या माध्‍यमातुन पिकांवरील कीड-रोग व सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत सर्वत्र कीड रोगाचे सर्वेक्षण करण्यात येत असून दि. 24 जूलै रोजी गुलाबी बोंडअळीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याच्‍या उद्देश्‍याने मा. जिल्हाधिकारी श्री. पी. शिवाशंकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली अप्पर जिल्हाधिकारी श्री अण्णासाहेब शिंदे, कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी, श्री. सागर खटकाळे, किटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, तालूका कृषि अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे यांच्या पथकाने जिल्हयातील विविध जिनिंग मिल्सना भेटी दिल्‍या. तसेच क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ब्राम्हणगाव परीसरातील प्रक्षेत्रास भेट देऊन सर्वेक्षण कामाचा आढावा मा जिल्‍हाधिकारी यांनी घेतला. गुलाबी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी मोठया प्रमाणात कामगंध सापळे लावण्याचे मा. जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.
दरम्यान मोजे. मांडाखळी ता. परभणी येथे किटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, डॉ. कृष्णा अंभुरे, तालुका कृषि अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे, मंडळ कृषि अधिकारी श्री. के. एम. जाधव यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली असता बी. टी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावाची सुरुवात झाल्याचे आढळून आले.
सदरील आढळून आलेला प्रादुर्भाव हा अल्पप्रमाणात असून त्यासाठी शेतक­यांनी एकात्मिक पध्दतीने व्यवस्थापन करण्‍याचे गरजेचे आहे.
Ø प्रारंभी कीडीच्या नियंत्रणासाठी हेक्‍टरी 5 कामगंध सापळे लावावेत तर मोठया प्रमाणात पतंग पकडण्यासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत जेणे करुन गुलाबी बोंडअळीचे पंतग एकत्रित मोठया प्रमाणात अकर्षित होऊन नर मादी मिलनामध्ये अडथळा आणता येईल.
Ø पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
Ø कापूस पिकांच्या फुलामध्ये अळी असल्यास अळीग्रस्त फुले म्हणजेच डोमकळया हाताने तोडून अळीसकट नष्ट कराव्यात.
Ø निंबोळी अर्काची फवारणी करावी.
Ø आर्थिक नुकसानीची पातळी एक जिवंत अळी प्रती दहा बोंडे किंवा 8-10 पतंग प्रती सापळा सलग तीन रात्री आढळुन असल्‍यास प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्लयु पी 20 ग्रॅम किंवा लॅमडा साहॅलोथ्रीन 5 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर पॉवर पंपासाठी हे प्रमाण 3 पट करावे.

गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी वरील प्रमाणे उपाय योजना करुन संभाव्य नुकसान टाळावे असे आवाहन विद्यापीठाच्‍या किटकशास्त्र विभागाने केले आहे.




Wednesday, July 18, 2018

मराठवाडयात महिलांच्‍या सहभागाने रेशीम क्रांती शक्‍य.......कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण

वनामकृवित रेशीम उदयोगावर एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण संपन्‍न
कुटुबांतील किंवा शेतीतील कोणतेही काम ग्रामीण भागातील महिला या काटेकोरपणे व शास्‍त्रशुध्‍द पध्‍दतीने करतात, म्‍हणून महिलांनी जर पुरुषांच्‍या बरोबरीने रेशीम शेतीत सहभाग घेतला तर निश्‍चीतच मराठवाडयात रेशीम क्रांती होवू शकते, असे प्रतिपादन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र येथे रेशीम संशोधन योजना व परभणी आत्‍मा यांचे संयुक्‍त विदयमाने ‘‘शेतीवर आधारीत तुती रेशीम उदयोग’’ या विषयावर दिनांक १७ जुलै रोजी आयोजित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, परभणी आत्‍माचे प्रकल्‍प संचालक श्री. के. आर. सराफ, रेशीम संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सी.बी. लटपटे, विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, केंद्रीय रेशीम बोर्डाचे श्री. करंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  
कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले कि, अल्‍प व अत्‍यल्‍प भुधारणा, कोरडवाहू शेती, निसर्गाचा असमतोल, शेतमालाचे बाजारभाव आदी मराठवाडयातील शेतक-यांचे अनेक प्रश्‍न आहेत. गाव पातळीवर शेतमाल प्रक्रिया उदयोगाचा विकास करणे गरजेचे आहे. शेती किफायतशीर करण्‍याच्‍या दृष्‍टीने शेती पुरक उद्योगाची जोड द्यावी लागेल. रेशीम उदयोगातील तांत्रिक बाबी समजून घेतल्‍या तर निश्‍चीतच शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट होईल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी तरुण शेतक-यांना रेशीम शेतीची कासधरा व आपली उन्‍नती करा असे आवाहन करूण म्‍हणाले की, मराठवाडा तुती लागवडीचे प्रमाण वाढत असुन मराठवाडा रेशीम शेतीचे हब होऊ शकते. कोष उत्‍पादनाबरोबर धागा निर्मीती व कापड निर्मीतीची सोय निर्माण झाली तर मराठवाडयाची पैठणी पुन्‍हा नावारुपाला येईल. शेतक-यांनी गटाच्‍या माध्‍यमातून रेशीम धागा व कापड निर्मीती करावी, जेणेकरुन बाजारभावातील चढ-उतार यावर मात करता येईल.
प्रशिक्षणात डॉ. सी. बी. लटपटे यांनी तुती लागवडीमधील बारकावे तंत्रशुध्‍द पध्‍दतीने समजून सांगितले तर आत्‍मा प्रकल्‍प संचालक श्री. के. आर. सराफ यांनी शेंदरी बोंड अळीचे संकट कमी करण्‍यासाठी शेतक-यांनी रेशीम शेतीकडे वळण्‍याचे आवाहन करून परभणी जिल्‍हाधिकारी यांचे मान्‍यतेने प्रशिक्षणासाठी निधी उपलब्‍ध करुन दिल्‍याचे नमुद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. जे. एन. चौंडेकर यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Tuesday, July 17, 2018

विद्यापीठातील दर्जेदार बहुवार्षिक चारापिकांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा....कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण

खरेदीसाठी शेतक-यांचा मोठा प्रतिसाद 
मराठवाड्यातील पशुपालकांची मोठया प्रमाणात असलेल्‍या गरज लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील संकरीत गो पैदास प्रकल्प प्रक्षेत्रावर पंधरा एकर क्षेत्रावर सुधारीत चारापिकांची लागवड करण्यात आलेली आहे. कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते दि. १६ जुलै रोजी चारापिकांच्या ठोबांचा पुरवठ्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार अधिकारी (पशुसंवर्धन) डॉ. कनले, वरिष्‍ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. अशोक जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत दोन लक्ष ठोंबाचा परभणी जिल्हा परिषदेच्‍या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयास पुरवठा करण्यात आला असुन सन २०१८-१९ मध्ये एकुण २५ लक्ष ठोंबाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. 
यावेळी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण म्हणाले की, मराठवाडयात दुग्धव्यवसायास मोठा वाव असुन चारापिकांची कमतरता ही पशुपालकांसमोर मुख्य समस्या आहे. दुग्धोत्पादनास चालना देण्‍यासाठी विद्यापीठ प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या दर्जेदार सुधारित चारापिकांच्‍या ठोंबाची पशुपालकांनी लागवडीसाठी उपयोग करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. 
याप्रसंगी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, विद्यापीठ प्रक्षेत्रावर सतरा बहुवार्षिक व दहा हंगामी चारापिकांची ठोंबे नाममात्र दरात विक्रीसाठी उपलब्ध असुन सद्यस्थिती व हवामानचारापिकांच्या लागवडीस अत्‍यंत उपयुक्‍त आहे. 
सद्यस्थितीत संकरीत गो पैदास प्रकल्‍प येथील पंधरा एकर क्षेत्रावर बहुवार्षिक संकरीत नेपीयर गवताच्या जयवंत, गुणवंत, संपदा (डीएचएन-६), बीएनएच-१०, आयजीएफआरआय-७, सीओबीएन-५ इत्यादी चारापिकांच्‍या जाती उपलब्ध असुन पॅराग्रास, दशरथ, बहुवार्षिक ज्वार ही चारापिके विक्रीस उपलब्ध आहेत.