वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या जिरेवाडी (ता. परळी, जिल्हा बीड) येथील शासकीय कृषि
महाविद्यालय तसेच कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २९ जुलै २०२६ रोजी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, भारत हा कृषिप्रधान देश असून शेती हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा
भक्कम पाया आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी देशातील कृषि उत्पादन लोकसंख्येच्या
अन्नगरजा पूर्ण करण्यासाठी अपुरे होते. मात्र, गेल्या सात
दशकांत भारतीय कृषि क्षेत्राने संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा
स्वीकार आणि वैज्ञानिक शेतीच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज भारत
१४० कोटी लोकसंख्येच्या अन्नसुरक्षेची यशस्वीपणे पूर्तता करत असून अनेक कृषि व कृषि-आधारित
उत्पादनांची निर्यात जगभर करत आहे. अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत भारत आज प्रगत
राष्ट्रांच्या बरोबरीने उभा आहे.
या यशाचे श्रेय भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या देशातील विविध कृषि
विद्यापीठांना, संशोधन संस्थांना तसेच कृषि शास्त्रज्ञांनी
केलेल्या सातत्यपूर्ण संशोधन व नवकल्पना यांच्यासह शेतकऱ्यांच्या कष्टाला जाते,
असेही त्यांनी नमूद केले.
माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, विद्यापीठाने
कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यामध्ये देशभरात आपले
वेगळे स्थान निर्माण केले आहे. विद्यापीठाने मिळविलेला हा दर्जा अधिक
उंचावण्यासाठी कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण,
नाविन्यपूर्ण संशोधन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांवर भर देणे
आवश्यक आहे. भविष्यातील विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणासोबतच कृषि व्यवसाय, उद्योजकता आणि व्यवस्थापनाचे ज्ञान देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी
अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी जिरेवाडी येथे सन २०२४ मध्ये स्थापन झालेल्या शासकीय कृषि
महाविद्यालय व शासकीय कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या स्थापनेचा इतिहास
विद्यार्थ्यांसमोर उलगडला. तत्कालीन कृषिमंत्री तथा आमदार श्री. धनंजय मुंडे यांनी
या महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी घेतलेल्या अथक प्रयत्नांचा उल्लेख करून
महाराष्ट्र शासनाने परिसराच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीचा विचार करून या
संस्थांना मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चार
नवीन शासकीय कृषि महाविद्यालये स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून माननीय कुलगुरूंनी
विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. संत कबीर यांच्या दोह्याचा
संदर्भ देत शैक्षणिक जीवनात गुरुचे स्थान सर्वोच्च असून विद्यार्थ्यांच्या
व्यक्तिमत्त्व घडणीत गुरुची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट
केले.

