वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत दिनांक २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास विभागाच्या प्रमुख तथा प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रमुख समन्वयक डॉ. वीणा भालेराव यांनी विद्यार्थ्यांना गुरूंचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. तसेच महर्षी वेदव्यास यांच्या कार्याची माहिती देत गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद केले. याच दिवशी भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
आपले आई-वडील, आजी-आजोबा तसेच कुटुंबातील इतर ज्येष्ठ सदस्य हे देखील आपल्या जीवनातील गुरूच असल्याने, त्यांनाही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वंदन करून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. ब्रिज सेक्शन व फ्लॉवर्स सेक्शनच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सुंदर भाषणे सादर केली. या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षिका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संध्या देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षिका, मदतनीस तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
