Tuesday, July 28, 2026

शेतकऱ्यांनी आपल्या पाल्यांना कृषि शिक्षणासाठी प्रवृत्त करावे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

मौजे आळंद (ता. फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आयोजित कृषि मेळाव्यात आवाहन

आजच्या घडीला कृषि व्यवसायासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी तसेच कृषि क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या विविध संधींचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या पाल्यांना कृषि शिक्षणासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय, बदनापूर आणि फळ संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आळंद (ता. फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे दिनांक २८ जुलै २०२६ रोजी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यास ते ऑनलाइन मार्गदर्शन करत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत देशात अग्रेसर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कच्चा शेतीमाल थेट बाजारपेठेत विक्री करण्याऐवजी त्यावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करून विक्री केल्यास शेतीतून अधिक उत्पन्न मिळविणे शक्य होईल. कृषि क्षेत्रात उद्योजकता विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध असून, भविष्यात या क्षेत्रासाठी कृषि शिक्षण घेतलेल्या तरुणांची मोठी गरज भासणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पाल्यांना कृषि शिक्षणासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच त्यांनी सांगितले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय कृषि महाविद्यालये कार्यरत असून विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आळंद गावचे सरपंच श्री. कैलास गायके, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच शाहीन अरेब शेख उपस्थित होते. यावेळी कृषि महाविद्यालय, बदनापूरचे अधिष्ठाता तथा 'गोदावरी' तूर वाणाचे जनक डॉ. दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, सहाय्यक प्राध्यापक (रोगशास्त्र) डॉ. संतोष पवार, आणि सहाय्यक प्राध्यापक (कृषिशास्त्र) डॉ. पी. जी. चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मेळाव्यात आले-हळद व मका पिकांतील किडी व रोगांचे व्यवस्थापन, संतुलित खत व्यवस्थापन, खरीप हंगामातील विविध पिकांचे शास्त्रशुद्ध नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब तसेच जैविक खतांचा प्रभावी वापर या विषयांवर शास्त्रज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे समाधान करून तांत्रिक माहिती दिली. मेळाव्यास उपस्थित शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी रावे समन्वयक डॉ. एन. डी. देशमुख व डॉ. एस. आर. वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि महाविद्यालय, बदनापूर येथील सातव्या सत्रातील (RAWE) कृषिदूत दिलीप दळवी, प्रसाद गदादे, अनिकेत सरडे, प्रतीक शिंदे, चैतन्य लोखंडे, आश्विन चौधरी, शिवराज वैद्य, सिद्धेश्वर राऊत, आदित्य गिराम, अनिकेत गायकवाड आणि कल्याण नागलोत यांनी सक्रिय सहभाग घेऊन शेतकरी मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले.

सूत्रसंचालन दिलीप दळवी यांनी केले, तर आभार चैतन्य लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमास कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. माधवराव जाधव, गावचे सहाय्यक कृषि अधिकारी श्री. कैलास चौधरी, कृषिमित्र श्री. जहीर पठाण यांच्यासह परिसरातील प्रगतशील शेतकरी, युवक आणि कृषि महाविद्यालय, बदनापूर येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.