एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आभासी मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील फळ संशोधन
केंद्र (हिमायतबाग) परिसरातील केशर आंबा गुणवत्ता केंद्राच्या रोपवाटिकेला दिनांक २६
ऑक्टोबर २०२६ रोजी शेतकऱ्यांनी भेट देऊन फळपिकांच्या रोपवाटिका व्यवस्थापनाविषयी माहिती
घेतली. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा
हा एक भाग होता. या प्रशिक्षणाला विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांनी आभासी पद्धतीने संबोधित करून मार्गदर्शन केले.
या वेळी शेतकऱ्यांनी संरक्षित वातावरणातील रोपवाटिकेची पाहणी केली. फळपिकांची
दर्जेदार रोपे तयार करण्याच्या आधुनिक पद्धती, रोपांची निगा, पाणी
व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच रोपवाटिकेतील विविध तंत्रज्ञानाविषयी
तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विशेषतः केशर आंब्यासह विविध फळपिकांच्या लागवडीसाठी गुणवत्तापूर्ण
रोपांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांना आधुनिक फलोत्पादन
तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. दर्जेदार लागवड साहित्य, शास्त्रीय पद्धतीने
रोपवाटिका व्यवस्थापन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर यांमुळे फळपिकांची उत्पादकता
व गुणवत्ता वाढविण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.
या प्रशिक्षणाचे आयोजन फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी केले. या प्रशिक्षण व रोपवाटिका भेटीमुळे शेतकऱ्यांना आधुनिक फलोत्पादन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळाली. या उपक्रमातून फळपिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यास चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



