Friday, October 30, 2026

शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता जमा; ९.३४ कोटी शेतकऱ्यांना मिळाला प्रत्येकी २ हजार रुपयांचा लाभ

 वनामकृवित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण




देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २४ वा हप्ता शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वितरित करण्यात आला. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमातून या हप्त्याचे वितरण करण्यात आले.

या योजनेंतर्गत देशातील ९.३४ कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण १८ हजार ६८० कोटी रुपयांहून अधिक सन्मान निधी थेट जमा करण्यात आला. यामुळे प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी २ हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळाला. यावेळी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी उपस्थितांना आणि देशभरातील जनतेला आभासी माध्यमातून मार्गदर्शन केले.

दरम्यान, याच कार्यक्रमात कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ५२१ योजनांचे राष्ट्रार्पण करण्यात आले, तसेच १२ हॉर्टिकल्चर क्लस्टर्सचा शुभारंभही करण्यात आला. कार्यक्रमात गुजरात राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री भुपेंद्रभाई पटेल आणि गुजरातच्या मंत्रीमंडळातील माननीय मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांमध्ये करण्यात आले.

यावेळी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मनोगतात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक जीवनातील महत्त्व विशद केले. मराठवाड्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, या आर्थिक मदतीमुळे शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार असून, दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठीही या निधीचा उपयोग होईल, असे त्यांनी नमूद केले. याबद्दल त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. नीता गायकवाड, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत वरपुडकर, उद्यान पंडित डॉ. भगवानराव ठोंबरे, उद्यान पंडित श्री. प्रतापराव काळे आदी मान्यवर तसेच विविध विभागांचे प्रमुख, प्रभारी अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.