Monday, July 2, 2018

केवळ वृक्ष लागवड नको, वृक्ष संवर्धन आवश्यक.......कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण


वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या परभणी जिल्‍हयातील विविध महाविद्यालये, विद्यालये व संशोधन केंद्र परिसरात तीस हजार वृक्ष लागवड मोहिमेस प्रारंभ

कृषि दिनाचे औचित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी जिल्‍हयातील विविध घटक व संलग्‍न महाविद्यालये, विद्यालये व संशोधन केंद्रे येथील परिसरात तीस हजार वृक्ष लागवड करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला असुन दिनांक 1 जुलै पासुन त्‍याचा प्रारंभ कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यानिमित्‍त कृषि महाविद्यालच्‍या परिसरात राष्‍ट्रीय सेवा योजना व राष्‍ट्रीय छात्रसेना यांच्‍या वतीने वृक्षदिंडी काढुन वृक्ष लागवड करण्‍यात आली. या मोहिमेत शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ अरविंद सावते, प्रभारी प्राचार्या डॉ विजया नलावडे, डॉ जी एम वाघमारे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला. यावेळी आपल्‍या मार्गदर्शनांत कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केवळ वृक्ष लागवड नको तर वृक्ष संवर्धनाचा संकल्‍प करण्‍याचे आवाहन केले. उद्यानविद्या विभाग, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय, सामाजिक विज्ञान महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या परिसरात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते मोठया प्रमाणात वृक्ष लागवड मोहिम राबविण्‍यात आली. या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला.



Sunday, July 1, 2018

महाराष्ट्र राज्यातील कृषी विकासाची पायाभरणी कै. वसंतराव नाईक यांच्याच काळात....कुलगूरू मा. डॉ. अशोक ढवण

कृषि दिनानिमित्‍त वनामकृवितील कृषि महाविद्यालयात आयोजीत व्‍याख्‍यानात प्रतिपादन
माननीय वसंतराव नाईक महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री असतांना 1972 सालच्‍या भीषण दुष्‍काळात खेडयातील अनेक कुटूंबात दोन - दोन दिवस चुल बंद असत, हे पाहुन राज्‍यात पुन्‍हा असा प्रसंग येऊ नये, राज्‍यातील भुक मुक्‍तीसाठी दुरूदृष्‍टी ठेऊन कृ‍षी विकासाचे नियोजन केले, राज्‍यात विविध कृषी विकास योजनांची पायाभरणी त्‍यांनीच केली. पुढे राज्‍याच्‍या कृषी विकासाच मोठी चालना मिळाली म्‍हणुनच त्‍यांना आपण हरितक्रांतीचे प्रणेते असे संबोधीतो, असे प्रतिपादन कुलगूरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने कै. वसंतराव नाईक यांच्‍या जयंती निमित्‍त कृषि दिनाचे औजित्‍य साधुन दिनांक 1 जुलै रोजी आयोजित ‘हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक – जीवन कार्य व कृषि क्षेत्रातील योगदान’ या विषयावर व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ. एन. जी. लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, माननीय वसंतराव नाईक यांनी सतत अकरा वर्ष यशस्‍वीपणे मुख्‍यमंत्रीपद भुषविले. त्‍यांचे शेती व शेतक-यांवर नितांत प्रेम होते, आधुनिक शेतीची संकल्‍पना रूजविण्‍यासाठी त्‍यांच्‍याच काळात राज्‍यातील चार स्‍वतंत्र विभागासाठी चार कृषी विद्यापीठाची स्‍थापना करण्‍यात आली. कसेल त्‍याची जमिन यासाठी क्रांतीकारी असा कुळ कायदा पारित झाला. मजुरांना रोजगार पुरविण्‍यासाठी रोजगार हमी योजना कायदाही त्‍यांच्‍याच काळात लागु करण्‍यात आला. राज्‍यातील शेतीसाठी आवश्‍यक सिंचनाच्‍या व वीजेच्‍या सोयीसाठी अनेक प्रकल्‍पांची पायाभरणी करण्‍यात आली. ते विरोधकांनाही आपलेस करणारे व्‍यक्‍तीमत्‍व होते. आजही राज्‍यातील कृ‍षी क्षेत्रापुढील अनेक आव्‍हाने असुन कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी कृषि तंत्रज्ञाननिर्मिती करून तंत्रज्ञानात्‍मक बाबींचा विकास करावा तर धोरणकर्त्‍यांनी शेतीशी निगडीत धोरणात्‍मक बाबींचा आग्रह धरल्‍यास निश्चितच आपण सर्वांच्‍या सहकार्यातुन शासनाने निश्चित केलेले शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे उदिदष्‍टे साध्य करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाषणात मा. डॉ. अशोक ढवण यांनी सन 1974 साली माननीय वसंतराव नाईक यांच्‍या परभणी कृ‍षी विद्यापीठ भेटीप्रसंगी त्‍यांना जवळुन पाहण्‍याचा योग आल्‍याचे सांगुन त्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाबाबतच्‍या अनेक पैलूंचा उलगडा त्‍यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले तर आभार डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


वनामकृवितील राजमाता जिजाऊ मुलींच्या वसतीगृहातील अद्ययावत व्यायामशाळेचे उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राजमाता जिजाऊ मुलींच्‍या वसतीगृहात अद्ययावत व्‍यायामशाळेचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्रभारी प्राचार्य डॉ विजया नलावडे, विभाग प्रमुख डॉ जी एम वाघमारे, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ राजेश कदम, डॉ जयश्री ऐकाळे, डॉ स्‍वाती झाडे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाची जडणघडण होत असते, त्‍या करिता विद्यार्थ्‍यींनी आपल्‍या चांगल्‍या शारिरीक स्‍वास्‍थ्यासाठी प्रयत्‍नशील राहावे. विद्यापीठ विकसित मुलींच्‍या स्‍वतंत्र अद्ययावत व्‍यायामशाळाचा नियमित वापर करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. मान्‍यवरांनी विविध अद्ययावत व्‍यायामशाळेतील साहित्‍यांची व यंत्राची पाहणी केली. कार्यक्रमास वसतीगृहातील विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या.



वनामकृवित कै. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्‍हणुन साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍त कै. वसंतराव नाईक यांच्‍या पुजन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ अरविंद सावते, प्रभारी प्राचार्या डॉ विजया नलावडे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Sunday, June 24, 2018

विद्यापीठ विकसित मोबाईल अॅप्‍सचा शेतक-यांमध्‍ये प्रसार करावा...... प्राचार्य डॉ डि एन गोखले

परभणी कृषि महाविद्यालयात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्बोधन कार्यशाळा संपन्‍न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम रावे असतो, सदरिल कार्यक्रम राबविण्‍यासाठी उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 21 जुन रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ सी बी लटपटे, डॉ जे व्‍ही एकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले की, कमी कालावधीत येणारे विविध पिकांचे वाण, जीवाणु संवर्धनाची बीजप्रक्रिया, आंतरपिक पध्‍दती आदीसह अनेक उपयुक्‍त व कमी खर्चाचे तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेले आहे, कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी सदरिल तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोचवावे. आज अनेक शेतकरी स्‍मार्टफोनचा उपयोग करित आहेत, त्‍यांना विद्यापीठ विकसित मोबाईल अॅप्‍स वापराबाबतचे प्रात्‍य़क्षिके करून दाखवावित, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
कार्यशाळेत डॉ पी आर देशमुख, डॉ सी बी लटपटे आदीसह विषयतज्ञ व कार्यक्रम अधिकारी यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ जे व्‍ही ऐकाळे यांनी केले तर सुत्रसंचालन रावे प्रभारी अधिकारी डॉ. पी. एस. कापसे यांनी केले. यावेळी कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते. कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असुन या सत्रात विद्यार्थी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेती कसण्‍याचे तंत्र व ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करतात. यावर्षी महाविद्यालयाचे 228 विद्यार्थ्‍यी कृषिदुत व कृषिकन्‍या म्‍हणुन पुढील पंधरा आठवडे परभणी तालुक्‍यातील निवडक दहा गांवात कार्य करणार आहेत.