Friday, July 13, 2018

हुमणी किड व्यवस्थापनाकरिता वनामकृविच्‍या किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

सध्या मराठवाडयामधील सर्व जिल्हयात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी हुमणीचे सुप्त अवस्थेतील भुंगे जमिनीतुन बाहेर पडत आहेत. हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात. प्रौढ अवस्था ही बाभुळ, कडुलिंब, बोर आदी झाडांवर उपजिविका करतात. तर अळी अवस्था पिकांच्या मुळा कुडतूडुन नुकसान करते. प्रौढ भुंगेरे जमिनीतुन निघाल्यानंतर ते बाभुळ, कडुलिंब, बोर आदी झाडांवर राहतात व त्यांचे मिलन होऊन जमिनीत अंडी देतात. अंडयातून निघालेल्या अळया पिकांना नुकसान पोहचवितात. त्यामुळे सध्या जमिनीतुन निघालेल्या हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन अंडी घालण्या अगोदरच झाल्यामुळे अंळी पासून पिकांना होणारे नुकसान टाळता येते, त्‍या करिता पुढील उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे.  
प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन
-    झाडाच्या फांदया हालवून खाली पडलेल्या भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा. चांगला पाऊस पडताच सुर्यास्तानंतर सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुलिंब इत्यादी झाडावर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी जमा होतात. झाडावर जमा झालेली भुंगेरे रात्री 8 ते 9 वाजता बांबुच्या काठीच्या साहाय्याने झाडाच्या फांदया हालवून खाली पाडावेत आणि ते हाताने गोळा करुन रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे. तसेच जो पर्यंत जमिनीतून भुंगेरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे.
-    प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करुन देखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात. हे प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर, झोपडी, विहीरीजवळ किंवा झाडावर लावावेत. सापळयात जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे साधारणपणे संध्याकाळी 7.30 ते 8.30 या कालावधीत लावावेत.
-    किटकनाशकांची फवारणी केलेल्या बाभूळ, कडुनिंब यांच्या फांदया शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावी. रात्रीला भुंगेरे फांदयावरील पाने खाल्यामुळे मरुन जातील.
-    जमिनीतून प्रौढ भुंगेरे निघण्याच्या कालावधीत बाभूळ, कडुनिंब इत्यादी झाडावर सरासरी 20 अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास किंवा झाडांची पाने खाल्लेली आढळल्यास कोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मि.ली. प्रती दहा लिटर पाण्‍यात मिसळून झाडावर फवारणी करावी. फवारणीनंतर 15 दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ देऊ नयेत.
अळीचे व्यवस्थापन
-    ज्या क्षेत्रामध्ये मागील 2 वर्षापासून हुमणीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे, अशा क्षेत्रात पेरणी करतांना जमिनीतुन जैविक परोपजिवी बुरशी मेटारायझियम ॲनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा प्रति हेक्टर 10 किलो या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. किंवा फोरेट 10 टक्के दाणेदार किंवा फिप्रोनिल 0.3 टक्के दाणेदार 25 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात दयावे

वरिल प्रमाणे शेतकऱ्यांनी हुमणीच्या प्रौढ भुंगेरे व अळयांचे सामूहीकरित्या व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन कृषि किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व क्रॉपसॅप प्रकल्पाचे डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. अनंत बडगुजर व डॉ. कृष्णा अंभुरे यांनी केले आहे.

Wednesday, July 11, 2018

वनामकृवितील परभणी येथील प्रक्षेत्रावर बहुवार्षीक चारापिकाचे बेणे विक्रीस उपलब्‍ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील संकरित गो पैदास प्रकल्‍पाच्‍या प्रक्षेत्रावर 15 एकर चारापीक प्रक्षेत्र विकसित करण्‍यात आलेले आहे. या प्रक्षेत्रावर बहुवार्षीक संकरित नेपीअर गवत, जयवंत, गुणवंत, डीएचएन-6, बीएनएच-10, सीओबीएन-5 व आयजीएफआरआय-7 तसेच पॅराग्रॉस, दशरथ, बहुवार्षी ज्‍वारी, सीओएफएस-327, ल्‍युसर्न आदी चारापिके मोठया प्रमाणात लागवड करण्‍यात आलेली आहे. सद्यस्थितीत बहुवार्षीक संकरित नेपीअर, पॅराग्रॉस, दशरथ आदी चारापिकांचे बेणे विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत. सदरिल प्रक्षेत्राचा विकास संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आला आहे. विक्रीसाठी डॉ दिनें‍शसिंग चौव्‍हाण मोबाईल क्रमांक 942317175 किंवा श्री दुधाटे 7588082119 यांच्‍याशी सपर्क साधवा.

Tuesday, July 10, 2018

मौजे जांब येथे साधारणत: 200 जनावरांचे लसीकरण शिबीर

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांर्गत असलेल्‍या परभणी कृषि महाविद्यालच्‍या करडई संशोधन केंद्र येथे कार्यरत असलेल्‍या कृषीकन्‍याच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम व राष्ट्रीय सेवा योजना यांच्‍या माध्यमातुन मौजे. जांब ता. जि. परभणी येथे दिनांक 10 जुलै रोजी जनावरांचे लसीकरण शिबीर घेण्‍यात आले. यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, डॉ. एस. बी. बैनवाड, पशुवैद्यक डॉ. उमेश लकारे, डॉ. विजयकुमार हतागळे, श्री वायद अन्सारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी घटसर्प व फ-या या रोगावरील लस गावातील साधारणत: 200 जनावरांना देण्यात आली. यावेळी शेतक-यांना डॉ. एस. बी. बैनवाड यांनी लसीकरणाचे महत्व पटवुन सांगितले तर पशुवैद्यक डॉ. उमेश लकारे यांनी जनावरांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गावांतील शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. पपीता गौरखेडे व कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वाती झाडे यांच्‍या मार्गदर्शनानुसार कृषीकन्‍यांनी परिश्रम घेतले.

ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत पारवा येथे १७४ जनावरांचे लसीकरण

‌वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्र येथे कार्यरत असलेले कृषीदूतांनी मौजे पारवा ता. परभणी येथे दि. ५ जुलै रोजी जनावरांच्या लसीकरणाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास सरपंच श्री. मुंजाजी तारडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एम. पी. माने, डॉ. बैनवाड, डॉ. ए. एम. भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. एम. पी. माने यांनी जनावरांचे लसीकरण केले तर डॉ. बैनवाड यांनी शेतकऱ्यांना लसीकरणाचे महत्व विशद केले.
यावेळी गावातील १२९ म्हैशी, ३४ गाई व ११ शेळ्या असे एकुण १७४ जनावरांचे घटसर्प व फऱ्या या रोगासाठीचे लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी पांडुरंग काकडे, बाळासाहेब जाधव, प्रल्हाद भेटकार, किशन जाधव, गौतम मेहेदे आदीसह मोठया संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम जगन्नाथ थोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. भोसले यांनी केले.

Sunday, July 8, 2018

देशातील पहिल्‍या जैवसमृध्‍द खरीप ज्वारीच्‍या परभणी शक्‍ती या वाणाचे हैद्राबाद येथे प्रसारण

लोह व जस्ताचे अधिकतम प्रमाण असणारा जैवसमृध्द परभणी शक्ती खरीप ज्वारीचा वाण

परभणी येथील वनामकृविच्‍या ज्‍वार संशोधनातील मोठी उपलब्‍धी


परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय अर्धकोरडवाहु ऊष्‍णकटिबंधीय पीक संशोधन संस्‍था (इक्रीसॅट) यांच्या संशोधन सहभागातुन परभणी शक्ती या लोह आणि जस्ताचे अधिकतम प्रमाण असणाऱ्या खरीप ज्वारीचा जैवसमृध्द वाण वि‍कसित करण्‍यात आला असुन देशातील हा ज्‍वारीचा पहिला वाण ठरला आहे. सदरिल वाणाचे दिनांक 5 जुलै रोजी इक्रीसॅट हैद्राबाद येथे समारंभपुर्वक प्रसारण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण आणि इक्रीसॅटचे महासंचालक मा. डॉ. पीटर कारबेरी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, उपमहासंचालक डॉ. किरण शर्मा, संशोधन संचालक डॉ. पी. एम. गौर, ज्वार पैदासकार डॉ. शिवाजी म्हेत्रे, डॉ. अशोक कुमार आदींसह विद्यापीठातील विविध पिकांचे पैदासकार उपस्थित होते.
देशातील खरीप ज्वारीच्या या पहिल्याच जैवसमृध्द वाणामध्ये लोह व जस्ताचे अधिक प्रमाण असल्यामुळे मानवी जीवनावर व आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे. विशेषत: देशात व जगातही शरिरातील रक्‍तातील लोहाच्‍या कमरतेमुळे अनेक व्‍यक्‍तींमध्‍ये रक्‍तक्षय मोठया प्रमाणात आढळतो, यासाठी हा वाण अत्‍यंत उपयुक्‍त ठरणार आहे. या वाणाची वैशिष्टये म्हणजे यात लोह व जस्‍ताचे प्रमाण अधिकतम आहे, यात लोह प्रती किलो 44 ते 46 मिलीग्रॅम तर जस्त प्रती किलो 32 ते 33 मिलीग्रॅम असुन भाकरीची प्रत चांगली आहे. तसेच कडबाही उच्‍च प्रतीचा असुन उत्पादन क्षमता प्रती हेक्टरी ज्वारीचे 36 ते 38 क्विंटल व कडब्याचे उत्पादन 105 ते 110 क्विंटल आहे. हा वाण खोडमाशी, खोडकीड व काळया बुरशी रोगास प्रतिकारकक्षम आहे.
इक्रिसॅटचे महासंचालक डॉ. पीटर कारबेरी यांनी आपल्‍या मनोगतात इक्रिसॅट येथील शास्त्रज्ञांचे तसेच कुलगुरु डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. शिवाजी म्हेत्रे आदीसह ज्वार संशोधन केंद्र येथील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. आपल्‍या मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. ढवण यांनी परभणी शक्ती (पीव्हीके 1009) हा वाण महिला व लहान मुलांमधील कुपोषण दुर करण्यास अत्‍यंत उपयुक्‍त ठरणार असल्‍याचे सांगुन या वाणाचे विद्यापीठ प्रक्षेत्रावर मोठया प्रमाणावर बीजोत्पादन करुन लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे विषद केले. डॉ. वासकर यांनी परभणी शक्ती वाणाचा शेतक­ऱ्यांमध्ये प्रसार करुन जास्‍त प्रमाणातील लोह व जस्ताचा फायदा लक्षात घेता बचत गटांच्या माध्यमातुन मुल्यवर्धीत पदार्थ ग्राहकांमध्ये लोकप्रिय करण्याबद्दल चालना देणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास परभणी जिल्ह्यातील मौजे मानोलीचे प्रगतशील श्री. मदन महाराज शिंदे, सौ. सुनंदाताई शिंदे, श्री. गणेश घाडगे, सौ. अहिल्याबाई शिंदे आदींनी प्रातिनिधीक स्वरुपात सादरीकरणाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला व त्‍यांनी त्‍याच्‍या शेतावर घेतलेल्‍या परभणी शक्ती या वाणाच्‍या  प्रात्‍यक्षिकाबाबतचा अनुभव सांगुन शास्त्रज्ञांचे आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते शेतक­ऱ्यांना परभणी शक्ती या वाणाच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.