Thursday, May 12, 2022

मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या कडुन वनामकृवितील अनुभवातुन शिक्षण प्रकल्‍पातील पदवी विद्यार्थ्‍यांच्‍या उपक्रमाची पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्‍ध तंत्रज्ञान विभागातील पदवी अभ्‍यासक्रमातील अनुभवातुन शिक्षण प्रकल्पाच्‍या दालनास राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री मा.ना. श्री. आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली, यावेळी विद्यार्थींनी तयार केलेल्‍या दुग्धजन्य उत्पादनाची पाहणी केली, तसेच पदार्थींची चवही चाखली. मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांनी विद्यार्थ्‍यांचे कौतुक केले. याप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री मा.ना. श्री. धनंजय मुंढे, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण मा. ना. श्री. उदय सामंत, कुलगुरु मा. प्रा. डॉ. श्री. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले,  खासदार मा. श्री. संजय जाधव, आमदार परभणी मा डॉ. राहुल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल विद्यार्थांना विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. नरेंद्र कांबळे, डॉ. शंकरजी नरवाडे, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. रमेश पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले. 

Tuesday, May 10, 2022

वनामकृवित विज्ञान संकुलाचे मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते भुमिपुजन संपन्‍न

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठत उभारण्‍यात येणा-या विज्ञान संकुलाचे भुमिपूजन सोहळा पर्यटन व पर्यावरण मंत्री मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते दिनांक 10 मे रोजी संपन्‍न झाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी ऍस्‍ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्‍यात झालेल्‍या सामंजस्‍य करारानुसार विद्यापीठ परिसरातील नियोजित जागेवर भव्‍य विज्ञान संकुल उभारण्‍यात येणार असुन संकुल उभारणीसाठी पर्यटन व पर्यावरण मंत्री मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांनी निधी उपलब्‍ध करून दिला आहे. याकरिता परभणीचे आमदार मा डॉ राहुल पाटील यांच्‍या पुढाकारातुन निधी उपलब्ध झाला आहे. 

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्‍यासपीठावर सामाजिक न्‍याय मंत्री तथा परभणी पालकमंत्री मा ना श्री धनंजय मुंडे, उच्‍च व तंत्र शिक्षण मंत्री मा ना श्री उदय सामंत, परभणीचे खासदार मा श्री संजय जाधव, हिंगोलीचे खासदार मा श्री हेमंत पाटील, परभणीचे आमदार मा श्री राहुल पाटील, प्रभारी कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद टाकसाळे, अप्‍पर जिल्‍हाधिकारी श्री राजेश काटकर, परभणी ऍस्‍टॉनॉमिकल सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ रामेश्‍वर नाईक, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात पर्यटनमंत्री मा ना श्री आदित्‍य ठाकरे म्‍हणाले की, आज समाजास रोजगार, पाणी आदींची गरज आहे. सर्वांनी राजकारणाच्‍या पुढील विचार केला पाहिजे. केवळ शिक्षणच समाजाला व देशाला पुढे नेऊ शकेल. परभणीतील विज्ञान संकुल देशातील पहिलेच भव्‍य संकुल असेल यास कोणत्‍याही प्रकारचा निधी कमी पडु दिला जाणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये जागतिक पातळीचे शास्‍त्रज्ञ घडण्‍याची क्षमता आहे. या विज्ञान संकुलामुळे भावी जागतिक शास्‍त्रज्ञ ग्रामीण भागातुन घडतील, हा अत्‍यंत अभिनव उपक्रम आमदार डॉ राहुल पाटील यांच्‍या संकल्‍पनेतुन साकारत आहे. परभणी हे 'जगात जर्मनी अन भारतात परभणी' असे न घेता ‘जगात परभणी' असे नावारूपाला येईल. परभणी कृषि विद्यापीठातील डिजिटल तंत्रज्ञानावरील प्रकल्‍पामुळे शेतकरी बांधवाचे कष्‍ट कमी करणारे यंत्र विकसित होत आहेत.

भाषणात मा ना श्री धनंजय मुंडे म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने डिजिटल शेत तंत्रज्ञान निर्मितीमध्‍ये पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी प्रशासनात विविध पदावर कार्यरत आहेत. मराठवाडात मोठया प्रमाणावर पर्यटन विकासास वाव आहे. विज्ञान संकुलास पालकमंत्री म्‍हणुन निधी कमी पडु देणार नसल्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले.   

मा ना श्री उदय सामंत म्‍हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन विकसित व्‍हावा याकरिता अकृषि विद्यापीठातही विज्ञान संकुलाची संकल्‍पना राबविण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल.

खासदार मा श्री संजय जाधव म्‍हणाले की, आज विज्ञानाचे युग असुन  परभणीतील विज्ञान संकुल उभारणारे देशातील पहिलेच कृषि विद्यापीठ असेल. परभणी पर्यटन विकासास मोठा वाव असुन मा ना श्री आदित्‍य ठाकरे याकरिता प्रयत्‍न करावेत असे म्‍हणाले.

आमदार मा डॉ राहुल पाटील म्‍हणाले की, मनोरंजन, शिक्षण आणि रोजगार ही तीन उद्दीष्‍ट डोळयासमोर ठेऊन देशातील भव्‍य असे जागतिक दर्जाचे विज्ञान संकुल परभणी साकारत आहे, याकरिता पर्यटन मंत्री मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांनी भरीव असा निधी दिला आहे.  नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुशाखीय शिक्षणास प्राधान्‍य देण्‍यात आले असुन यास अनुरूप हे विज्ञान संकुल असणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन वाढीस लागणार आहे.

प्रभारी कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने गेल्‍या पन्‍नास वर्षात कृषि विकासात भरीव असे योगदान दिले असुन आज विद्यापीठापुढे मनुष्‍यबळाची कमतरता असुन लवकर नौकर भरतीची आवश्‍यकता असल्‍याचे ते म्‍हणाले. 

प्रास्‍ताविकात डॉ रामेश्‍वर नाईक म्‍हणाले की, परभणीतील विज्ञान संकुलात सर्व विज्ञान एकाच छत्राखाली पाहण्‍यास मिळणार आहे. यामुळे समाजात विज्ञानवादी दृष्‍टीकोन वाढीस लागणार आहे. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण आणि डॉ दुर्गादास डोंबे यांनी केले. यावेळी परभणी ऍस्‍ट्रॉनॉमिकल सोसायटीने राबविलेल्‍या विविध वैज्ञानिक उपक्रमांची आणि तांबट शॉर्ट फिल्‍मचे सादरीकरण करण्‍यात आले. तसेच डे टाईम ऍस्‍ट्रॉनॉमी मध्‍ये सुर्यदर्शन व सौर डाग यांचे निरीक्षण करण्‍यात आले. इग्नायटेड माईंडस या विद्यार्थी गटांनी तयार केलेल्‍या रिसर्च पेलोड सॅटॅलाईट चे प्रक्षेपण करण्‍यात आले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी, विज्ञानप्रेमी, विद्यार्थी व नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Saturday, May 7, 2022

डॉ अशोक ढवण हे मातीशी नाते जपणारे व्‍यक्‍तीमत्‍व ....... कृषिरत्‍न मा श्री विजयअण्‍णा बोराडे

वनामकृवित माजी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांचा निरोप समारंभ तर प्रभारी कुलगुरू मा. डॉ प्रमोद येवले यांचा स्‍वागत समारंभ संपन्‍न

डॉ अशोक ढवण एक संवेदनशील व्‍यक्‍तीमत्‍व पण तेवढेच कठोर प्रशासक म्‍हणुन कार्य केले. डॉ ढवण यांचे विद्यापीठाचे विद्यार्थी ते कुलगुरू असा विद्यापीठाशी असलेले प्रदीर्घ नाते आहे. डॉ ढवण मातीशी नाते जपणारे व्‍यक्‍ती असुन हे भविष्‍यातही शेतकरी व शेती विकास याच क्षेत्रात ते आपले योगदान देतील. मागील पन्‍नास वर्षाच्‍या कार्यकाळात परभणी कृषी विद्यापीठाने मराठवाडयातील कृषि क्षेत्रास भरीव असे कार्य केले. सोयाबीन, कापुस, तुर आदी पिकांचे विविध अधिक उत्‍पादक वाण तसेच बायोमिक्‍स सारख्‍या निविष्‍ठा विद्यापीठाने विकसित केल्‍या. डॉ ढवण यांच्‍या संकल्‍पनेतुन विद्यापीठ विकसित बियाणे व निविष्‍ठा विंकेद्रीत स्‍वरूपात विक्रीमुळे मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयातील शेतकरी बांधवाना याचा लाभ होत आहे, असे प्रतिपादन मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त कृषीरत्‍न मा श्री विजयअण्‍णा बोराडे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचा कार्यकाळ दिनांक ६ मे रोजी पुर्ण झाला. महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल तथा वनामकृविचे कुलपती मा श्री भगतसिंह कोश्‍यारी यांनी विद्यापीठाच्‍या कुलगुरूपदी औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले यांची नियुक्‍ती केली आहे. मा डॉ प्रमोद येवले यांनी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या कडुन दिनांक ६ मे रोजी पदभार स्‍वीकारला. यानिमित्‍त विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक ६ मे रोजी कृतज्ञता आणि स्‍वागत समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते,  या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात मा श्री विजयअण्णा बोराडे बोलत होते. व्‍यासपीठावर मा डॉ अशोक ढवण व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. उषाताई ढवण, नुतन कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले, विधान परिषद सदस्‍य तथा विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य मा आमदार श्री सतिश चव्‍हाण, परभणी विभानसभा सदस्‍य तथा विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य मा आमदार डॉ राहुल पाटील, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा श्री निसार तांबोळी, कवि प्रा इंद्रजित भालेराव, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, नियंकत्र श्रीमती दिपाराणी देवतराज आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

सत्‍कारास उत्‍तर देतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, जीवनात नैतिकता अत्‍यंत महत्‍वाची असुन कोणत्‍याही परिस्थितीत नैतिकता मार्ग सोडु नका. सामुदायिक प्रयत्‍नाने कोणतीही संस्‍था उभी राहते. शेतकरी व विद्यार्थ्‍यांकरिता समर्पित भावनेने कार्य करा. परभणी कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी ते कुलगुरू पदापर्यंतच्‍या प्रवासात अनेकांनी सहकार्य केले. कुलगुरू पदाच्‍या कार्यकाळात कृषी विद्यापीठ निर्मित बियाणे केवळ परभणी मुख्‍यालयी विक्री न करता, मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयात विकेंद्रित स्वरूपात विक्री व्‍यवस्‍था केली. विद्यापीठात मर्यादित मनुष्‍यबळ असुन सर्वांच्‍या प्रयत्‍नातुन बिजोत्‍पादनात वाढ झाली केली तसेच विद्यापीठ महसुलात वाढ झाली. गेल्‍या चार वर्षाच्‍या काळात स्‍वच्‍छ विद्यापीठ, हरित विद्यापीठ, सुरक्षित विद्यापीठ उपक्रम सर्वांच्‍या सामुदायिक प्रयत्‍नातुन यशस्‍वीपणे राबविली. याचा लाभ भविष्‍यातही होणार आहे.

नुतन कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठात मागील पन्‍नास वर्षात अनेक चांगले संशोधन कार्य झाले. विद्यापीठाचे संशोधन हे जागतिक दर्जेचे आणि समाजभिमुख असले पाहिजे. विद्यापीठाने शेतकरी व समाजाच्‍या अपेक्षा कितपत पुर्ण केल्‍या यांचे वेळोवेळी मुल्‍याकंन झाले पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

मा आमदार श्री सतिश चव्‍हाण म्‍हणाले की, डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठात समर्पित भावनेने कार्य केले. विद्यापीठासमोर असलेल्‍या अनेक अडचणीत खंबीरपणे निर्णय घेतले. विद्यापीठाचे हितास त्‍यांनी प्रथम प्राधान्‍य दिले.   

मा आमदार डॉ राहुल पाटील, डॉ अशोक ढवण हे आदर्शवत व शिस्‍तप्रिय व्‍यक्‍तीमत्‍व असुन संस्‍थेच्‍या हिता करिता एकनिष्‍ठेने कार्य केले. नवीन शैक्षणिक धोरताना बहुशाखीय शिक्षणास प्राधान्‍य असुन याचा विचार करून विद्यापीठात आंतरराष्‍ट्रीय दर्जेचे विज्ञान संकुल उभारण्‍याचे काम त्‍यांच्‍या प्रयत्‍न होत आहे.  

मा श्री निसार तांबोळी म्‍हणाले की, डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठात प्रदीर्घ अशी सेवा दिली. आजच्‍या तरूण पिढीपुढे एक शिस्‍तप्रिय व आदर्श व्‍यक्‍तीमत्‍व असुन अनेक अडचणीत गुणवत्‍ता टिकवुन ठेवण्‍याचा त्‍यांनी प्रयत्‍न केला.

कवि प्रा इंद्रजित भालेराव म्हणाले की, कुलगुरूपद हा काटेरी मुकुट असतो. अनेक विरोध सहन करून डॉ ढवण यांनी आपली कारकीर्द यशस्वी केली. ग्रामीण भागातुन शेतकरी कुटूंबातुन शिक्षण घेऊन विद्यापीठाचा विद्यार्थी ते कुलगुरू असा प्रवास निश्चितच इतरांना प्रेरणादायी आहे. त्‍यांनी आयुष्याची प्रेरणादायी कथा आत्मकथनातून लोकांसमोर मांडावी, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्‍यवरांच्‍या हस्‍ते माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांचा शाल श्रीफल देऊन सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला तसेच अनेक मान्‍यवरांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम यांनी केले. सुत्रसंचालक डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ प्रविण कापसे यांनी मानले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी श्री कांतराव देशमुख, श्री रविंद्र देशमुख, डॉ रामेश्‍वर नाईक, डॉ दिवाण आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Friday, May 6, 2022

वनामकृविचे प्रभारी कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले यांनी स्‍वीकारला पदभार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचा कार्यकाळ दिनांक ६ मे रोजी पुर्ण झाला. महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल तथा वनामकृविचे कुलपती मा श्री भगतसिंह कोश्‍यारी यांनी विद्यापीठाच्‍या कुलगुरूपदी औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रमोद गोंविदराव येवले यांची नियुक्‍ती केली आहे. मा डॉ प्रमोद येवले यांनी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या कडुन दिनांक ६ मे रोजी पदभार स्‍वीकारला. यावेळी विधान परिषद सदस्‍य तथा विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य मा आमदार श्री सतिश चव्‍हाण, परभणी विभानसभा सदस्‍य तथा विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य मा आमदार डॉ राहुल पाटील, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा श्री निस्‍सार तांबोळी, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, श्री रविंद्र देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवाचा विद्यापीठाच्‍या वतीने सत्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने महाराष्ट्र शासन कृषि विभाग पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवाचा सत्कार दिनांक ६ मे रोजी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांच्या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, नियंत्रक श्रीमती दीपाराणी देवतराज, प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे, डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. मिनाक्षी पाटील आदींची उपस्थिती होती.

परभणी जिल्‍हयातील पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी श्री. ओंकारनाथ शिंदे रा. सनपुरी (सन २०१७, कृषिभूषण पुरस्कार – सेंद्रीय शेती), श्री. बाबासाहेब रनेर, रा. बाभळगाव, ता. पाथरी (सन २०१८, कृषिभूषण पुरस्कार – सेंद्रीय शेती), श्रीमती मेघाताई देशमुख (सन २०१९, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार), रा. झरी, श्री. देवराव शिंदे (सन २०१९, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार), रा. मरसुल, ता. पुर्णा व श्री. प्रतापराव काळे (सन २०१९, उद्यान पंडित पुरस्कार) रा. धानोरा (काळे), ता. पुर्णा आदींचा कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन संन्मान करण्यात आला.

मार्गदर्शनात मा डॉ. अशोक ढवण म्हणाले की, पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवाचा आदर्श इतर शेतक­यांनी घेतला प‍ाहिजे. विद्यापीठ शास्त्रज्ञ सदैव शेतक­यांना मार्गदर्शनासाठी कार्यतत्पर राहण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. मनोगतात श्री. ओंकारनाथ शिंदे यांनी शेतक­यांनी शेतीशी एकनिष्ठ असणे आवश्यक असुन सेंद्रीय शेती करत असतांना सातत्य ठेवणे गरजेचे असल्‍याचे म्‍हणाले तर श्री. प्रतापराव काळे म्हणाले की, सेंद्रीय शेती प्रकल्पातर्फे आयोजित तीस दिवसीस राज्यस्तरीय सेंद्रीय प्रशिक्षण कार्यक्रमामुळे देशभरातील सेंद्रीय शेती पध्‍दतीची माहिती झाली. तसेच श्रीमती मेघाताई देशमुख म्हणाल्या की, विद्यापीठाचे जे तंत्रज्ञान आहे ते शेतक­यांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. प्रितम भुतडा यांनी केले तर आभार डॉ. मिनाक्षी पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक शिंदे, डॉ.सुनिल जावळे, अभिजित कदम, सतिश कटारे, भागवत वाघ, दशरथ गरुड, सचिन रनेर, विठ्ठल खटींग, दत्ता खटींग आदींनी परिश्रम घेतले.



Thursday, May 5, 2022

वनामकृविच्‍या प्रभारी कुलगुरूपदी मा डॉ प्रमोद येवले

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचा कार्यकाळ दिनांक ६ मे रोजी संपत आहे. महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल तथा वनामकृविचे कुलपती मा श्री भगतसिंह कोश्‍यारी यांनी विद्यापीठाच्‍या कुलगुरूपदी औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रमोद गोंविदराव येवले यांची नियुक्‍ती केली आहे. मा डॉ प्रमोद येवले यांच्‍याकडे ७ मे २०२२ पासुन पुढील आदेशापर्यंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या कुलगुरू पदाचा अतिरिक्‍त पदभार राहणार आहे. महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल यांनी ४ मे २०२२ रोजी काढलेल्‍या आदेशात म्‍हटले आहे की, महाराष्‍ट्र कृषी विद्यापीठे (कृ‍षी विद्यापीठ) अधिनियम, १९८३ च्‍या कलम १७ (४) अन्‍वये अधिकारांच्‍या वापर करताना, औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रमोद येवले यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्‍हणुन नियुक्‍ती केली आहे. 

Tuesday, May 3, 2022

देशातील कृषी विद्यापीठे स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण झाली पाहिजे...... मा डॉ आर सी अग्रवाल

वनामकृवितील नाहेप प्रकल्‍प अंतर्गत विविध स्‍मार्ट प्रयोगशाळेचे उदघाटन

आयआयटी खरगपुर आणि वनामकृवित सामंजस्‍य करार

नवीन शैक्षणिक धोरणानुसार कृषि शिक्षणात बदल होत असुन यामुळे संपुर्ण कृषि शिक्षण परिसंस्‍थेत आमुलाग्र बदल होत आहेत. दर्जेदार शिक्षणाकरिता देशातील कृषि विद्यापीठे अनेक विदेशीतील व देशातील नामांकीत संस्‍थेशी सामंजस्‍य करार करित आहेत, याचा लाभ विद्यार्थ्‍यांना होणार आहे. नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थीमधील शेती उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञान व कौशल्‍य वृध्‍दींगत होत आहेत. देशातील कृषि विद्यापीठ जागतिक दर्जेचे विद्यापीठे झाली पाहिजे. देशातील कृषी विद्यापीठे स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण झाली पाहिजे, असे प्रतिपादन नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक तथा आयसीएआरचे उपमहासंचालक मा डॉ आर सी अग्रवाल यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) च्‍या विविध स्‍मार्ट प्रयोगशाळेचे आणि उपक्रमाचे मा डॉ आर सी अग्रवाल यांच्‍या हस्ते दिनांक ३ मे रोजी उदघाटन करण्‍यात आले, याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, प्राचार्य डॉ उदय खोडके, पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ एस एस ओहल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ आर सी अग्रवाल पुढे म्‍हणाले की, ऑनलाईन शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन समाजातील शेवटच्‍या विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहचण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे. संपुर्ण देशात व्‍हर्च्‍युअल क्‍लासरूम व अॅग्रीदीक्षा वेब एज्‍युकेशन चॅनलमुळे कृषी शिक्षणाची गुणवत्‍ता वाढणार आहे. यामुळे देशातील व परदेशातील चांगल्‍या कृषी शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांची व्‍याख्‍याने देशभरातील कृषी पदवीधरांना एकाच प्‍लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.  देशातील अनेक कृषी विद्यापीठात मनुष्‍यबळाची कमतरता असुन व्‍हर्च्‍युअल क्‍लासरूम मुळे काही प्रमाणात यावर मात करणे शक्‍य आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त करून परभणी कृषि विद्यापीठातील नाहेप प्रकल्‍पातील राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध उपक्रमाचे कौतुक केले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, करोना रोगाच्‍या प्रादुर्भाव व लॉकडाऊन परिस्थितीत नाहेप प्रकल्‍पामुळे ऑनलाईन माध्‍यमातुन परभणी कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रसाराचे आणि अध्‍यापनाचे कार्य अविरत चालु राहीले. नाहेप अंतर्गत वॉशिग्‍टन स्‍टेट विद्यापीठ, आयआयटी खरगपुर, आयआयटी मुंबई आदी जगातील अग्रगण्‍य संस्‍थाशी सामजंस्‍य करार मुळे विद्यार्थी, प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ यांना जागतिक दर्जेचे शिक्षणाची संधी प्राप्‍त होणार आहे. 

याप्रसंगी नाहेप प्रकल्‍पा अंतर्गत विकसित केलेल्‍या व्‍हर्च्‍युअल क्‍लासरूम व अॅग्रीदीक्षा वेब एज्‍युकेशन चॅनल, स्‍वयंचलित हवामान माहिती यंत्रणा, स्‍मार्ट शेती यंत्र कार्यशाळा, स्‍मार्ट शेडनेट, अत्‍याधुनिक स्‍मार्ट पॉलीहाऊस, एआय अॅन्‍ड मेच्‍याट्रोनिक्‍स लॅब, स्‍वयंचलित अन्‍न प्रक्रिया प्रयोगशाळा, तणनाशक मोबाइल अॅप, ईएसपी मोबाईल अॅप, आंतरराष्‍ट्रीय नियतकालिका आदींचे उदघाटन मा डॉ आर सी अग्रवाल यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले. 

शिक्षण व संशोधनाकरिता आभासी माध्‍यमातुन आयआयटी खरगपुर यांच्‍याशी सामंजस्‍य करार करण्‍यात आला, यावेळी  आयआयटी खरगपुर चे संचालक डॉ व्‍ही के तिवारी, डॉ टि के भट्टाचार्य, डॉ राजेंद्र माचेवरम आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ व्‍ही के तिवारी म्‍हणाले की, तंत्रज्ञानाच्‍या जोरावर शेतीतील अनेक समस्‍या सुटू शकतात, सदर सामंजस्‍य करारामुळे विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधनास मदत होणार आहे.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ गोपाल शिंदे परभणी कृषि विद्यापीठात राबविण्‍यात येत असलेल्‍या नाहेप प्रकल्‍पातील विविध उपक्रमाची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ कैलास डाखोरे यांनी मानले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ भगवान आसेवार, डॉ राजेश कदम, डॉ कल्‍याण आपेट, डॉ हिराकांत काळपांडे, डॉ प्रविण वैदय, डॉ नेहारकर आदीसह विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ गोदावरी पवार, डॉ दयानंद टेकाळे, डॉ बी एस आगरकर, डॉ मेघा सुर्यवंशी, डॉ संतोष फुलारी, डॉ सुनिता पवार आदीसह नाहेप प्रकल्‍पातील संशोधक, अभियंता व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.