Tuesday, June 14, 2022

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत तिर्थक्षेत्र त्रिधारा येथे रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांची स्‍वच्‍छता मोहिम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजना वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दिनांक ७ जुन ते १३ जुन दरम्‍यान पर्यावरण जनजागृती व स्‍वच्‍छता सप्‍ताहा निमित्‍त विविध उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या अंतर्गत दिनांक १३ जुन रोजी तिर्थक्षेत्र त्रिधारा येथे रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांनी स्‍वच्‍छता मोहिम राबविली. यावेळी येथील मंदिर परिसर तसेच नदीचा परिसराची स्‍वच्‍छता केली. सदरिल कार्यक्रम प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे, कार्यक्रम अधिकारी डॉ मधुकर खळगे, डॉ अनुराधा लाड आदींच्‍या मार्गदर्शनाखाली राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या ७० स्‍वयंसेवक आणि स्‍वयंसेविकांनी राबविली.


आत्मनिर्भर भारतासाठी डिजिटल तंत्रज्ञानचा वापर कृषी क्षेत्रात आवश्यक ...... प्रा. वीरेंद्र तिवारी

वनामकृवितील पदव्‍युत्‍तर विद्यार्थी व शास्‍त्रज्ञांना देशातील नामांकित आयआयटी खरगपुर येथे डिजिटल तंत्रज्ञानावर प्रशिक्षण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्‍या विद्यमाने खरगपुर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था – आयआयटी येथे “पीक व्यवस्थापनासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर” यावरील दोन आठवडीय (दिनांक ६ ते १७ जुन) तसेच “कॅड-कॅम तंत्रज्ञानाचा कृषि यंत्र निर्मितीसाठी वापर” यावरील तीन आठवडीय (दिनांक ६ ते २५ जुन) प्रशिक्षणाचे  विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थी आणि शास्‍त्रज्ञ यांच्‍या करिता आयोजन करण्यात आले आहे. 

सदरिल प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक ६ जुन रोजी खरगपुर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयआयटीचे संचालक प्रा. वीरेंद्र तिवारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागाच्‍या विभाग प्रमुख प्रा. रिंतु बॅनर्जी या होत्या. तसेच नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. डॉ. राजेंद्र माचावरम, प्रकल्पाचे उपप्रमुख आवेश प्रा तरुण कांती भट्टाचार्य, प्रा महुआ भट्टाचार्य, प्रा पियुष सोनी, प्रा हिफाजूर रेहमान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात प्रा विरेंद्र तिवारी म्‍हणाले की, आत्‍मनिर्भर भारत बनविण्‍यासाठी कृषि क्षेत्र आत्‍मनिर्भर झाले पाहिजे. यासाठी कृषी यंत्रे, स्वयंचलित उपकरणे, प्रक्रिया तंत्रज्ञान यामध्ये संशोधन होणे गरजेचे आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने काटेकोर शेती तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. विविध इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाव्‍दारे शेतीकरिता उपयुक्‍त किफायतीशील स्‍मार्ट साहित्‍य न‍िर्मिती करावी लागणार आहे. विद्यार्थांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून संशोधनासाठी वापर करण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले.

प्रकल्पाचे उपप्रमुख अन्‍वेषक प्रा. तरुण कांती भट्टाचार्य यांनी नाहेप प्रकल्‍पात राबविण्‍यात येत असलेल्‍या सेन्सर्स, तंत्रज्ञान, आयओटी या विषयी संशोधनाची माहिती दिली.

प्रो. रिंतु बॅनर्जी यांनी कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागाची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात करण्‍याचा सल्‍ला दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र माचावरम यांनी प्रशिक्षणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया लक्ष्मी यांनी केले. सदरील प्रशिक्षणाचे आयोजन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), वनामकृवि, परभणी आणि  भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर यांच्‍यात झालेल्‍या सामंजस्य करारानुसार करण्यात आले असुन प्रशिक्षणासाठी एकूण ६५ पदव्युत्तर आणि आचार्य पदवी विद्यार्थी तसेच नाहेप प्रकल्पातील ६ अभियंते सहभागी झाले आहेत.

सदरील प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ. प्रमोद येवले, आयआयटीचे संचालक प्रा विरेंद्र तिवारी, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली नाहेप प्रमुख अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. राजेंद्र माचावरम, डॉ. एम. भट्टाचार्य, प्रो. ए.के. देब यांनी केले आहे. प्रशिक्षण समन्वयक म्हणून रवीकुमार काललोजी, डॉ अनिकेत वाईकर, शिवानंद शिवपुजे, श्वेता सोळंके, अपूर्वा देशमुख, संजीवनी कानवते, गोपाळ रनेर आदी काम पाहत आहेत.

Friday, June 10, 2022

वनामकृवित शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे तीन दिवशीय प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय अंतर्गत असलेले कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि नांदेड येथील वनश्री सामाजिक, सांस्कृतीक व ग्रामीण विकास संस्था यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ते १० जुन दरम्‍यान शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक १० जुन संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मुख्‍य कृषिविद्यावेत्‍ता डॉ. गजानन गडदे हे होते तर वनश्री संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश राठोड, चार्टेड अकाऊंटंट श्री. मितेश मालीवाल, डॉ.मधुमती कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

मार्गदर्शनात डॉ. गडदे म्हणाले की, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याच्‍या माध्‍यमातुन शेतकरी एकत्र येत असुन एकत्रित कृषि मालाची विक्री केल्‍यास शेतमाल विक्रीतुन अधिक नफा मिळण्‍यास मदत होत आहे. शेतक-यांच्या शेतीशी निगडीत समस्याचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठ सदैव तत्पर असल्‍याचे ते म्‍हणाले. तसेच वनश्री संस्थेच्या संचालिका श्रीमती नीता माळी यांनी विद्यापीठाच्‍या प्रशिक्षणातील मार्गदर्शनामुळे अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती मिळाल्‍याचे मत मनोगतात व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व श्री.मधुकर मांडगे यांनी केले तर आभार श्री. दिपरत्न सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानोबा माहोरे, दिगंबर रेंगे, नितीन मोहिते, शेख साजेद, शेख सुलताना शेख पाशा आदींनी विशेष परिश्रम घेतले.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून देणे व कंपनी सदस्‍य शेतक-यांचे ज्ञान वृद्धींगत करून त्यांचे उत्पन्न वाढविणे हा उद्देश ठेवुन सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले होते.

प्रशिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाने सोयाबीन, कापुस व हळद लागवड, विक्री आणि प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ निर्मीती, शेळीपालन, शेतीमधील संधी, आव्हाने व समस्या, मुल्यसाखळी विश्लेषण आणि विपणन, कृषि प्रणाली मध्ये स्टोरेज, पॅकेजींग, ब्रँण्डींग व लेबलींग आदी विषयांवर विद्यापीठातील तज्ञांनी मार्गदर्शन केले. 

Thursday, June 9, 2022

पिकांवरील शत्रुकिडींच्‍या नियंत्रणात मित्रकिडींची मोठी भुमिका ...... किटकशास्‍त्रज्ञ डॉ अनंत लाड

पर्यावरण जनजागृती व स्‍वच्‍छता सप्‍ताहानिमित्‍त मौजे इंदेवाडी येथे आयो‍जित कार्यक्रमात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजना आणि ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दिनांक ७ जुन ते १३ जुन दरम्‍यान पर्यावरण जनजागृती व स्‍वच्‍छता सप्‍ताहानिमित्‍त विविध उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. या अंतर्गत दिनांक ८ जुन रोजी मौजे इंदेवाडी येथे शेतीतील मित्रकीडी यावर किटकशास्‍त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांचे व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास सरपंच श्री मोहन कच्‍छवे, उपसरपंच श्री संदिप चंदेल, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ मधुकर खळगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ अनंत लाड म्‍हणाले की, विविध पिकांवरील शत्रुकिडींचे व्‍यवस्‍थापनात निसर्गातील विविध मित्रकिडींंची मोठी भुमिका असुन अनेक मित्रकिडींचे खाद्य हे शत्रुकिडी आहेत. परंतु अनेक वेळा शेतकरी बांधव मित्रकिडींना शत्रुकीड समजुन किटकनाशकांची फवारणी करतात. यामुळे किटकनाशक फवारणीचा खर्च तर वाढतोच परंतु निसर्गातील मित्रकीडींची मोठी हानी होऊन निसर्गाचा समतोल बिघडतो. त्‍यामुळे शेतकरी बांधवाना मित्रकिडींची माहिती आवश्‍यक असल्‍याचे सांगुन त्‍यांनी विविध मित्रकिडीं बाबत मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ मधुकर खळगे यांनी केले तर आभार कृषिदुत गणेश माळी यांनी मानले. कार्यक्रमास मौजे इंदेवाडी येथील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. सदरिल कार्यक्रम प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, रावे समन्‍वयक डॉ राजेश कदम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली राष्‍ट्रीय सेवा योजने स्‍वयंसेवक आणि रावेचे कृषिदुत यांनी राबविला.

Friday, May 27, 2022

नौकरी शोधनारे नव्‍हे तर नौकरी देणारे कृषी पदवीधर घडावीत..... प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल

कृषि महाविदयालय परभणी जिल्हयातील पंधरा गावात राबविणार ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमात कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना पदवीच्‍या पहिल्‍या तीन वर्षात प्राप्‍त केलेल्‍या ज्ञानाचा आणि कृषि तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवाच्‍या शेतात प्रत्‍यक्ष वापर करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रसार करावा. कृषी पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्या सत्रात कृषि संलग्‍न व्‍यवसाय आणि कृषि निगडित कंपन्‍याचा अभ्‍यास करण्‍याची विद्यार्थ्‍यांना संधी आहे, यामुळे विद्यार्थ्‍यांमध्‍ये कृषी उद्योजकतेची बीजे रोवली जातील. भविष्‍यात केवळ नौकरी शोधनारे नव्‍हे तर नौकरी देणारे कृषी पदवीधर घडले पाहिजेत, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या कृषि पदवीच्‍या  सातव्‍या सत्रात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) आणि कृषी औद्यागिक संलग्‍नता उपक्रम रा‍बविण्‍यात येतो. या उपक्रमात कार्यरत विद्यार्थ्‍यांना कृषिदुत व कृषिकन्‍या असे संबोधले जाते. या कृषिदुत व कृषिकन्‍यांकरिता दिनांक २६ मे रोजी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर रावे समन्‍वयक विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ आर जी भाग्‍यवंत, विभाग प्रमुख डॉ संजीव बटेवाड, विभाग प्रमुख डॉ डिगांबर पेरके, सोयाबीन पैदासकार डॉ शिवाजी मेहत्रे, ज्‍वार पैदासकार डॉ के आर कांबळे, मध्‍यवर्ती रोपवाटीका प्रभारी डॉ संतोष बरकुले, शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल पुढे म्‍हणाले की, अनेक प्रगतशील शेतकरी नाविन्‍यपुर्ण शेती करतात, त्‍यांच्‍या कडुन अनेक बाबी शिकण्‍याची संधी कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना आहे. शेतीतील शेतकरी बांधवाच्‍या समस्‍या जवळुन अनुभवयास मिळणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

प्रास्‍ताविकात डॉ राजेश कदम म्‍हणाले की, पुढील चार महिने महाविद्यालयातील २३० विद्यार्थी पंधरा गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्‍यक्षिके दत्तक गावात घेणार असुन एक महिना विविध कृषि निगडित कंपन्‍यामध्‍ये काम करण्‍याची संधी मिळणार असल्‍याचे सांगुन रावे कार्यक्रमाबाबत सविस्‍तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात डॉ आर जी भाग्‍यवंत, डॉ दिगांबर पेरके, डॉ संजीव बटेवाड, डॉ के आर कांबळे, डॉ शिवाजी मेहत्रे, डॉ संतोष बरकुले, डॉ रणजित चव्‍हाण आदींनी मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात विविध विषयावर डॉ पी आर नेहरकर, इंजि. बी पी सावंत, ्‍ही बी न  डज्ञॅ जी भांग्‍यवंत डॉ विशाल अवसरमल, डॉ डि व्‍ही बैनवाड, डॉ महेश दडके, डॉ आर व्‍ही भालेराव, डॉ एस एल वाईकर, डॉ वानखेडे आदींनी मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रविण कापसे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ एस आर जक्‍कावाड, डॉ विक्रम घोळवे, डॉ अंबिका मोरे, डॉ स‍ुनिता पवार, डॉ अनंत लाड, डॉ आयएबी मिर्चा, डॉ एम एम सोनकांबळे, डॉ एस व्‍ही चिक्षे, डॉ जी एन गोठे, डॉ गोदावरी पवार, प्रा आर सी सावंत आदींनी कार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सातव्‍या सत्राचे विद्यार्थी कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Wednesday, May 18, 2022

शेती व शेतकरी यांना समाजात आदराचे स्‍थान मिळाले पाहिजे .... कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी

वनामकृवित आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन

मेळाव्‍यात शासन पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी बांधवाचा विद्यापीठाच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला 

मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी 
अध्‍यक्षीय भाषण करतांना कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले

देश कृषि तंत्रज्ञानाच्‍या आधारे शेतकरी बांधवाच्‍या परिश्रमातुन अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला. देशाने अन्‍नधान्‍य उत्‍पादनात उच्‍चांक गाठला. परंतु शेतकरी बांधवाच्‍या उत्‍पन्‍नात पाहिजे तशी वाढ झाली नाही. शेतक-यांपेक्षा शेतमालाचा व्‍यापारी मोठे होत आहेत, शेतकरी कुटुबांतीलच एखादी तरी व्‍यक्‍ती शेतमाल व्‍यापारी झाली पाहिजे. आज युवा पिढी शेती व्‍यवसायाकडे येत नाही. शेती करणा-या युवकांना समाजात मानाचे स्‍थान दिले जात नाही. शेती व शेतकरी यांना समाजात आदराचे स्‍थान मिळाले पाहिजे. समाजाची मानसिकता बदलण्‍याची गरज असल्‍याचे  प्रतिपादन इम्‍फाळ येथील केंद्रीय कृषि विद्यापीठ तसेच राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी जयंती निमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. प्रमोद येवले होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्रगतशील शेतकरी रेणवसिध्‍द लामतुरे, मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माजी कुलगुरू डॉ सुभाष पुरी पुढे म्‍हणाले की, आज देशातील गोदामे अन्‍नधान्‍याने भरली असल्‍याने देशात शांती आहे. अन्‍यथा श्रीलंके सारखी स्थिती झाली असती. श्रीलंकेत कोणताही विचार न करता रासायनिक खत व औषधावर बंदी करून सेंद्रीय शेती करण्‍याचे बंधन शेतक-यांवर लादले, तेथे अन्‍नधान्‍याची मोठी कमतरता नि‍र्माण झाली. सेंद्रीय शेतीचे धोरण अभ्‍यासपुर्णपणे राबविण्‍याची गरज आहे. शेती निविष्‍ठाच्‍या दरात मोठी वाढ होत असुन उत्‍पादन खर्च वाढत आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम शेतीवर होत आहे, यावर संशोधनाच्‍या आधारे मार्ग काढावे लागतील.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. प्रमोद येवले म्‍हणाले की, कृषि तंत्रज्ञानाने देशात हरित क्रांती व धवल क्रांती झाली. परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांचे अनेक वाण विकसित केले असुन अनेक तंत्रज्ञान शिफारसी शेतक-यांना दिला आहेत. मागील पन्‍नास वर्षात मराठवाडयातील कृषी विकासात विद्यापीठाााचे भरीव असे योगदान आहे. विद्यापीठावर शेतकरी बांधवांचा मोठा विश्‍वास आहे. विद्यापीठातील पन्‍नास टक्क्यांपेक्षा जास्‍त प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांची पदे रिक्‍त असुन दर्जेदार कृषि शिक्षण व संशोधना करिता विद्यापीठातील ही पदे भरणे गरजेचे आहे. करोना रोगाच्‍या प्रादुर्भाव व लॉकडाऊन परिस्थितीतही शेती व शेतकरी थांबला नाही, कोठेही शेतमालाचा तुटवडा जाणवला नाही की शेतमालाची भाव वाढ झाली नाही. शेतकरीही करोना योध्‍दा प्रमाणे अविरत काम करत होता, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

मनोगतात प्रगतशील शेतकरी अभिमान आवचर म्‍हणाले की, शेतकरी बांधवाचा कृषी विद्यापीठावर मोठा विश्‍वास असुन शेतीतील शाश्‍वत उत्‍पादन वाढीचे तंत्रज्ञान विद्यापीठानेच  शेतक-यांना दिले आहे.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ देवराव देवसरकर म्‍हणाले की, विद्यापीठ विकसित अनेक वाण शेतक-यांमध्‍ये प्रचलित असुन मराठवाडयात सोयाबीन व तुर पिकांच्‍या वाणाची मोठी लागवड केली जाते. बदलत्‍या हवामानात आंतरपिक पध्‍दती, एकात्मिक किड - रोग व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमात शासन पुरस्‍कार प्राप्‍त शेतीनिष्‍ठ शेतकरी बांधवाचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते शाल, श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला. मेळाव्‍यात आयोजित खरीप पिक परिसंवादात विविध विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनास मोठा प्रतिसाद दिला. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सुनिता पवार, डॉ प्रितम भुतडा, डॉ अरूण गुट्टे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव, महिला शेतकरी, कृषी विस्‍तारक, विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

मेळाव्‍यात पुढील शासन पुरस्‍कार प्राप्‍त शेतीनिष्‍ठ शेतकरी बांधवाचा सत्‍कार करण्‍यात आला.

रावसाहेब ढगे (शिरसवाडी ता जि जालना), दत्‍तात्रय जाधव (उदंडवडगाव पो. मोरगाव ता जि बीड), नानासाहेब गायके (मु सुलातनाबाद ता गंगापुर जि औरंगाबाद), तात्‍यासाहेब गोरे (मुपो आंरगाव ता भुम जि उस्‍मानाबाद), सिकंदर जाधव (मु. जळगाव फेरण चिकलठाणा ताजि औरंगाबाद), सतिश खडके (मुपो वाघोली वरूड ता जि उस्‍मानाबाद), श्रीमती मेघाताई देशमुख (झरी), दिनकर पाटील (लातुर रोड), बालचंद्र घुनावत (मु पो लाखेगाव, पैठण), मल्लिकार्जुन सोनावणे (मु झरेगाव, ता जि उस्‍मानाबाद), अभिमान आवचर (वडवाडी, बोरखेड, बीड), प्रल्‍हाद गवारे (चिंचवडगाव वडवणी, बीड), पंजाबराव हारे (जवळगाव, अंबाजोगाई बीड), ओमकार मसकल्‍ले (महादेववाडी, देवणी, लातुर), मुरलीधर नागटिळक (मुरूड, लातुर), निवृत्‍ती दिडोरे (औरंगपुर, औरंगाबाद), सुचिता सिगारे (खेडगांव अंबड), चौरंगनाथ वाघमोडे (शिराळा, परंड), नागनाथ पाटील (लिंबाळवाडी नळगांव, चाकुर), आण्‍णसाहेब जगताप (सावरगांव, माजलगांव), अंबादास बनसोड (धावडा आमठाणा, औरंगाबाद), दत्‍तात्रय कदम (दहामदरी अर्धापुर), देवराव शिंदे (मुरसुल पुर्णा), राजेश इंगळे (माटेगाव कसाबखेडा, कन्‍नड), प्रभावती लामतुरे (तेर, उस्‍मानाबाद), सुदाम शिरवत (मुलानी वाडगाव पैठण), धोडीराम सुपारे (टाकळगाव देवगाव हदगांव), अभयकुमार काळुंके (रायपुर परतुर), प्रताप काळे (धानोरा काळे, पुर्णा), कृषी सहाय्यक वसंत कातबने आदींचा सत्‍कार करण्‍यात आला.

मेळाव्‍याचे उदघाटन करतांना मान्‍यवर
कृषी प्रदर्शनाचे उदघाटन करतांना मान्‍यवर

जैविक रोग व्‍यवस्‍थापन घडीपत्रिकेचे विमोचन करतांना

Saturday, May 14, 2022

वनामकृवित खरीप शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ५० व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक १८ मे बुधवार रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालया जवळील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचे उदघाटन इम्‍फाळ येथील केंद्रीय कृषि विद्यापीठ तथा राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी यांच्‍या हस्‍ते होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. प्रमोद येवले हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन पुणे येथील अटारीचे संचालक मा डॉ लाखन सिंग आणि महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ. राजाराम देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास राज्‍यसभा सदस्‍या मा. खासदार श्रीमती फौजिया खान, परभणी लोकसभा सदस्‍य मा. खासदार श्री संजय ऊर्फ बंडु जाधव, विधान परिषद सदस्‍य मा आमदार श्री सतीश चव्‍हाण, विधान परिषद सदस्‍य मा आमदार श्री विक्रम काळे, विधान परिषद सदस्‍य मा आमदार श्री विप्‍लव बाजोरिया, विधान परिषद सदस्‍य मा आमदार श्री. बाबाजानी दुर्राणी, विधानसभा सदस्‍य मा आमदार डॉ राहुल पाटील, पाथरी विधानसभा सदस्‍य मा आमदार श्री सुरेश वरपुडकर, जिंतुर विधानसभा सदस्‍या मा आमदार श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, गंगाखेड विधानसभा सदस्‍य मा आमदार डॉ रत्‍नाकर गुट्टे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

मेळाव्‍यात आयोजित खरीप पिक परिसंवादात कापुस लागवड, सोयाबीन लागवड, कडधान्‍य लागवड, कीड व्यवस्‍थापन, हवामान आधारीत शेती सल्‍ला आदी विषयांवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन शेतक-यांच्‍या कृषि विषयक प्रश्‍न व शंकाचे शास्‍त्रज्ञ निरासरनही करणार आहेत. याप्रसंगी कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले असुन विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारी दालनासह शेती निविष्‍ठांचे खासगी कंपन्‍या व बचत गटाच्‍या दालनाचा समावेश राहणार आहे. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटनही होणार आहे. सदरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री विजय लोखंडे,  मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींनी केले आहे.