Thursday, May 12, 2016

अवर्षण परिस्थितीमुळे यंदा विद्यापीठाचे बियाणे विक्रीस उपलब्‍ध नाही

शेतक-यांनी सोयाबीन, मुग, उडिद आदी खरिप पिकांतील सरळवाणांचे स्‍वत:कडील बियाणे वापरण्‍याचे विद्यापीठाचे आवाहन

शेतक-यांना बियाणे पुरवण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत प्रक्षेत्रावर मागील खरीप हंगामात मोठया प्रमाणावर सोयाबीन, मुग, उडीद आदी खरीप पिकांचे बिजोत्‍पादन कार्यक्रम घेण्‍यात आला होता, परंतु अवर्षण परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांच्‍या उत्‍पादनात लक्षणीय घट येऊन बिजोत्‍पादनाचे उदिदष्‍ट साध्‍य करता येऊ शकले नाही. कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील लातुर, उस्‍मानाबाद, बीड, परभणी, हिगोंली, नांदेड, औरंगाबाद व जालना जिल्‍हयातील संशोधन केंद्राच्‍या प्रक्षेत्रावर पेरणी केल्यानंतर अवर्षण परिस्थितीमुळे ३० ते ४० टक्केच बीजोत्‍पादन झाले. येत्‍या हंगामासाठी कृषि विद्यापीठातर्फे सोयाबीन, मुग, उडिद आदी बियाणांची कमतरता असल्‍यामुळे बियाणे विक्रीस उपलब्‍ध होणार नाही. खरिप पिकांतील तुरीचे बीडीएन-७११, बीएसएमआर ७३६, खरिप ज्‍वारीचे पीव्‍हीके ८०१ व बाजरीचे एबीपीसी ४-३ या वाणाचे मर्यादित बियाणे विक्रीस उपलब्‍ध आहे. शेतक-यांनी सोयाबीन, मुग, उडिद आदी खरिप पिकांतील सरळवाणांचे स्‍वत:कडील बियाणे उगवण क्षमता तपासुन वापरावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्‍यात आले आहे.

वनामकृवित खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनाचा लाभ घेण्‍याचे विद्यापीठातर्फे आवाहन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४४ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचे कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन ‍नविन पदव्‍युत्‍तर वसतीगृह मैदान येथे दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता करण्‍यात आले असुन मेळाव्‍याचे उद्घाटन नवी दिल्‍ली येथील कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे अध्‍यक्ष मा. डॉ. गुरबचन सिंह यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे राहणार असुन परभणी लोकसभा संसद सदस्‍य मा. श्री. संजय जाधव, विधानपरिषद सदस्‍य मा. श्री. सतीश चव्‍हाण, विधानपरिषद सदस्‍य मा. श्री. विक्रम काळे, विधानपरिषद सदस्‍य मा. श्री अब्‍दुला खान दुर्राणी (बाबाजानी), विधानपरिषद सदस्‍य मा. श्री. रामराव वडकुते, परभणी विधानसभा सदस्‍य मा. डॉ. राहुल पाटील, जिंतुर विधानसभा सदस्‍य मा. श्री. विजय भांबळे, गंगाखेड विधानसभा सदस्‍य मा. डॉ. मधुसूदन केंद्रे, पाथरी विधानसभा सदस्‍य मा. श्री. मोहन फड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या निमित्‍त खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले असुन सदरील मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, जिल्‍हा अधिक्षक कृषि‍ अधिकारी डॉ. एस. के. दिवेकर व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख यांनी केले आहे. खरीप पीक परिसंवादात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ कापुस, सोयाबीन, तुर, हळद आदी पीक लागवड तंत्रज्ञान तसेच हुमणी किडीचे व्‍यवस्‍थापन, विहीर व कुपनलिका पुर्नभरण, शेळीमेंढी पालन, कोरडवाहु शेती व्‍यवस्‍थापन आदी विषयावर मार्गदर्शन करणार असुन शेतक-यांच्‍या शेतीशी निगडीत विविध शंकांचे समाधान करणार आहेत. कृषि प्रदर्शनीत विद्यापीठातील विविध संशोधन केंद्राच्‍या दालनासह बियाणे, किडनाशके, शेती अवचारे आदी खाजगी कंपनाच्‍या दालनाचाही समावेश राहणार आहे.

Wednesday, May 4, 2016

दुष्काळस्थितीतही योग्य नियोजन व व्यवस्थापनाच्या आधारे वनामकृवि उत्पादित बहुवार्षीक चारापिकाचे प्रक्षेत्र पशुपालक शेतक-यांना मार्गदर्शक

वनामकृवि उत्पादित बहुवार्षीक चारापिकाच्या विविध जातीचे ठोंबे शेतक-यांसाठी उपलब्ध
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या संकरित गो-पैदास प्रकल्‍पात चारापिके प्रक्षेत्र विकसीत करण्‍यात आले असुन फुले जयवंत, फुले यशवंत, बीएसएच-१०, कोईम्‍बतुर-४, पैरागवत, धारवाड-६ आदी बहुवार्षीक चारापिकांचे दहा एकर प्रक्षेत्रावर लागवड करण्‍यात आली आहे. यामुळे विद्यापीठांतर्गत पशुधनास दुष्‍काळसदृष्‍य परिस्थितीत देखिल वाळलेला चा-यासोबत हिरवाचारा सुध्‍दा मुबलक प्रमाणात उपलब्‍ध झाला आहे. दुष्‍काळस्थितीतही योग्‍य नियोजन व व्‍यवस्‍थापनाच्‍या आधारे विकसित केलेले प्रक्षेत्र पशुपालक शेतक-यांना मार्गदर्शक ठरत असुन शेतक-यांना या बहुवार्षीक चारापिकांचे विविध वाणांची ठोंबे एक रूपया प्रतिनगाने उपलब्‍ध असुन लागवडीसाठी विशेषत: खरिप हंगामासाठी चारापिक ठोंबाचा लाभ शेतक-यांनी घ्‍यावा, असे आवाहन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले आहे. सदरिल प्रक्षेत्रास कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी दिनांक १ मे रोजीच्‍या भेटी दरम्‍यान चारापिकांविषयी शेतक-यांना मार्गदर्शन करून चारापिके ठोंबे मोठया प्रमाणात शेतक-यांना पुरवठा करण्‍यासंदर्भात संबधित वि़द्यापीठ अधिका-यांना सुचना दिल्‍या. सदरिल प्रक्षेत्रास परिवहन मंत्री तथा परभणी जिल्‍हयाचे पालकमंत्री मा. श्री. दिवाकररावजी रावते, खासदार मा. श्री. संजय जाधव, आमदार मा. डॉ. राहुल पाटील, जिल्‍हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महिवाल आदींनी भेट देऊन सदरिल कार्याबाबत विद्यापीठाचे अभिनंदन केले. सदरिल प्रकल्‍प संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. दिनेश सिंह चौहान व त्‍यांचे सहकारी राबवित आहेत.

Tuesday, May 3, 2016

हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतक-यांना सामुदायिकरित्या प्रयत्न करावे लागतील..... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृविच्‍या हुमणी व्‍यवस्‍थापन जनजागृती मोहिम व फळबाग वाचवा अभियानास प्रारंभ
उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

गत दोन-तीन वर्षापासुन हुमणी किडीचा प्रादुर्भाव मराठवाडा व विदर्भ विभागात मोठया प्रमाणावर झाला असुन या किडीचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या दृष्‍टीने मे व जुन हे दोन महिने अत्‍यंत महत्‍वाचे आहेत. सदरिल किडीचे नियंत्रणाचे उपाय हे वैयक्तिकरित्‍या शेतक-यांनी केल्‍यास प्रभावी ठरणार नसुन शेतक-यांना सामुदायिकरित्‍या प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी केले.
  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व रिलायन्‍स फाऊंडेशन यांचे संयुक्‍त विदयमाने परभणी जिल्‍हयात दिनांक २ ते २७ मे दरम्‍यान हुमणी व्‍यवस्‍थापन जनजागृती मोहिम व फळबाग वाचवा अभियानाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक २ मे रोजी अभियानाच्‍या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री. कांताराव झरीकर, श्री. सोपानराव अवचार, श्री. प्रतापराव काळे, श्री. विठ्ठलराव जवंजाळ, श्री. पी. जी. शिंदे, श्री. रोहिदास जाधव, श्री. माऊली पारधे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू पुढे म्‍हणाले की, किडीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी योग्‍य माहिती विविध माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत त्‍वरित पोहोचविणे गरजेचे असुन किडीचा संपुर्ण जीवनक्रमाबाबतची माहिती शेतक-यांना द्यावी लागेल. 
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, हुमणी किडीबाबत मराठवाडयातील अनेक शेतकरी अनभिज्ञ असुन ही किड एकदम संपुर्णपणे नियंत्रणात येऊ शकत नाही. हुमणी किड व्‍यवस्‍थापन करतांना मशागतीय पध्‍दतीसह जैविक व रासायनिक पध्‍दतीचा एकात्मिकरित्‍या अवलंब शेतक-यांना करावा लागेल. तसेच दुष्‍काळ परिस्थितही फळबागा वाचविण्‍यासाठी कमी खर्चाच्‍या तंत्रज्ञानाचा प्रसार सदरिल अभियानांतर्गत करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
कार्यक्रमाची प्र‍स्‍तावना कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. यु. एन. आळसे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी व विदयापीठातील विविध महाविदयालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जनजागृती अभियानाची सुरूवात प्रगतशील शेतक-यांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखुन करण्‍यात आली. सदरिल अभियान विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्‍हयात दिनांक २ ते २७ मे दरम्‍यान तर हिंगोली जिल्‍हयात दिनांक १ जुन ते १५ जुन २०१६ दरम्‍यान राबविण्‍यात येणार आहे.

अभियानाची सुरूवात प्रगतशील शेतक-यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आली

परभणी कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला मशरूम कार्निव्‍हल

अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्‍यांनी बनविले विविध आळंबीचे खाद्यपदार्थ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयातील आठव्‍या सत्रातील विद्यार्थ्‍यांनी अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक १ मे रोजी मशरूम कार्निवलचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ. डि. बी. देवसरकर, विभाग प्रमुख डॉ. डि. एन. धुतराज आदिंची प्रमुख उपस्थिती होती. 
   अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमांमुळे विद्या‍र्थ्‍यांमध्‍ये आत्‍मविश्‍वास वाढीस लागत आहे. आळंबी बाबत समाजात अनेक गैरसमज असुन मधुमेह असणा-यासाठी मशरूम हे कमी कॅलरी असलेले चांगला आहार असुन विद्यार्थ्‍यांनी याबाबत समाजात जनजागृती करावी. 
   यावेळी विद्यार्थ्‍यांनी मशरूम पासुन बनविलेले विविध पदार्थ जसे लोणचे, केचप, भजे, मशरूम बिर्याणी आदी तयार केले होते. मशरूमवर आधारित घडीपत्रिका, पोस्‍टर, रंगोली आदीचे सादरीकरण करण्‍यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्‍यी कल्‍पना राठोड व आकाश यांनी अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमाबाबत आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ. के. पी. आपेट यांनी विद्यार्थ्‍यांनी राबविलेल्‍या आळंबी उत्‍पादन कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थ्‍यी विजय घाटोळ व अनुराधा बुचाले यांनी केले तर आभार प्रदर्शन अत्‍युल्‍या नायर हिने केले. 
  कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ के टी आपेट यांच्‍या मार्गदर्शनाखाली अविनाश दहातोंडे, प्रशांत गिते, अरूणकुमार कठाळे, सुरेश चौरे, रत्‍नप्रकाश लोखंडे, सुमित तुमोड, सुभाष इरतकर, ज्ञानेश्‍वर सुरसेटवाड, जगन्‍नाथ निकम, नेहा गरूड, अश्विनी जगताप, जयश्री अंभोरे, जॉन के पी, योगेंद्र बनसोड, भारत खेलबाडे, मुकेश मिना, गोरख देवरे, श्रीलक्ष्‍मी, माधव पवार, अजित गावडे, गजानन शिंदे, बालाजी बोयेवार, प्रमोद पुंडगे, यशवंत देवरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Monday, May 2, 2016

आदिवासी शेतकरी आधुनिक कृषी तंत्रज्ञानापासुन वंचित राहु नये....... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

अखिल भारतीय समन्वित पाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पामार्फत आदिवासी उपयोजनेंतर्गत तेरा आदिवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अखिल भारतीय समन्वित पाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पामार्फत आदिवासी उपयोजनेंतर्गत हिंगोली तालुक्‍यातील मौजे आमदरी व करवाडी येथील निवडक तेरा आदिवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप दिनांक १ मे रोजी महा‍राष्‍ट्र दिनी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. ए. एस. कडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षयीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाडयातील दुष्‍काळ परिस्थिती पाहता शेतीसाठी पाणीचे नियोजन करतांना ठिबक व तुषार सिंचन या आधुनिक सिंचन पध्‍दती अवलंबाशिवाय गत्‍यांतर नाही. आदिवासी शेतकरीही या आधुनिक तंत्रज्ञानापासुन वं‍चीत राहु नये म्‍हणुन विद्यापीठ निवडक आदिवासी बहुल गावांत कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करित आहे. आदिवासी शेतक-यांनीही विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या संपर्कात राहुन आधुनिक कृषि तंत्रज्ञान अवगत करावे, असे आवाहन त्‍यांनी केले. सदरिल प्रकल्‍पामुळे आदिवासी शेतक-यांशी विद्यापीठाची नाळ जोडली गेली असल्‍याचे संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी आपल्‍या भाषणात सांगितले. 
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. ए. एस. कडाळे यांनी प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. जी. डि. गडदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. यु. एन. क-हाड यांनी केले. कार्यक्रमास मौजे आमदरी व करवाडी गावातील आदिवासी शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी एन. के. गिराम, पी. एस. सावंत, डि. आर. कुरा, संजय देशमुख, रत्‍नाकर पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात प्रकल्‍पातील पहारेकरी अच्‍युतराव पौळ हे सेवानिवृत्‍त झाले असुन कामगार दिनानिमित्‍त कुलगुरूंच्‍या हस्‍ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

Sunday, May 1, 2016

वनामकृवित महाराष्ट्र दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक १ मे रोजी महाराष्‍ट्र दिन साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य क्रिडा प्रांगणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. याप्रसंगी महाराष्‍ट्र दिन व कामगार दिनाच्‍या कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी शुभेच्‍छा दिल्‍या. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव श्री. दिलीपराव कच्‍छवे, विद्यापीठ नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.