Sunday, September 27, 2026

वनामकृविच्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत कांचनवाडीच्या कृषि महाविद्यालयाचा विजयी ठसा

 कृषि महाविद्यालय, लातूर उपविजेते; १८ संघांचा उत्स्फूर्त सहभाग


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था (CSMSS) संचलित कृषि महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा (मुले) २०२६-२७ मध्ये कांचनवाडी येथील कृषि महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले, तर कृषि महाविद्यालय, लातूर संघाने उपविजेतेपद मिळविले.

शनिवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कांचनवाडी कृषि महाविद्यालयाच्या हरिभाऊ मुळे सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, बदनापूर कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, लिहाखेडी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सूर्यकांत पवार, कृषि महाविद्यालय, कांचनवाडीचे प्राचार्य डॉ. मोहन पाटील, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. एस. जी. देशमुख, विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे, कृषि महाविद्यालय, कांचनवाडीचे जिमखाना प्रमुख प्रा. आर. आर. राठोड यांच्यासह विद्यापीठ व महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या स्पर्धेत विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांमधून एकूण १८ संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्त, संयम आणि क्रीडाभावनेचे दर्शन घडविले. विविध सामन्यांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.

अंतिम सामन्यात CSMSS कृषि महाविद्यालय, कांचनवाडी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. कृषि महाविद्यालय, लातूर संघाने उपविजेतेपद मिळविले. विजेता व उपविजेता संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक, पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सकारात्मक स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते. विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्तम संधी आणि पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यावर विद्यापीठाचा भर आहे.

विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये क्रीडांचे महत्त्व विशद केले. प्राचार्य डॉ. मोहन पाटील यांनी प्रास्ताविक करून स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल कांचनवाडी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा विभाग, आयोजन समिती, पंच आणि कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच विजेता कांचनवाडी संघ, उपविजेता लातूर संघ आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांतील खेळाडूंचे मान्यवरांनी कौतुक करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.