‘कापूस उत्पादकता अभियान–कपास क्रांती २०२६-२७’ अंतर्गत बोरगाव येथील प्रात्यक्षिकास माननीय कुलगुरूंची भेट
शेतकरी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी जगला तरच आपण सर्वजण
जगू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी सन्मान व आदर मिळाला पाहिजे. प्रशासन
आणि कृषी शास्त्रज्ञांनी ‘शेतकरी देवो भव:’ आणि ‘शेतकरी प्रथम’ या भावनेने काम
करून त्यांच्या अडचणींच्या निराकरणासाठी शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील बोरगाव येथे सेवा संकल्प अभियान आणि ‘कापूस
उत्पादकता अभियान–कपास क्रांती २०२६-२७’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या सघन कापूस
लागवड प्रात्यक्षिकास दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी कुलगुरूंनी भेट देऊन कापूस
पिकाची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
या प्रात्यक्षिकामध्ये ३ x १ फूट अंतरावर कापसाची सघन लागवड करण्यात आली असून,
कमी वाढणाऱ्या वाणाचा वापर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत प्रत्येक
झाडावर सुमारे १५ ते २० बोंडे लागलेली असल्याचे निदर्शनास आले. या
प्रात्यक्षिकातील पिकाची स्थिती पाहून माननीय कुलगुरूंनी समाधान व्यक्त केले.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि पुढे म्हणाले, कापूस उत्पादक
शेतकऱ्यांनी आता पारंपरिक लागवड पद्धतीऐवजी सघन व अतिसघन लागवड पद्धतीचा अवलंब
करावा. सघन लागवडीमुळे एकक क्षेत्रातील रोपांची संख्या वाढते आणि योग्य व्यवस्थापन
केल्यास उत्पादकता वाढविण्यास मदत होते. यासाठी सघन लागवड पद्धतीचे शास्त्रीय
व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी सघन कापूस लागवडीची शास्त्रोक्त व
प्रमाणित कार्यपद्धती यावेळी समजावून सांगितली.
यावेळी शेतकरी श्री. रघुनाथ जाधव यांनी सघन लागवडीमुळे एकरी झाडांची संख्या
वाढत असून, त्याचा उत्पादकतेवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
चालू हंगामात सघन लागवडीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामात ‘तंत्रज्ञान दूत’ म्हणून पुढे आणल्यास या तंत्रज्ञानाचा प्रसार अधिक वेगाने
होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
अस्थिर हवामानाच्या परिस्थितीत पीक पद्धतीत बदल करून आंतरपीक पद्धतीचा
अवलंब करणे ही काळाची गरज आहे, असे माननीय कुलगुरूंनी सांगितले. आंतरपीक पद्धतीमुळे एका
पिकावरील अवलंबित्व कमी होऊन उत्पन्नाचे स्रोत विविध होण्यास तसेच शेतीतील आर्थिक
जोखीम कमी करण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न व जीवनमान उंचावण्यासाठी शेतीला
पूरक पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन
आदी जोडधंद्यांचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उत्पादन खर्च कमी करण्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशकांचा शास्त्रीय व
गरजेनुसार कमीत कमी वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. उपलब्ध संसाधनांचा
कार्यक्षम वापर, योग्य पीक व्यवस्थापन आणि शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब यामुळे कापूस
उत्पादन अधिक फायदेशीर करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बोरगाव येथील ‘कृषिधन शेतकरी गट’ या गटातील शेतकरी श्रीमती शकुंतला रघुनाथ जाधव यांनी
केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या
सहकार्याने तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्र,
नांदेड येथील शास्त्रज्ञांच्या संयुक्त समन्वयातून शेतकऱ्यांच्या
शेतावर राबविण्यात येत असलेल्या प्रात्यक्षिकांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी कापूस संशोधन केंद्र, नांदेडचे प्रमुख श्री. विजय चिंचाणे,
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ.
बस्वराज भेदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सघन कापूस लागवड व पीक व्यवस्थापनाबाबत
मार्गदर्शन केले. सघन लागवडीमध्ये पिकाची अतिरिक्त वाढ नियंत्रित करण्यासाठी वाढरोधकांचा
शास्त्रीय वापर तसेच आवश्यकतेनुसार वाढीच्या फांद्या व शेंडा खुडण्याचे व्यवस्थापन
करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या आधुनिक
लागवड पद्धतींचा शास्त्रीय पद्धतीने अवलंब करावा, असे
आवाहनही त्यांनी केले.
कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी श्री. सुनील सूर्यवंशी यांनी माननीय कुलगुरूंना
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. किनवटचे
उपविभागीय कृषी अधिकारी श्री. दिलीप जाधव यांनी सध्याच्या प्रतिकूल हवामान
परिस्थितीतही सघन लागवडीतील कापूस पीक चांगल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. ‘कापूस
उत्पादकता अभियान’मुळे नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक
तंत्रज्ञानाचा लाभ होऊन उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मातुळचे मंडळ कृषी अधिकारी श्री. जयपाल पाईकराव, भोकरचे मंडळ कृषी अधिकारी श्री. अविनाश टोम्पे, उपकृषी अधिकारी श्री. सतीश कराळे, श्री. रवी तांडे, बोरगावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री. चंद्रशेखर इरलेवाड, श्री. शंतनू सीतावर, श्री. जयंत जाधव, श्री. अतुल कंचटवाड यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.jpeg)
.jpeg)
.jpeg)


