Saturday, June 25, 2022

अधिक उत्पादनासाठी सोयाबीनची लागवड बीबीएफ पद्धतीने करावी ....... विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. गजानन गडदे

मासिक चर्चासत्रांतर्गत शेतक-यांच्‍या शेतावर भेट व मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २४ जुन रोजी जिल्हा मासिक चर्चासत्रा अंतर्गत परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामधील मौजे पोहेटाकळी, जैतापुरवाडी, खेर्डा, वडी आणि बोरगव्हाण या ठिकाणी शेतक-यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास हिंगोली मतदार संघाचे आमदार मा. श्री. तानाजीराव मुटकुळे, विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ गजानन गडदे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. काकडे, कृषि उपसंचालक श्री. बी. एस. कच्छवे, तालुका कृषि अधिकारी श्री. वी. टी. शिंदे, श्री. प्रभाकर बनसावडे, श्री.काळे, श्री.भिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बीबीएफ तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करतांना डॉ. गजानन गडदे  म्‍हणाले की, बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्‍यास जास्त पाऊस पडल्यास बीबीएफच्या सऱ्याद्वारे हे पाणी वाहून जाते तर कमी पाऊस पडल्यास ते सऱ्यामध्ये जागच्या जागी मुरते, आणि पावसाचा खंड पडल्‍यास हेच पाणी पिकांना उपलब्‍ध होते. तसेच पिकामध्ये हवा खेळती राहत असल्यामुळे पारंपारीक पद्धतीपेक्षा २० टक्के अधिकचे उत्पादन मिळते.

सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी श्री भिसे यांनी केले तर आभार कृषी पर्यवेक्षक श्री ढगे यांनी मानले. कार्यक्रमास कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

जिल्‍हा मासिक चर्चासत्रांतर्गत हिंगोली जिल्‍हयातील शेतकरी बांधवाच्‍या शेतावर प्रत्‍यक्ष भेट देऊन मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २३ जुन रोजी जिल्हा मासिक चर्चासत्रा अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मधील मौजे गोरेगाव, जामठी आणि चौंढी या ठिकाणी शेतक-यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास हिंगोली मतदार संघाचे आमदार मा. श्री. तानाजीराव मुटकुळे, विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ गजानन गडदे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिवराज घोरपडे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. लाडके, कृषि विज्ञान केंद्राचे तज्ञ श्री. राजेश भालेराव, तालुका कृषि अधिकारी श्री.वळकुंडे, मंडळ कृषि अधिकारी श्री.विनायक पायघन आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मा श्री तानाजीराव मुटकुळे मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेतकरी बांधवांनी फळपिकांमध्‍ये कमी पाण्‍यात चांगले उत्‍पादन देणा-या सिताफळ पिकांची लागवड करण्‍याचा सल्‍ला दिला तर बीबीएफ तंत्रज्ञानाचा अधिकाधिक शेतक-यांनी वापर करण्‍याचे आवाहन केले.  

बीबीएफ तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करतांना डॉ. गजानन गडदे  म्‍हणाले की, बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्‍यास जास्त पाऊस पडल्यास बीबीएफच्या सऱ्याद्वारे हे पाणी वाहून जाते तर कमी पाऊस पडल्यास ते सऱ्यामध्ये जागच्या जागी मुरते, आणि पावसाचा खंड पडल्‍यास हेच पाणी पिकांना उपलब्‍ध होते. तसेच पिकामध्ये हवा खेळती राहत असल्यामुळे पारंपारीक पद्धतीपेक्षा २० टक्के अधिकचे उत्पादन मिळते. कार्यक्रमास कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Thursday, June 23, 2022

परभणी कृषि महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांचे नांदेड येथील एनसीसी शिबिरामध्ये आयोजित विविध स्‍पर्धेत यश


नांदेड येथील स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठात ५२ महाराष्ट्र बटालियन, एनसीसी नांदेड यांच्या वतीने दिनांक १२ ते २१ जून दरम्यान राष्ट्रीय छात्रसैनिकांकरिता वार्षिक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले  होते. यात विविध महावि़द्यालयातील ४५० छात्रसैनिक सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या ६१ छात्रसैनिक सहभागी झाले होते. शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या छात्र सैनिंकांनी विविध स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले. यामध्ये ड्रिल, शस्त्र कवायत, फायरिंग, फ्लॅग एरिया, पारंपरिक वेशभूषा, बेस्ट कॅडेट, बेस्ट हार्डवर्कर, हॅन्डरायटिंग, टेबल ड्रिल आदीमध्‍ये प्राविण्य मिळविले. शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख यांनी अल्फा कंपनी कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली. सिनियर अंडर ऑफिसर अक्षय गुट्टे, प्रकाश पाचनकर, धनराज ठाकूर, वृषभ रणवीर, आदित्य बेहाडे, सौरभ, शशिकांत, आशिष, पवन, गजानन, प्रसन्न, श्रीकृष्ण, सुशांत, निवृत्ती, प्रकाश, लक्ष्मण आदींनी पारितोषके पटकावली. कमांडिंग ऑफिसर कर्नल एम रंगराव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यशाबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रमोद येवले, संचालक शिक्षण डॉ धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. संजीव बंटेवाड आदींनी छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.

Wednesday, June 22, 2022

एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब केल्‍यास आर्थिक स्‍थैर्य प्राप्‍त होईल .... डॉ. दत्तप्रसाद वासकर

मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथील दत्‍तक शेतकरी बांधवा विद्यापीठ विकसित वाणाच्‍या बियाण्‍याचे वाटप

विद्यापीठ विकसित पिकाचे वाण तसेच विविध पीक पध्दती, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान शिफारसींचा अवलंब करून पीक पध्दतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवानी एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करण्‍यास उत्‍पादनात वाढ होईल आर्थिक स्‍थैर्यही प्राप्‍त होईल, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पांतर्गत “कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती” योजनेच्‍या वतीने देशाचा आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्‍य साधुन दिनांक १० जुन रोजी खरीप पूर्व हंगाम नियोजन बैठक व कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे सरपंच (आडगाव) श्री. बालासाहेब ढोले, उपसरपंच श्री रमाकांत पौडशेट्टे हे उपस्थित होते तर मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, श्री. रावसाहेब राऊत, डॉ. मदन पेंडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात सरपंच श्री. बालासाहेब ढोले, उपसरपंच श्री. रमाकांत पौडशेट्टे, श्री. मोतीराम ब्याळे आदींनी गावात राबविण्यात येत असलेल्या योजनेबद्दल आपले अनुभव सांगितले. 

निवडक शेतकऱ्यांना खरीप पिकांचे विद्यापीठ विकसित वाण सोयाबीन (एमएयुएस-१५८), तुर (बीडीएन-७११, ७१६), मुग (बीएम-२००३-०२) खरीप ज्वारी (पीकेव्‍ही-१००९) आदींचे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तसेच आभार श्रीमती आम्रपाली गुंजकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालासाहेब घोलप, विनायक रिठे, संतोष धनवे, मोरेश्वर राठोड, सुमित सुर्यवंशी, दिपक भुमरे आदींनी परिश्रम घेतले.  

मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे २०१८-१९ पासून हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्‍थे आणि विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने “कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती” ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत गावातील २८ शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. निवडक शेतकऱ्यांना खरीप पिकांचे विद्यापीठ विकसित वाण सोयाबीन (एमएयुएस-१५८), तुर (बीडीएन-७११, ७१६), मुग (बीएम-२००३-०२) खरीप ज्वारी (पीकेव्‍ही-१००९) आदींचे वाटप करण्यात आले आहे. कोरडवाहू हवामान बदलानुरुप परिस्थितीत कोरडवाहू शेतीचे व्यवस्थापन ही पुस्तिका गावातील शेतकरी बंधुंना वाटप करण्यात आली. योजनेअंतर्गत शेतीशी जोडधंदा म्हणून शेळीपालन व कुक्कुटपालन यासंबंधीत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. एकात्मिक शेती पध्‍दतीचा प्रचार व प्रसार करण्‍यात येतो. याचबरोबर पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने विहीर तसेच कुपनलिका पुनर्भरण, बांबुच्या लागवडीविषयी मार्गदर्शन केले. मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे यांनी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतावरील मातीचे नमुणे पृथ्थकरणासाठी घेतले. 

Tuesday, June 21, 2022

वनामकृवित जागतिक योग दिन उत्‍साहात साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक २१ जुन रोजी जागतिक योग दिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ गिरिधर वाघमारे, प्राचार्या डॉ जया बंगाळे, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढ, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्‍यक्षीय भाषणात डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, आज संपुर्ण जगात योग दिन साजरा करण्‍यात येत आहे. नियमित योगाचा सराव केल्‍याने जीवनातील ताणतणाव कमी होण्‍यास मदत होते. व्‍यक्‍ती अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकतो. योग व आसन हे आपल्‍या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे असे ते म्‍हणाले.

याप्रसंगी ऑर्ट ऑफ लिविंगचे योगशिक्षक प्रा. दिवाकर जोशी, डॉ सुब्बाराव, शरद डोलारकर, सुनिल बोरवते, महेश दशरते, गजानन कोरळवार, देवश्री हमदापुरकर, अर्चना घनवट आदींच्‍या मार्गदर्शनानुसार विविध आसने, प्राणायाम आदींचे सामुदायिकरित्‍या प्रात्‍यक्षिके करण्‍यात आली. 

कार्यक्रमात योगशिक्षण शरद डोलारकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविकात डॉ सचिन मोरे यांनी यावर्षीच्‍या जागतिक योग दिनाचे घोष वाक्‍य मानवतेसाठी योग असल्‍याचे सांगितले. सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी केले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक आदींनी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयातील डॉ डी एफ राठोड, डॉ चव्‍हाण आदीसह कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.






Sunday, June 19, 2022

ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे मंगरूळ येथे पशु लसीकरण कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालय, रेशीम संशोधन केंद्र आणि जिल्हा पशु वैदयकिय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यकम अंतर्गत दिनांक १५ जून रोजी मौजे मंगरूळ (ता. मानवत) येथे घटसर्प व फऱ्या रोग प्रतिबंध पशु लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जमीर पठाण हे होते तर प्रमुख पाहुणे पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. एम. मार्कंडेय उपस्थित होते. पशु पराजीवीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नरळदकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. मोहम्मद माजीद, डॉ. दिपाली कांबळे, डॉ. पी. आर. पाटील, रेशीम संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. आर. के. पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम घोळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात पशु लसीकरणाचे महत्व यावर डॉ. एन. एम. मार्कंडेय यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. नारळदकर यांनी ५ टक्के निंबोळीचा अर्क वापर करुन गोचीड निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम उद्योगाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सद‍र कार्यक्रम प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल,रावे समन्‍वयक डॉ राजेश कदम, सहसमन्‍वयक डॉ प्रविण कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्‍यात आला होता. लसिकरण कार्यक्रमांतर्गत गावातील पशूंचे मोफत लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विक्रम घोळवे यांनी केले. सूत्रसंचलन डी डी माने  यांनी केले तर आभार वी एन लोंढे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  कृषीकन्या के. जी. पन्नमवाड, बी. एम. माने, पी. ए.मोकाशे, टी टी.मुनघाटे, पी.के मगर, पी. एस.मगर, वी.बी.माने, जे.पी.मोरे, वी.एम.नखाते, पी. एम.पदमगीरवार, एच.वी.पांगरकर, एच.एस.पवार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते.


Saturday, June 18, 2022

वनामकृविच्‍या अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रात सीताफळ फळपिकांची दर्जेदार कलमे रोपे विक्रीस उपलब्ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रात सिताफळाच्‍या धारूर ६ या वाणाची रोपे विक्रीकरिता उपलब्‍ध आहेत. मराठवाडा विभागच नव्हे तर राज्याच्या कोरडवाहू  शेतीसाठी लाभदायी ठरलेले फळपीक म्हणजे सीताफळ होय आणि सीताफळाच्‍या विविध उपलब्ध वानामधून सर्वात सरस ठरलेला असा धारूर ६ या वाणाची  रोपे विक्री करिता उपलब्ध असल्‍याची माहिती केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ गोविदरराव मुंढे यांनी दिली आहे. धारूर ६ हे वाण वर्ष २०१४ मध्ये लागवडीसाठी या केंद्राकडून शिफारस करण्यात आली. मागील आठ वर्षात राज्यातील शेतकरी बांधवा हे वाण मोठे प्रचलित झाले आहे. या वाणाची फळांना प्रक्रिया उद्योगात मोठी मागणी होत असल्‍यामुळे आर्थिकदृष्‍टया किफायतीशीर ठरले आहे. वाणाच्या पक्व फळांचे वजन ४०० ग्रॅम पेक्षाही जास्त असुन फळात साखरेचे प्रमाण १९.५ आणि घनद्रव्य पदार्थ २४.५  असल्याने बियाचे प्रमाण इतर वाणाच्या तुलनेत कमी आहे आणि गर जास्त आहे. यामुळे खाण्यास योग्‍य आणि प्रक्रिया उद्योगात यास मागणी असुन रबडी, आईस्‍क्रीम अशा अनेक पदार्थात याच्‍या गराचा वापर होतो. तसेच अवर्षणप्रवण स्थितीत तग धरते लागवड केल्यानंतर तीन वर्षांनी फळे मिळण्यास सुरुवात होते. विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिताफळाच्या विविध वाणाचे दर्जेदार कलम व रोपे तयार करण्‍यात आली असुन शेतक-यांकरिता विक्री करिता उपलब्ध आहे, अशी माहिती सिताफळ संशोधन केंद्र प्रमुख डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली. डॉ गोविंद मुंढे यांचा संपर्क क्रमाक ८२७५०७२७९२ आहे.