Wednesday, July 13, 2022

शेतातील पैसा किडीचे कसे कराल व्‍यवस्‍थापन

मिलीपीड (पैसा) किडीबाबत ओळख व व्यवस्थापन

मिलीपीड म्‍हणजेचे आपण त्‍यास पैसा म्‍हणतो जगभरात याच्‍या १२००० पेक्षा अधिक प्रजाती असुन पैसा हा सहसा जिथे पाउस जास्त पडतो तेथे ओलसर, जंगले, दगडाच्या खाली, मातीमध्ये आदी भागात आढळतात (गवत, पाने, कचरा, कंपोष्ट). काही प्रजाती पुरग्रस्त भागात टिकू शकतात व दोन महीन्यापर्यंत पाण्यात बुडतात. मिलीपीड (पैसा) फार वेगवान हालचाल करु शकत नाहीत आणि बहूतेक प्रजाती सडणा-या वनस्पती सामग्रीवर जगतात. मिलीपीडमध्ये विषारी स्टिनर नसतात परंतू त्यापैकी काही शरीरातल्या छिद्रामधून दुर्गंधीयुक्त रसायने तयार करतात, ही रसायने अनेक भक्षकांना दुर ठेवण्यास मदत करतात. बहुतेकदा सेंटीपीड, कोळी, बेडूक, भक्षक पक्षी कीटकांनी खाल्ले जातात. धोक्याच्या वेळी मिलीपीड मऊ असणा-या शरिराच्या खालच्या बाजुचे संरक्षण करताना कडक असलेल्या वलय उघडीस करून त्याच्या शरीरात घट्ट आवर्त वर्तुळ करतात. मिलीपीड बहुतेकदा रात्री नैसर्गीक स्थान सोडतात, आणि पायाच्या साहयाने रेंगाळत वर्षाच्या विशिष्ट विशेषत: शरद ऋतू दरम्यान ते मोठया संख्येने स्थलांतर करू शकतात. वसंत आणि ग्रीष्म ऋतु मध्ये जास्त ओल्या किंवा कोरडया हवामानाच्या अनुषंगाने स्थलांतरीत करतात.

नुकसान : मिलीपीडस हया निशाचर असुन (Nocturnal habit) सामान्यता सडणारी पाने, सडलेले लाकूड आणि इतर प्रकारच्या ओलसर, किडणा-या वनस्पती पदार्थांना खातात. साधारणपणे त्यांची भुमिका कुजलेल्या झाडाचे विघटन करण्यास मदत करणारा आहे. तथापी जेव्हा ते असंख्य होतात तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणा-या रोपटे, बियाणे रोपे जसे कापुस, सोयाबिन या सारख्या पिकाचे नुकसान करतात. जमिनीलगत रोपे कापुन टाकतात कालांतराने रोपावर जाउन पाने कुरतडतात. कधी कधी मिलीपीडस आपल्या ओलसर राहणा-या ठिकाणामधून घरात फिरतात परंतु कोरडया परिस्थितीमुळे व अन्न अभावी ते सहसा द्रुत गतीने मरतात. कधी कधी मोठया संख्येने मिलीपीड स्थलांतर करतात. ब-याचदा अन्न पुरवठा कमी होउन किंवा त्यांची राहण्याची जागा एकतर ओली किंवा कोरडी होउन ते बाहेर पडतात व पाण्यात पडतात आणि बुडतात.

व्यवस्थापन : मिलीपीडचा कमी करण्यासाठी प्रभावी दिर्घ मुदतीचा उपाय म्हणजे आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करणे विशेषत: गवत कापने, ओले गवत, दगड, जमिनीवर ठेवलेल्या वस्तू, बांधावरील गवत इ. काढले पाहीजे. ब-याचदा आर्द्र, घनदाट पिकात जास्त पाणी देणे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास मिलीपीडच्या समस्यास कारणीभुत ठरु शकतात. कीड लपण्याच्या जागा म्‍हणजेचे शेतातील पडलेला पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले पदार्थ गोळा करुन नष्ट करावेत. पैसा रात्री जास्त सक्रीय असल्या कारणाने शेतक-यांनी रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढिग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले पैसा जमा करून मिठाच्या द्रावणात टाकावे. शेतातील ओले गवत आणि इतर सेंद्रिय पदार्थ कमी करा व जास्त आर्द्रता टाळा. जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास संरचनामध्ये प्रवेश केल्याच्या काही दिवसातच मिलीपीडस मरतात. जेथे पेरणी अगोदर शेतक-यांनी बिजप्रक्रीया केली असल्यास तेथे प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे. शेतात व बांधावरील पैसा किड हाताने वेचुन त्या साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. शेत तणविरहीत ठेवावे व शेतातील बांधावरील तणाचे व्यवस्थापन करावे. पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या पैसा किडी उघडया पडून नष्ट होतील. चांगला पाउस पडल्यास या किडींचे नैसर्गीक नियंत्रण होते. किड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरोपायरीफॉस २० ईसी ३ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन ५ टक्के एसपी १.५ मिली प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी. सद‍र कीटकनाशकाची शिफारस मिलीपेड साठी नाही, मात्र कापूस पिकामध्ये आहे. तसेच कार्बोसल्फोन (६ टक्के दानेदार) किंवा क्लोरोपायरीफॉस (१० टक्के दानेदार) किंवा फिप्रोनिल (०.३ टक्के) ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून ओळीने शेतातील रोपा जवळ वापरावे. सदरील कीटकनाशके परिणामकारक आहेत परंतु लेबल क्लेम नाहीत. शेतकरी बांधवांनी पैसाचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी वरील प्रमाणे उपाययोजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. पुरोषत्तम नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे यांनी केले आहे.


पैसा किडी बाबत अधिक जाणुन घ्‍या पुुुढे क्लिक करा

विस्‍तार शिक्षण विभागात पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी साजरी केली गुरू पौर्णिमा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने दिनांक १३ जुलै रोजी गुरू पौर्णिमा साजरी करण्‍यात आली. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विभाग प्रमुख डॉ राजेश कदम होते तर डॉ एस आर जक्‍कावाड, डॉ पी एस कापसे, डॉ एम आय खळगे, डॉ एस आर पुरी, डॉ आर सी सावंत, डॉ विद्याधर मनवर, डॉ अनुराधा लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ राजेश कदम म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यांनी आपले ध्‍येय निश्चित करून मार्गक्रमण करावे. विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासात गुरूची मोठी भुमिका असते. यावेळी पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी संपादीत केलेल्‍या गुरू संवाद भितीपत्रकाचे विमोचन करण्‍यात आले. विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी उपस्थित गुरूजनांचा सत्‍कार करून त्‍यांच्‍य प्रती आदर व्‍यक्‍त केला. कार्यक्रमात डा विद्यार्थींनी वैभव डुकरे व संगिता हुलमुखे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन घाणेश्‍वरी गोहाडे व रेणुका बांगर यांनी केले तर आभार संतोष शेंडे यांनी मानले. कार्यक्रमात विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, July 11, 2022

सोयाबीन पिवळे पडत असेल तर करा व्यवस्थापन

वनामकृवि शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

सद्यस्थितीत सोयाबीन रोप अवस्‍थेत असुन मराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडत आहे. लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे.        

लक्षणे: लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरां फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे.  लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

पिवळे पडण्‍याची कारणे: लोह ची कमतरता विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरव्या रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते. तथापि, बर्‍याचदा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते.

कसे कराल व्यवस्थापन: शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी. ०.५ टक्के(५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) फेरस सल्फेट ची पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (II) ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

सदरिल सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ.जी.डी.गडदे आणि किटकशास्‍त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत यांनी दिला आहे. अधिक माहितीसाठी ०२४५२ २२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर कार्यलयीन वेळेत संपर्क करावा.

 


सौजन्‍य – कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी

संदेश क्रमांक- ०२/२०२२ ( ०९ जूलै २०२२)


Thursday, July 7, 2022

वनामकृविच्‍या संघास अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वुडबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक

जयपुर (राजस्‍थान) येथील जगन्नाथ विद्यापीठात दिनांक २७ जुन ते ३० जुन दरम्यान अखिल भारतीय वुडबॉल चॅम्पियनशीप (मुले) आंतर विद्यापीठ स्पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या संघाने वुडबॉल डबल इव्हेंट या प्रकारात रौप्य पदक पटकावले. या विजयी संघात श्री. जाधव सिध्देश्‍वर भानुदास व घोडके पवन मनोहर यांनी यश प्राप्त केले,  या खेळाडुंना संघ व्यवस्थापक प्रा. डी. एफ. राठोड, प्रशिक्षक प्रा. संतोष वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.  यावेळी विजयी स्‍पर्धकांना कुलगुरू मा डॉ एच.एल. वर्मा, जयपुरचे आमदार मा श्री वेदप्रकाश सोळंकी, आयोजन समितीचे अध्‍यक्ष डॉ मयंक माथुर यांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले.

सदरिल यशाबाबत खेळांडुचे कुलगुरु मा डॉ. प्रमोद येवले, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, नाव्हा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. डी. पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. एस.एस. मोरे, क्रीडा अधिकारी डॉ. आशा देशमुख, क्रीडा अधिकारी प्रा. एस. यु. चव्हाण आदींनी खेळांडुचे, संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले.

Wednesday, July 6, 2022

वनामकृवित पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत लातुर विभागासाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभाग व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ जुलै रोजी पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) २०२२-२३ अंतर्गत लातुर विभागातील कृषि विभागातील अधिका-यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न झाली. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले हे होते तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, लातुर विभागीय कृषि सहसंचालक श्री. साहेबराव दिवेकर, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, क्रॉपसॅप समन्‍वयक डॉ. अनंत लाड, लातुर विभागातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. विजय लोखंडे (परभणी), श्री. आर बी चलवदे (नांदेड), श्री. महेश तीर्थंकर (उस्मानाबाद), श्री. दत्‍तात्रय गावसाने (लातूर), श्री. एस. ए. घोरपडे (हिंगोली) आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ. धर्मराज गोखले यांनी म्‍हणाले की, क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून अचुक सर्वेक्षणामुळे किडींची आर्थिक नुकसान पातळीची माहिती झाल्‍याने शेतकरी बांधवाना योग्‍य वेळी किडींचे व्यवस्थापन शक्‍य होत आहे. कृषि विभागातील अधिका-यांनी किडींचे अचुक सर्वेक्षण करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

श्री. साहेबराव दिवेकर यांनी मराठवाडयात कापुस, सोयाबीन, ज्वारी ही महत्वाची पिक असुन यावर येणा-या किडींचे व्यवस्थापनाचा सल्ला प्रसारमाध्यमातून वेळोवेळी देण्यात यावा जेणे करुन शेतक-यांचे होणारे नुकसान टाळेल. डॉ. सय्यद ईस्माईल हे क्रॉपसॅप प्रकल्‍पाच्‍या माध्यमातून किड-रोग सर्वेक्षणाचा शेतकरी बांधवा होत असल्‍याचे म्‍हणाले. तर डॉ. संजीव बंटेवाड यांनी क्रॉपसॅप प्रकल्‍पातील जिल्हा समन्वयकांनी कृषि विभागाच्या सहयोगाने वेळोवेळी प्रक्षेत्र भेटी दयावी. प्रकल्पाच्या माध्यमामुळे कापसावरील गुलाबी बोंडअळी, मक्यावरील लष्करी अळीचे योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत झाली असल्‍याचे म्‍हणाले. मनोगतात श्री. आर बी चलवदे विद्यापीठाच्या सल्याने योग्य किटकनाशकांची शिफारस शेतकरी बांधवापर्यंत त्‍वरित गेली पाहिजे असे मत व्‍यक्‍त केले.

तांत्रिक सत्रात सोयाबीनचे लागवड तंत्रज्ञानावर डॉ. शिवाजी म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले तर  कापुस लागवडीवर डॉ. अरविंद पांडागळे, कपाशीवरील किडींचे व्यवस्थापनावर डॉ. बस्वराज भेदे, क्रॉपसॅप प्रपत्र भरणे यावर डॉ. अनंत लाड, उस, मका, ज्वारी पिकावरील किडींचे व्यवस्थापनावर डॉ. दिगंबर पटाईत, हवामानाचा अंदाज आधारीत पिक व्यवस्थापनावर डॉ. कैलास डाखोरे, किडींची अतिउद्रेकाची ठिकाणे आणि मागील हंगामातील आढावा यावर डॉ. संजीव बंटेवाड, पिक रोग व्यवस्थापनावर डॉ. विक्रम घोळवे, शेतीतील मित्रकिटक यावर डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर यावर डॉ. पुरुषोत्तम झंवर, सोयाबीन वरील किड व्यवस्थापन यावर डॉ. राजेंद्र जाधव आदींनी मागदर्शन केले.

प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार श्री. जगताप यांनी मानले. कार्यशाळेस लातुर विभागातील उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आदीसह लातुर विभागातील १५० अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्‍वीतेकरिता कीटकशास्त्र विभागाचे डॉ. गोसलवाड, डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. धुरगुडे, डॉ. जायेवार, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. संजोग बोकन, श्री. धनंजय मोहोड, अनुराग खंडारे, दिपक लाड, योगेश विश्वांभरे, सुरेश शिंदे, सोपान ढगे आदींनी  सहकार्य केले.


कसे कराल शेतातील शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन

वनामकृवि शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

सद्य परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबीन, कापूस यासारख्या पिकामध्ये रोप अवस्थेतच गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोगलगायींना वेळीच ओळखून पुढील प्रमाणे उपाययोजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने देण्‍यात आला आहे.

कसे कराल शंखी गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन

शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील. शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी. लहान शंखीसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शीयम क्लोराईडचासुद्धा नियंत्रणासाठी बर्‍याच ठिकाणी वापर केला जातो.  शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा अथवा चुन्याचा ५ सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा.

फळबागेमध्ये झाडाच्या खोडास १०% बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड(स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल)प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे. शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या (स्नेलकिल) गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात.

जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे. दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक २५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्‍झाम ५० ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे. सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे.

वरील गोगलगायनाशक अथवा अमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा. अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या वरील प्रमाणे उपाय योजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण लवकरात लवकर व अधिक प्रभावीपणे होते.

असा सल्‍ला कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील किटकशास्‍त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, कृषि विद्यावेत्‍ता डॉ.जी.डी.गडदे, श्री.एम.बी.मांडगे दिला आहे.  अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र येथे ०२४५२ २२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क करावा.




संदर्भ – वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचा संदेश क्रमांक: ०१/२०२२ ( ०५ जुलै २०२२)

Saturday, July 2, 2022

वनामकृविच्‍या वतीने कृषी दिनी कर्तृत्ववान शेतकरी महिलांचा सन्मान

मौजे धानोरा काळे येथे २६ कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यांचा सत्‍कार

शेतकरी महिला अनेक आघाडीवर कार्य' करताना शेती कामे सांभाळून कुटुंबामध्ये ही महत्त्वाची भूमिका साकारतात म्हणून शेतकरी महिलांना सदैव सन्मानाने वागणूक मिळावयास हवी असे प्रतिपादन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी अध्यक्षीय समारोपात केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले शेतकरी महिला सन्मान वर्ष २०२२ यांचे औचित्‍य साधुन १ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व वसंतराव नाईक यांच्‍या जयंती निमित्ताने कृषी दिनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, कृषी विभाग, पूर्णा महिला आर्थिक विकास महामंडळ आणि पंचायत समिती पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे धानोरा (काळे) (ता. पूर्णा) येथील शेतकरी महिला मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय स्‍थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास आयोजक प्राचार्या डॉ. जया बंगाळे, प्रमुख अतिथी श्रीमती पुर्णा तहसीलदार पल्लवी टेमकर, जिल्हा समन्वयक अधिकारी (माविम) श्री बालाजी झिंजाडे, तालुका कृषी अधिकारी (पूर्णा) श्री. रामचंद्र तांबिले, उद्यान पंडीत श्री. प्रताप काळे, कृषि अधिकारी श्री. दहिवडे आदींची विशेष उपस्थिती होती.

शेतकरी महिला मेळाव्यात कृषि विभाग, महसूल कर्मचारी, प्रगतशील शेतकरी, ग्रामस्थ यांनी सुचविलेल्या २६ कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव सन्मानपत्र, शाल, फळझाडांचे रोप आणि तंत्रज्ञान पुस्तिका देऊन करण्यात आला. यावेळी सन्मानार्थी महिला शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा उद्यान पंडित श्री प्रताप काळे यांनी सादर केली. यावेळी सन्मानार्थी महिला आणि ग्रामस्थ अतिशय भावूक झाले.

कृषि दिनी शेतकरी महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान महिला शेतकऱ्यांच्या गावात येऊन सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने साजरा केला याबाबत समाधान व्यक्त करून असे कार्यक्रम अनेक गावात व्हावेत अशी अपेक्षा पूर्णेच्या तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. प्राचार्या डॉ जया बंगाळे यांनी शेतीकाम, घरकाम, आर्थिक, सामाजिक व्यवहार सांभाळताना शेतकरी महिलांनी आपले मानसिक स्वास्थ्याची जपणूकही केली पाहिजे असा सल्‍ला दिला.

मनोगतात श्री दिनेश काळे यांनी शेतकरी मातांनी केलेले अपार कष्ट व ते करत असताना आलेल्या अडचणीवर मात करून मिळविलेल्या विजय हा, सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आला अशा आपल्या भावना व्यक्त केल्या तर श्री बालासाहेब हिंगे यांनी ग्रामीण भागात शेती किंवा इतर व्यवसाय करून आपले कुटुंब चालवणाऱ्या मुलाबाळांना शिकवणाऱ्या त्यांच्यावर चांगले संस्कार करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांची उमेद वाढवली याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. तांत्रिक सत्रात विविध विषयावर सामुदायिक विज्ञान तंत्रज्ञानावर डॉ. तसनिम नाहिद खान, डॉ. सुनिता काळे, डॉ. विणा भालेराव, डॉ. जयश्री रोडगे, डॉ. शंकर पुरी आदींनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मुलांनाही आपल्या शेतकरी माते विषयी अभिमान वाटावा म्हणून माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. या दरम्यान शेतकरी महिला सन्मानार्थ विद्यार्थ्यांच्या "शेतात राबते माजी माय, तिच्या कष्टाला तोड नाही,"  "शेतकरी मातेचा आम्हाला गर्व, तिची काळजी घेऊ आम्ही सर्व," "शेतात राबते आई सतत, घर कामात तिला करू मदत," " घरात शेतात कामच काम, शेतकरी महिलांना आमचा सलाम," "निंदणी खुरपणी करते माझी माय, जणू काही तिच्या हाती जादूच हाय," अशा घोषणांनी सर्व गाव दणाणून गेले.

कार्यक्रमात पूर्णा शेती सेवा ग्रुपचे अमृत राज कदम, गोविंद दुधाटे, बालासाहेब हिंगे, निलेश अडसुळे, प्रवीण काळे, मोतीराम दुधाटे, उद्धव दुधाटे, उपसरपंच संभाजी भोसले, माजी मुख्याध्यापक श्री अशोक रसाळ, मुख्याध्यापक श्री गाडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ. जया बंगाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे समन्वयक विषय प्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. विणा भालेराव यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रताप काळे, जनक काळे, कृष्णा काळे, सुधाकर काळे, श्रीकांत काळे, भगवानराव काळे, बालाजी काळे, प्रकाश काळे या ग्रामस्थ मंडळींनी तसेच आत्माचे श्री जोशी महाविद्यालयाचे प्रल्हाद थोरात, रामा शिंदे आणि अलीम शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मौजे धानोरा काळे येथील शेतकरी बंधू भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.