Saturday, October 31, 2026

डीजीसीएच्या मध्यम श्रेणी ड्रोन वैमानिक प्रशिक्षक परीक्षेत वनामकृविचे डॉ. गोपाल शिंदे यांचे यश

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए), नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या रिमोट पायलट इन्स्ट्रक्टर (आरपीआय) – मध्यम श्रेणी (रोटरक्राफ्ट/व्हीएलओएस) या परीक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील नाहेप – डिजिटल फार्मिंग सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रा. (डॉ.) गोपाल उत्तमराव शिंदे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे त्यांना आता १५० किलोपर्यंत वजन क्षमतेच्या मध्यम श्रेणीतील ड्रोनसाठी वैमानिक प्रशिक्षण देण्याची पात्रता प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच त्यांनी लघु श्रेणीतील ड्रोनसाठी आरपीआय पात्रताही संपादन केली आहे.

देशभरातील दिल्ली, चेन्नई, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू या पाच परीक्षा केंद्रांवर दि. २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही मौखिक परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण १७६ उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी केवळ ६८ उमेदवार (३८.६ टक्के) उत्तीर्ण झाले, ४४ उमेदवार अनुत्तीर्ण झाले, तर ६४ उमेदवार अनुपस्थित राहिले. दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, डॉ. शिंदे यांनी मुंबई परीक्षा केंद्रावरून पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. याबाबतची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.

कृषी क्षेत्रात फवारणी, पेरणी तसेच कृषी निविष्ठा व मालवाहतुकीसाठी मध्यम श्रेणीतील ड्रोनचा वापर वाढत आहे. मात्र, या श्रेणीतील ड्रोनसाठी प्रशिक्षित व प्रमाणित प्रशिक्षकांची संख्या देशात मर्यादित आहे. डॉ. शिंदे यांच्या या दुहेरी पात्रतेमुळे विद्यापीठाच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकरी, कृषी पदवीधर आणि ग्रामीण युवकांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच कृषी क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञानाचा विस्तार आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना मिळणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी डॉ. शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यापीठातील सर्व संचालक, अधिष्ठाता आणि विभागप्रमुख यांनीही त्यांचे अभिनंदन केले.