Saturday, October 31, 2026

वनामकृवित सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन; राष्ट्रीय एकता दिवस व संकल्प दिवस साजरा

 



भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे अभिवादन कार्यक्रमाचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस व संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. पुरभा काळे, अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. रावसाहेब भाग्यवंत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याचा, स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा तसेच स्वतंत्र भारताच्या एकात्मतेसाठी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा परिचय करून दिला. तर विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी श्रीमती यमुना मदनराव घांडगे यांनी भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याचा व देशाच्या विकासातील योगदानाचा आढावा घेतला.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, अखंडता व सुरक्षितता जपण्याची शपथ घेतली. तसेच सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.