आपल्याकडे धन, ऐश्वर्य, बळ, विद्या, शिक्षण आणि मनुष्यबळ यांसह सर्व काही उपलब्ध असले, तरी शेवटी माणुसकीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. माणुसकीचा विचार झालाच पाहिजे, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.
मानवत जिल्हा परभणी येथील देवी मंदिर सभागृहात दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेच्या तिसऱ्या व अंतिम पुष्पात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगगुरू विलास मिटकरी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे नेते गोविंदभाऊ जोशी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, आपल्याकडे विद्या, शिक्षण, मनुष्यबळ आणि विविध सोयी-सुविधा उपलब्ध असल्या, तरी सर्वप्रथम माणुसकीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना मनात ठेवून समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व विकासासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी तसेच नागरिकांनी कृषी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची व कार्याची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष विद्यापीठाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या भाषणातून त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विविध कार्यांचा आढावाही मांडला.
या व्याख्यानमालेत दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे नेते गोविंदभाऊ जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सर्वसामान्य जनतेने शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच शासनाकडून मिळणारा निधी आणि शेतकरीविषयक धोरणांचा उल्लेख करून त्यांनी यासंदर्भात आपले विचार मांडले.
यावेळी सरिता बारहाते यांनी स्वतःच्या अनुभवांच्या आधारे सेंद्रिय शेतीविषयक अनुभव कथन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर तुपसागर यांनी केले.


