जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन
संचालनालयाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने परभणी येथील श्री राम बाग कृषी
पर्यटन केंद्र, धर्मापुरी, जिंतूर
रोड यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र पुरस्कार–२०२६’
जाहीर करण्यात आला. या पुरस्काराच्या निमित्ताने ‘हरित परभणी’
उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यासाठी दि.
२७ सप्टेंबर २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. कार्यक्रमाचे उद्घाटन परभणीचे माननीय
जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण (भाप्रसे) यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे
म्हणून परभणी महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. सय्यद इकबाल सय्यद खाजा उपस्थित
होते.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच उपस्थित मान्यवरांच्या
हस्ते श्री राम बाग कृषी पर्यटन केंद्राच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड
करण्यात आली. पर्यटन, कृषी आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय
साधून शाश्वत कृषी पर्यटनाला चालना देणे, तसेच परभणी जिल्ह्याचा
हरित व पर्यटनदृष्ट्या समृद्ध परिसर म्हणून विकास करणे, हा
संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषी आणि पर्यावरण
यांचा परस्परसंबंध अधोरेखित करताना कृषी पर्यटन केंद्रांनी पर्यटकांना निसर्ग, शेती आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव देतानाच पर्यावरण
संवर्धनासाठीही सक्रिय भूमिका बजावावी, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास ग्रामीण पोलीस विभागाचे प्रतिनिधी, पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते, ग्रामस्थ,
पर्यटक मित्र, लोकप्रतिनिधी तसेच विविध
मान्यवरांची उपस्थिती होती. श्री राम बाग कृषी पर्यटन केंद्राचे श्री. संजय टाकळकर
यांच्या पुढाकारातून आयोजित या वृक्षारोपण उपक्रमास उपस्थितांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला.
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण जीवन, शेती, निसर्ग, स्थानिक संस्कृती
आणि पर्यावरणाचा अनुभव पर्यटकांना देतानाच शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध
करून देण्यात कृषी पर्यटनाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे ‘हरित परभणी’ या संकल्पनेला अधिक बळ मिळणार असून, कृषी पर्यटनासोबतच पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
.jpeg)

.jpeg)